मिरजचे तंतुवाद्य आॅक्सफर्ड संदर्भकोषात

By Admin | Published: December 8, 2014 07:17 PM2014-12-08T19:17:45+5:302014-12-08T19:18:21+5:30

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा : तंबोरा, सतारचा देश-परदेशात लौकिक

Mirage robot in Oxford referencing | मिरजचे तंतुवाद्य आॅक्सफर्ड संदर्भकोषात

मिरजचे तंतुवाद्य आॅक्सफर्ड संदर्भकोषात

googlenewsNext

सदानंद औंधे - मिरज --दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती कलेचा समावेश आॅक्सफर्ड इनसायक्लोपिडियात करण्यात आला आहे. आॅक्सफर्डने प्रकाशित केलेल्या भारतीय शैलीच्या वाद्यनिर्मिती संदर्भकोषात मिरजेतील तंतुवाद्य कारागीरांचा समावेश केल्याने मिरजेच्या व महाराष्ट्राच्या शिरपेचात यानिमित्ताने मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतात महत्त्वाची भूमिका असलेल्या तंतुवाद्याची निर्मिती देशात लखनौ, कोलकाता व मिरज या तीन ठिकाणी होते; मात्र मिरजेतील तंतुवाद्य कलेचा समावेश संदर्भकोषात करून याठिकाणच्या कलेचा सन्मान आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आला आहे.
देशात अन्यत्रही सूरवाद्ये तयार होतात; मात्र मिरज, लखनौ व कोलकाता येथे तयार होणाऱ्या वाद्यांना देशातील आघाडीच्या दिग्गज गायक, वादकांची पसंती आहे. मिरजेतील तंतुवाद्य कारागीरांनी पारंपरिक वाद्यांमध्ये विविध संशोधने केली आहेत. मिरजेतील तंबोरा व सतार या दर्जेदार तंतुवाद्यांनी देशात व परदेशात लौकिक मिळविला आहे. तंतुवाद्याचा मधुर व सुरेल आवाज, टिकावूपणा, सुबकता यामुळे मिरजेतील सतार व तंबोऱ्यांना मानसन्मान मिळाले आहेत. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतकला टिकविण्याचे श्रेय तंतुवाद्य कारागीरांनाही असल्याने मिरजेतील तंतुवाद्य कलेची आॅक्सफर्डच्या भारतीय संगीत व वाद्यांच्या संदर्भकोषात दखल घेतली आहे. फरीदसाहेब मिरजकर, बाळासाहेब मिरजकर व मोहसीन मिरजकर यांच्या तंतुवाद्य निर्मितीतील उल्लेखनीय कार्याचा संदर्भ कोषात समावेश झाला आहे.
इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्यांमुळे तंबोऱ्यांची मागणी घटत आहे. शास्त्रीय संगीत कलेचे, शास्त्रीय संगीताचे जाणकार व श्रोते कमी होत आहेत. कच्चा माल व मजुरीच्या वाढत्या दरामुळे तंतुवाद्य निर्मिती व्यवसाय अडचणीत आहे. कष्टाचे काम, तुटपुंजे उत्पन्न असल्याने तंतुवाद्य कारागीरांची नवी पिढी या व्यवसायासाठी इच्छुक नाही. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत मिरजेत सतारमेकर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तंतुवाद्य निर्मिती कारागीरांच्या पाच पिढ्यांनी व्यवसाय कसाबसा टिकवून ठेवला आहे.
तंबोरा व सतारीसाठी वापरण्यात येणाऱ्या कडू भोपळ्याचे मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात नदीकाठी उत्पादन होते. ५० इंचापेक्षा मोठा भोपळा याच ठिकाणी होतो. सोलापूर जिल्ह्णात मिळणाऱ्या टिकाऊ भोपळ्यांमुळे मिरजेतील सतार, तंबोऱ्याचा लौकिक आहे. तंतुवाद्यासाठी लाल देवदार वृक्षाचे लाकूड वापरण्यात येते. आसाम व कर्नाटकातील जंगलातून येणाऱ्या देवदारचा वापर करण्यात येतो.


दिग्गज कलाकारांची सतार, तंबोऱ्याला पसंती
हिराबाई बडोदेकर, पं. फिरोज दस्तूर, गंगूबाई हनगल, शोभा गुर्टू, पंडित जसराज, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, श्रीनिवास जोशी, उपेंद्र भट यांच्यासह दिग्गज कलाकारांसाठी मिरजेत सतार व तंबोरा तयार झाला आहे. मिरजेच्या सतार व तंबोऱ्यास परदेशातही मागणी आहे. तंतुवाद्ये बनविण्यासाठी कोणी भोपळा कापतो, कोणी तराफा जोडतो, तारा चढवितो, कोणी वाद्याचे ट्युनिंग करतो. सतार, तंबोऱ्याची निर्मिती सामूहिक काम असते. वाद्याचे ट्युनिंग करणे किंवा स्वर जुळविणे, तर कौशल्याचे काम आहे. त्यासाठी स्वरांचे ज्ञान कारागीरांनी आत्मसात केले आहे.
तंतुवाद्य कला टिकविण्यासाठी व संवर्धनासाठी तंतुवाद्य निर्मितीला हस्तकलेचा दर्जा, कारागीरांना निवृत्तीवेतन, आर्थिक मदत व आरोग्य सुविधा देण्याची मागणी आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तंतुवाद्य कारागीरांना हस्तकला कारागीर वा कलाकाराचा दर्जा देण्यास नकार दिल्याने कारागीर असुरक्षित आहेत.


वाद्यावर मिरजेत संशोधन
भारतीय शास्त्रीय संगीतातील हार्मोनियम, तबला या पारंपरिक वाद्यात मिरजेत संशोधन सुरू आहे. मोहसीन मिरजकर सतारमेकर यांनी पायाने व
हाताने भाता चालविता येणारा हार्मोनियम तयार केला आहे.
पुरुष व स्त्रियांना वेगवेगळ्या स्वरांचे हार्मोनियम लागतात; मात्र हार्मोनियमचा रिड बोर्ड बदलता येणारा व पुरुष, स्त्री गायकांसह सोलो, गजल या सर्व प्रकारांसाठी चालणारा एकच हार्मोनियम मिरजेत तयार करण्यात आला आहे.
वेगवेगळे स्वर निघणाऱ्या तबल्यासह, दोन्ही बाजूंनी वेगवेगळे स्वर असलेली ड्युएल नेक मेंडोलीन मिरजकर यांनी तयार केली आहे.

Web Title: Mirage robot in Oxford referencing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.