ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 15 - साचेबद्ध पुरस्कार सोहळयांपेक्षा पूर्णपणे भिन्न स्वरुप असलेला ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळा अनेक अर्थांनी वेगळा ठरला. सत्ता, कर्तुत्व आणि ग्लॅमरचा त्रिवेणी संगम असलेल्या या पुरस्कार सोहळयात सादर झालेल्या नावीन्यपूर्ण कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. प्रेक्षकांना अनेक सुखद धक्के या सोहळयाने दिले. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृती फडणवीस यांनी या सन्मान संध्येमध्ये मनापासून सहभागी होत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. दोघांनी दुस-यादिवशी टि्वट करुन "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळयात आनंददायक क्षण अनुभवल्याचे सांगितले. 
 
यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर’ पॉवर्ड बाय कर्म इन्फ्रास्ट्रक्चर आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडला. 
 
अमृता फडणवीस आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघींचा एकत्र गाण्याचा योग या सोहळयात जुळून आला. हे सुद्धा कार्यक्रमाचे एक वैशिष्टय ठरले. अभिनेत्री असण्याबरोबर आलिया भट चांगली गायक सुद्धा आहे आणि अमृता फडणवीस या सुद्धा उत्तम गायिका आहेत. लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांच्या आग्रहाखातर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अमृता फडणवीस यांनी "तेरी गलिया" हे गाणे सुद्धा एकत्र गायले. या दोघींच्या एकत्र जुळून आलेल्या सूरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘पॉलिटिकल ट्रान्सफॉर्मर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तो या विलोभनीय सन्मानसंध्येचा कळसाध्याय ठरला. मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या पुरस्काराने आऩंद झाल्याचे टि्वट अमृता फडणवीस यांनी केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये घेतलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओचे स्वत: मुख्यमंत्र्यांनी  टि्वट केले. 
 
‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे सार्थ नामाभिधान अभिमानाने मिरवत चांद्यापासून बांद्यांपर्यंत विस्तारलेल्या वर्धिष्णु अशा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने मराठी भाषा, मराठी माती आणि महाराष्ट्राची शान वाढविणाऱ्या विविध क्षेत्रांतील सेवाव्रतींचा  ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव केला.