मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची 125 वर्षे

By अोंकार करंबेळकर | Published: August 21, 2017 04:29 PM2017-08-21T16:29:11+5:302017-08-21T17:10:04+5:30

लोकमान्यांच्या प्रेरणेतून मुंबईमध्ये गिरगावात 1893 साली केशवजी नाईक चाळीमध्ये सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात झाली. यंदा हा उत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. 

Mumbai's first public Ganesh festival, 125 years of Keshavji Naik Chawni Ganpati | मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची 125 वर्षे

मुंबईचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव, केशवजी नाईक चाळीच्या गणपतीची 125 वर्षे

googlenewsNext
ठळक मुद्देकेशवजी नाईक (मूळ आडनाव नायक) यांनी 1860-62 या काळामध्ये गिरगावात सात चाळींच्या इमारतीचा समूह बांधलासाधारणतः दिडशे बिऱ्हाडांच्या या चाळीमध्ये आजवर अनेक मोठ्या आणि सुप्रसिद्ध व्यक्तींनी वास्तव्य केलेले आहे.

मुंबई, दि. 21- भारतीय समाजामध्ये एकी तयार व्हावी, त्यांना एकत्र येण्यासाठी व्यासपिठ मिळावे यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरे व्हावेत यासाठी प्रेरणा दिली. त्यांच्याच प्रेरणेतून मुंबईमध्ये गिरगावात 1893 साली केशवजी नाईक चाळीमध्ये सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात झाली. यंदा हा उत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. 

केशवजी नाईक (मूळ आडनाव नायक) यांनी 1860-62 या काळामध्ये गिरगावात सात चाळींच्या इमारतीचा समूह बांधला, या इमारती केशवजी नाईकांच्या चाळी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. गिरगावामध्ये मध्यवर्ती जागेवर असणाऱ्या या चाळींमध्ये मराठी कुटुंबे येऊन स्थायिक होऊ लागली. साधारणतः दिडशे बिऱ्हाडांच्या या चाळीमध्ये आजवर अनेक मोठ्या आणि सुप्रसिद्ध व्यक्तींनी वास्तव्य केलेले आहे. कविकुलगुरू केशवसुत, कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, समाजवादी नेते एस.एम जोशी, मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बा. ग. खेर, प्रबोधनकार ठाकरे, वीर वामनराव जोशी अशा अनेक प्रभृती या चाळीत राहिलेले आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये गणेशोत्सव येथील इमारतीच्या शेजारील रस्त्यावर होत असे परंतु वाढत्या गर्दीमुळे तेथे जागा अपुरी पडू लागली. 1925 पासून चाळीच्या दोन इमारतींच्या मधल्या भागामध्ये गणपती बसविण्यात येऊ लागला. त्यावर्षापासून आजही त्याच जागेवर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते.

 

(लोकमान्य टिळकांच्या केशवजी नाईक भेटीचा केसरीमध्ये प्रसिद्ध झालेला वृत्तांत)

लोकमान्यांचे मार्गदर्शन
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 1901 सालच्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये एका सार्वजनिक सभेसाठी आले होते. त्यावेळेस मुंबईतील प्रमुख गणपती मंडळांनी त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. त्या आमंत्रण विनंतीनुसार लोकमान्यांनी या मंडळांना भेटी दिल्या. त्या भेटींची सुरुवात त्यांनी केशवजी नाईक चाळीपासून केली. 'मुंबईचा गणपत्युत्सव' या नावाने याभेटीचे वर्णन केसरीमध्ये प्रकाशित झाले होते. "गणेशोत्सव व्याख्यानमालेत झालेले पहिले व्याख्यान येथील केशवजी नाईकाच्या चाळींतील होय. व्य़ाख्यानकार वे. नरहरशास्त्री गोडसे असून अध्यक्षस्थानी ना. टिळक विराजमान झाले होते. ना. टिळक ह्या गणेशोत्सवात कोठे तरी व्याख्यान देतील किंवा अध्यक्ष होतील हे येथील लोक आधीच जाणून असल्यामुळे केशवजी नाईकाच्या चाळीत हजारों लोक जमले होते. व्याख्याते रा. गोडसे यांचा "गृहस्थाश्रम" हा विषय असून त्यावर त्यांनी पाऊण तासावर सुरस भाषण केले. आपली सर्व मदार शास्त्रीबोवांनी ब्रह्मचर्यावर ठेवली होती. शास्रीबोवांचे भाषण झाल्यावर ना. टिळकांनी गृहस्थाश्रमाची महती सांगून राष्ट्रीयदृष्टीने त्याचा विचार केला व सभेचे काम आटोपले" असा वृत्तांत छापून आला होता. 2001 साली टिळकांच्या या भेटीला 100 वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ तशीच भेट आयोजित करण्यात आली होती. लोकमान्य टिळकांची हुबेहुब व्यक्तीरेखा साकारणाऱ्या व्यक्तीची मुख्य रस्त्यापासून मंडपापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. बळवंतरावांचा विजय असो अशा घोषणाही तेव्हा देण्यात आल्या. विशेष म्हणजे नरहरशास्त्रींचे नातू दामोदरशास्त्री गोडसे यांचे यावेळेस व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

(केशवजी नाईक चाळीमधील गणपतीची प्रतिष्ठापना होण्याचे स्थान, स्वा. सावरकर व्याख्यान देताना)

नरहरशास्त्रीचे चाळीशी अतूट नाते
माझा प्रवास हे 1857 च्या स्वातंत्र्यसमराच्या धामधुमीतील प्रवासवर्णन लिहिणारे विष्णूभट गोडसे वरसईकर यांचे पुत्र म्हणजे नरहरशास्त्री गोडसे. नरहरशास्त्री शिक्षणानंतर मुंबईत स्थायिक झाले आणि केशवजी नाईक चाळीत राहू लागले. त्यांनी पिकेट रोडवर आणि माधवबाग येथे वेदपाठशाळा सुरु केल्या. त्यातील माधवबाग येथील पाठशाळा वैजनाथशास्त्री हे त्यांचे भाचे चालवत असत. या वैजनाथशास्त्रीचे पुत्र पांडुरंगशास्त्री आठवले यांनी पुढे स्वाध्याय परिवाराची स्थापना केली. नरहरशास्त्री वेदशास्त्रसंपन्न तर होतेच त्याहून विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र पुरुषोत्तमशास्त्री आणि नातू दामोदरशास्त्री यांनीही या चाळीत वास्तव्य केले. दामोदरशास्त्री यांनी चाळीतील लोकांसाठी प्रत्येक पंधरादिवसातून एकदा शास्त्रविवेचनाचे वर्ग चालवले. (दामोदरशास्त्री यांचे यावर्षीच निधन झाले). अशा प्रकारे वेदशास्त्रसंपन्न अशा गोडसे कुटुंबाचा या चाळीशी शतकाहून जास्त काळ संबंध आला. माझा प्रवासकार विष्णूभट गोडसे यांचे 1901 साली निधन झाले, त्यामुळे तेसुद्धा या चाळीत राहिले असावेत, यात शंका नाही.

गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी हा वाद मूर्खपणाचा - राज ठाकरे

चाकरमानी निघाले बाप्पाच्या भेटीला, ‘अ‍ॅडव्हान्स’ बुकिंग फुल्ल : गणपती विशेष २,0४७ एसटी बस

मान्यवरांच्या भेटी आणि व्याख्यानमाला, उत्सवाची कायम परंपरा
आमच्या येथील गणपतीची मूर्ती गेली 125 वर्षे एकाच आाकाराची म्हणजे दोन फुटांची आहेत. गणपतीचं आगमन आणि विसर्जन यासाठी आजही पालखीच वापरली जाते आणि सर्व सदस्य मिरवणुकीत अनवाणीच सामिल होतात. गणपतीच्या काळामध्ये चाळीतील मुला-मुलींकरिता आम्ही स्पर्धा आयोजित करतो. लोकमान्यांच्या भेटीचा लाभ झालेल्या या मंडळाच्या व्याख्यानमालेत अनेक प्रसिद्ध नेते, व्याख्याते, गायक, लेखक, खेळाडू येऊन गेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, पांडुरंगशास्त्री आठवले, राम शेवाळकर, यांनीही येथे व्याख्यानात मार्गदर्शन केलेले आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, भाजपाध्यक्ष अमित शहा, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, सचिन तेंडूलकर अशा अनेक मोठ्या व्यक्तींनी उत्सवाच्या काळात भेट दिलेली आहे. यंदाच्या वर्षी गणेशचतुर्थीच्या दिवशी स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची उपस्थिती लाभणार आहे. - विनोद सातपुते, विश्वस्त
 

Web Title: Mumbai's first public Ganesh festival, 125 years of Keshavji Naik Chawni Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.