Marathi Bhasha Din : चीनमधील मराठीचं 'कोटणीस कनेक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 08:04 AM2018-02-27T08:04:48+5:302018-02-27T08:04:48+5:30

मराठी माणूस आणि चिनी माणूस यामध्ये तसं काही साम्य नाही. म्हणजे स्वभावधर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा वगैरेंमध्ये काहीही समान दुवा नाही.

Marathi Bhasha Din: Maharashtrian culture in China and their Dr. Kotnis Connection | Marathi Bhasha Din : चीनमधील मराठीचं 'कोटणीस कनेक्शन'

Marathi Bhasha Din : चीनमधील मराठीचं 'कोटणीस कनेक्शन'

googlenewsNext

- पुष्कर सामंत

मराठी माणूस आणि चिनी माणूस यामध्ये तसं काही साम्य नाही. म्हणजे स्वभावधर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा वगैरेंमध्ये काहीही समान दुवा नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा अगदी झांबियासारख्या देशातही मराठी मंडळ वगैरे आहे. पण चीनमध्ये महाराष्ट्र मंडळ किंवा मराठी मंडळ नाही. बाकी अनेक देशांमध्ये २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मंडळांतर्फे काही कार्यक्रम आयोजित केले जातात. स्थानिक कलाकार गाणी, नाच, नाटुकल्या वगैरे सादर करतात. पण चीनमध्ये सगळा मामला थंड असतो. रोजच्या प्रमाणे हा दिवसही उगवतो आणि मावळतो.

खरंतर महाराष्ट्र आणि चीन यांच्यात नाळ जोडणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. द्वारकानाथ कोटणीस. १९३८च्या सुमारास दुसऱ्या सिनो-जपानी युद्धामध्ये वैद्यकीय पथकासोबत गेलेले एकमेव मराठी डॉक्टर. वैद्यकीय सेवा करत असतानाच त्यांचे चीनमध्ये निधन झाले. पण डॉ. कोटणीस यांचे हे उपकार आजही चीन विसरलेला नाही. चीनच्या हपेई प्रांतामध्ये डॉ. कोटणीस यांची समाधीदेखील आहे. आजही चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर असतील तर दूतावासातील समारंभासाठी डॉ. कोटणीस यांच्या नातेवाईकांना आमंत्रण असतं.

ही एक नाळ असूनही चीनमधल्या कुठल्याच प्रांतात किंवा शहरात मराठी भाषिकांची एकी किंवा संघटना नाही. चीनच्या विविध शहरांमध्ये थोडेथोडके मराठी भाषिक विखुरलेले आहेत. नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त गेलेले मराठी भाषिक हे तिथे जाऊन भारतीय ही एकच ओळख टिकवून असतात. अर्थात ही ओळख चांगलीच आहे. पण डॉ. कोटणीस यांचं कार्य मनात ठेवून त्या मातीचा अभिमान बाळगणं मात्र चीनमधल्या कुठल्याही मराठी माणसाला शक्य झालेलं नाही. म्हणजे कुणी प्रयत्न केले नाहीत असे नसेल. पण प्रयत्न केल्याचंही ऐकिवात नाही. आपल्याकडच्या मराठी मुलांना डॉ. कोटणीसांचा विसर पडला आहे तसा चीनमधल्या आताच्या तरूणाईलाही पडला आहे. काळाच्या ओघात ते होणारच असं म्हणण्याइतकी ही साधी आणि सोपी घटना नाही. एरवी कुणाही सोम्यागोम्यांच्या जयंती-पुण्यतिथीला भर चौकात मंडप घालून धिंगाणा घालायला आपण कमी करत नाही. पण कसंय, मुळातच डॉ. कोटणीस यांना ग्लॅमर नाही. आणि त्यातही त्यांचं कार्य म्हणजे ते सीमेपलीकडे (आत्ताच्या) शत्रूराष्ट्रात केलेलं. त्यामुळे अशा माणसाचं उदात्तीकरण करायच्या भानगडीत कोण पडेल. 

मुद्दा उदात्तीकरणाचा नाही. मुद्दा आहे तो दोन भिन्न संस्कृतींना एकत्र आणण्याचा. कुठल्याही दोन संस्कृतींमध्ये जशी तफावत असते तसंच योगायोगाने काही साम्यही असतं. आता चिनी भाषेचं म्हणाल तर काही शब्द हे मराठी शब्दांसारखेच वाटतात. उदाहरणार्थ चिनी भाषेतला छा म्हणजे आपला चहा. किंवा तासुअन म्हणजे लसूण. मांजर म्हणजे मनीमाऊला माओ. यादी केली तर अनेक शब्द निघतील. सणांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कंदील हा प्रकार दोन्ही संस्कृतींच्या मोठ्या सणाला आवर्जून दिसणारा प्रकार आहे. आपली दिवाळी आणि चिनी नवीन वर्ष किंवा स्प्रिंग फेस्टिव्हल हे दोन्ही मोठे सण कंदीलाविना अपूर्ण वाटतात. आपल्याकडे जसं पितरांना आदरांजली वाहण्यासाठी पितृपंधरवडा असतो तसाच काहीसा प्रकार चिनी नागरिकांमध्येही आहे. छिंगमिंग फेस्टिव्हल हा सण म्हणजे पूर्वजांचं पुण्यस्मरण करण्याचा दिवस असतो. आपल्याकडे पितरांसाठी पान वाढलं जातं. तर चीनमध्ये पितरांना नोटा जाळून थेट पैसे पाठवले जातात. नाट्यप्रकार घ्यायचा झाला तर चायनीज ओपेरा हा आपल्या संगीतनाटकाचाच भाऊ आहे. आलाप आणि ताना इथेही आहेत आणि तिथेही आहेत. 

खाद्यपदार्थांचा तर एक वेगळा लेखच होईल. मोदक आणि डम्पलिंग ही जुळी भावंडं आहेत. आपल्याकडच्या तिखट शेवया आणि नूडल्स यांच्यातही भावकीचं नातं आहे. ड्रॅगनबोट फेस्टिव्हलच्या दरम्यान बनवण्यात येणारं चूंगच आणि आपल्याकडच्या हळदीच्या पानातल्या पातोळ्या या बहिणी आहेत. चिंचेची आंबटगोड चटणी असते तशाच प्रकारची चटणी चीनमध्येही मिळते. आपल्याकडे जसा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तसा चीनमध्ये सचुआन (ज्याला शेजवान म्हटलं जातं) या लाल मिरचीचा ठेचाही जिभेवर जाळ काढतो.

मुद्दा काय तर भाषेचा प्रसार जर का करायचा असेल तर त्यासाठी एक दुवा लागतो. मराठी आणि चिनी माणसामध्ये तो दुवा आहे. फक्त त्याला जरा पॉलिशिंगची गरज आहे. इतर देशांमध्ये जितक्या जल्लोषात आणि दिखावेपणाने मराठी भाषा दिन साजरा होतो तितक्या तीव्रतेने नाही झाला तर आनंदच आहे. पण भाषेचा आणि संस्कृतीचा अस्सलपणा जपत हा दिन कधीतरी चीनमध्येही साजरा व्हावा हीच आजच्या दिनी इच्छा.

(लेखक चिनी भाषेचा अभ्यासक असून काही काळ चीनमध्ये वास्तव्यास होते.)

Web Title: Marathi Bhasha Din: Maharashtrian culture in China and their Dr. Kotnis Connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.