ग्रामपंचायत सदस्य बनला आमदार

By admin | Published: October 21, 2014 09:33 PM2014-10-21T21:33:20+5:302014-10-21T23:42:14+5:30

इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा आमदार होऊ शकतो

The MLA became a member of Gram Panchayat | ग्रामपंचायत सदस्य बनला आमदार

ग्रामपंचायत सदस्य बनला आमदार

Next

दापोली : इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा आमदार होऊ शकतो. हे त्रिवार सत्य संजय कदम यांनी दाखवून दिले आहे. १९९० साली चिंचघर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते २०१४ ला दापोलीचे आमदार हा प्रवास एका सच्चा कार्यकर्त्याचा आहे. गेल्या २५ वर्षात त्यांनी ेराजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती जनतेने आज दिली आहे.
तरुण वयात शिवसेनेत प्रवेश करुन ग्रामपंचायतीवर निवडून जात वयाच्या २१व्यावर्षी सरपंचपदाचा बहुमानही कदम यांनी मिळवला. सरपंच पदावरुन त्यांनी मागे कधीही वळून पाहिले नाही. खेड पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषद गटनेता अशी त्यांची कारकीर्द राहिली. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. आपली छाप पाडली.
दोन वर्षापूर्वी खेडला जिल्हा परिषद अध्यक्षपद नाकारल्याने शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करुन राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते, खेडचे तत्कालीन आमदार रामदास कदम यांच्या तालमीत वाढलेले संजय कदम कट्टर शिवसैनिक होते. राष्ट्रवादीत गेल्यावरसुद्धा सेनेचीच आक्रमकता त्यांच्या अंगात होती. सेना स्टाईलनेच त्यांनी जिल्हा परिषदेत अन्यायाविरोधात आवाज उठवला.
दापोली विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत खेड तालुका दापोलीला जोडला गेला व २००९ साली सूर्यकांत दळवी यांच्यापाठीशी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ते ठाम राहिले. संजय कदम व सूर्यकांत दळवी यांची गुरु शिष्याची जोडी जमली. मात्र अडीच वर्षांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद खेडला मिळावे, असा आग्रह कदम यांनी धरला. मात्र खेडला जिल्हा परिषद अध्यक्षपद न देता दापोलीच्या जिल्हा परिषद सदस्या रोहिणी दळवी यांना देण्यात आले व गुरु शिष्याचा दुरावा निर्माण झाला. संजय कदम यांनी राष्ट्रवादी जोडली व एकेकाळचे गुरु शिष्य पक्के राजकीय विरोधक बनले.
दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सूर्यकांत दळवी १९९० साली आपले राजकीय गुरु तत्कालीन मंत्री बाबुराव बेलोसे यांचा पराभव करुन विजयी झाले. त्याच दळवींचा पराभव त्यांच्या एकेकाळच्या शिष्याने केल्याने या मतदारसंघातील ही परंपरा कायम राहिली आहे.

दापोली विधानसभेतील मतदारांनी गोडबोले आमदाराला नाकारले असून निष्क्रीयतेला जनता कंटाळली आहे. जनतेला विकासकामे हवी आहेत. केवळ गोड बोलून जनतेचा विकास होणार नाही. मतदार सुज्ञ झाले आहेत. तुलनात्मकदृष्ट्या कोण उमेदवार असावा हे जनतेने दाखवून दिले आहे. २५ वर्षे आमदार असणाऱ्या व्यक्तीतालुक्याचा विकास केलेला नाही. जनतेला परिवर्तन हवे होते. म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवू. विकास काय असतो ते पाच वर्षात जनतेला करुन दाखवू.
- संजय कदम, विद्यमान आमदार.

Web Title: The MLA became a member of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.