- प्रफुल्ल गायकवाड

मुंबई, दि. 17 - १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांच्या नावाचा ब्रिटिशांनी, अन्यायी सावकारांनी धसका घेतला होता, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे वासुदेव बळवंत फडके! दुष्काळाच्या काळात गरिबांची कष्टाची कमाई हिरावून घेणार्‍या सावकार-धनिकांच्या घरांवर झडप घालून, त्यांच्याकडील लुटीचा विनियोग सशस्त्र क्रांतिकार्यासाठी करणारे आद्य क्रांतिकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे होत.
 
शिरढोणच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार असलेल्या अनंत रामचंद्र फडके यांच्या मुलाच्या पोटी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. शिरढोणमध्ये त्या वेळी शिक्षणाची सोय नसल्यामुळे वासुदेवराव शिक्षणासाठी कल्याण व नंतर उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे या ठिकाणी राहिले. या काळात त्यांनी इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवले. पण पुढे नोकरी करण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी अंतिम परीक्षा न देताच शाळा सोडली. याच काळात १८५७ चे स्वातंत्र्यसमर सुरू झाले होते. त्यातील अनेक घटनांचा त्यांच्या मनावर दूरगामी परिणाम होत होता. फेब्रुवारी,१८६० मध्ये वासुदेवरावांचे लग्न झाले.
 
आर्थिक अडचणींमुळे त्यांना नोकरी करणे भाग पडले. म्हणून मुंबईमध्ये प्रथम मिलिटरी अकाउंट्‌स विभागात व त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेजात त्यांनी नोकरी केली, पण याच काळात ते अचानकपणे आजारी पडले. त्यांना प्रचंड ज्वराने ग्रासले होते. त्यांना मुंबईची हवा मानवत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. त्यामुळे पुढे ते पुणे येथे नोकरी करू लागले. ही नोकरी करत असताना, १८६५ साली त्यांना त्यांची आई अंथरुणाला खिळल्याचे कळाले, त्यांनी वरिष्ठांकडे रजेचा अर्ज केला, पण तो त्यांनी नामंजूर केला. तरी आईच्या ओढीने ते आपल्या गावी, शिरढोणला पोहोचले. पण तत्पूर्वीच त्यांच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता. इथेच त्यांच्या मनात असंतोषाची पहिली ठिणगी पडली. पुढील वर्षी आईच्या वर्षश्राद्धालाही रजा नाकारल्याने उद्विग्न अवस्थेत त्यांनी याचा प्रतिशोध घेण्याचे ठरवले.
 
दरम्यानच्या काळात न्यायमूर्ती रानडे यांच्या स्वदेशीवरील व्याख्यानाचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला व त्यांच्यातील देशभक्तीचा अंगार अधिकच फुलू लागला. ते स्वदेशीच्या प्रचारासाठी फिरू लागले, व्याख्याने देऊ लागले. याच काळात त्यांनी आपली आध्यात्मिक साधनाही सुरू केली होती. त्यांना काही काळ अक्कलकोट स्वामींचा सहवासही लाभला. स्वदेशप्राप्तीसाठी नुसती भाषणं व व्याख्यानं ही पूरक माध्यमं नसून त्यासाठी बालपणापासूनच विद्यार्थ्यांवर तसे संस्कार होणे गरजेचे आहे, असा विचार करून त्यांनी १८७४ मध्ये पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना केली. यातूनच त्यांनी पुढे पुण्याचे सुप्रसिद्ध भावे विद्यालय सुरू केले. या पद्धतीने राष्ट्रीय शिक्षणाचा पायाच जणू त्यांनी घातला .
 
दरम्यान महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले. विहिरी, नद्या, नाले सुकून गेले. गावंच्या गावं ओस पडली. परिस्थिती इतकी विकोपाला गेली की, प्रेतांच्या अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने कुत्र्या-गिधाडांसाठी प्रेतं ठेवून लोकांना पुढं जावं लागे. यातच देवीच्या साथीची भर पडली आणि इंग्रजांच्या छळालाही सीमा उरली नाही. त्यातूनच पुढे त्यांनी सरकारच्या विरोधात काहीतरी करायचा निर्णय घेतला. या काळात वासुदेवराव लहुजी वस्तादांकडे दांडपट्टा, इतर शस्त्रे, मल्लविद्या व घोडेस्वारी शिकण्यास जात होते.
 
या काळातच त्यांनी रामोशी समाजाला संघटित केले. रामोशी जमातीच्या बहुसंख्य लोकांकडे पूर्वी प्रामुख्याने गडरक्षणाचे काम होते. पण गड व किल्ले इंग्रजांनी खालसा केल्यामुळे ते रानोमाळ भटकत असत. या रामोशी समाजाला (तसेच काही भिल्ल लोकांनाही) सोबत घेऊनच त्यांनी सशस्त्र बंडाची तयारी सुरू केली. जे धनिक, सावकार गरिबांचे शोषण करून धनाढ्य झाले होते, त्यांच्याकडून स्वराज्यप्राप्तीसाठी पैसे-परतीच्या बोलीवर- घ्यायचे आणि जर त्यांनी दिले नाहीत, तर ते लुटायचे-अशा मार्गाचा अवलंब करीत त्यांनी आपल्या बंडाचे पहिले निशाण धामारी या गावी २३ फेब्रुवारी, १८७९ रोजी फडकवले. 
 
त्यानंतर जवळजवळ ४-५ वर्षे बंडाचे कार्य नियमितपणे -प्रामुख्याने पुणे व सातारा जिल्ह्यात -सुरू होते. या बंडामुळे फडकेंचे नाव लंडनपर्यंत पोहोचले होते. हे बंड करत असताना त्यांनी ब्रिटिशविरोधी जाहीरनामाच प्रसिद्ध केला होता.त्यांचा बंदोबस्त करण्यासठी सरकारने मेजर डॅनियल याची नेमणूक केली. त्याला वासुदेवरावांनी निम्म्या महाराष्ट्रभर फिरवलं. पुढे त्यांनी गाणगापूर येथे काशीकरबुवा या नावाने काही काळ भूमिगतपणे काम केले. आपली अध्यात्मसाधना सुरूच ठेवली होती. या ठिकाणीच त्यांनी रोहिल्यांना एकत्र करून, त्यांची भाडोत्री सेना घेऊन इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्नही केला. ब्रिटिश त्यांचा पाठलाग हर तर्‍हेने, येथील फितुरांचा, स्थानिक पोलिसांचा आधार घेत करतच होते. वासुदेवरावांनी पोलिसांना अक्षरश: झुंजवले , पण अखेर त्यांना बेळगाव व कोल्हापूर यांच्या मध्ये असलेल्या कदलगी येथे अटक झाली. त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जानेवारी, १८८० मध्ये एडन येथे स्थानबद्ध करण्यात आले.
 
एडनमध्ये असताना त्यांना पाणी चामड्याच्या पखालीने पुरवले जाई. याविरुद्धही वासुदेवरावांनी आवाज उठवला. त्यानंतर त्यांना कोलू फिरवून २५ पौंड तेल गाळून घेण्याचे काम दिले गेले. अशा अवस्थेतून त्यांची सुटण्याची धडपड सुरू होतीच. त्यातच दि. १२ ऑक्टोबर, १८८० रोजी ते बेड्या तोडून तुरुंगातून पळाले. पण लवकरच त्यांना पुन्हा पकडण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी एकांतवासात झाली. या काळातच त्यांना क्षयरोगानेही ग्रासले. पुढे या आजारात तुरुंगातच त्यांचे दु:खद निधन झाले.
 
सशस्त्र क्रांतीचा मंत्र देत, बहुजन समाजाला सोबत घेऊन, आपल्या अतुल पराक्रमाने इंग्रजी साम्राज्याला शह देणार्‍या वासुदेवरावांनी जणू शिवछत्रपतींप्रमाणे स्वराज्यप्राप्तीचा यथाशक्ति प्रयत्न केला. यांच्या कार्यातूनच व बलिदानातून असंख्य क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसेनानींनी प्रेरणा घेतली व पुढील काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले.