Maratha Reservation: आंदोलनाला हिंसक वळण; चाकण पेटले, १६ वाहने खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 06:19 AM2018-07-31T06:19:27+5:302018-07-31T06:20:00+5:30

Maratha Reservation सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला सोमवारी चाकण येथे हिंसक वळण लागले. जमावाने एसटी, पुणे शहर वाहतूक सेवेच्या बस, कार, जीप व अग्निशमन बंबासह १६ वाहने पेटविली. शंभरावर वाहनांची तोडफोड झाली.

Maratha Reservation: 16 vehicles burn Violent turn By maratha Kranti Morcha at Chakan Pune | Maratha Reservation: आंदोलनाला हिंसक वळण; चाकण पेटले, १६ वाहने खाक

Maratha Reservation: आंदोलनाला हिंसक वळण; चाकण पेटले, १६ वाहने खाक

googlenewsNext

चाकण (जि. पुणे) : सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला सोमवारी चाकण येथे हिंसक वळण लागले. जमावाने एसटी, पुणे शहर वाहतूक सेवेच्या बस, कार, जीप व अग्निशमन बंबासह १६ वाहने पेटविली. शंभरावर वाहनांची तोडफोड झाली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत दोन पोलीस व्हॅनही जाळल्या. दगडफेकीत दोन पोलिसांसह एक नागरिक जखमी झाला. हिंसक आंदोलनामुळे सायंकाळी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीमार केला.
सकाळी राजगुरूनगर व चाकण येथे नाशिक-पुणे महामार्गावर शांततेत रास्ता रोको झाला. त्यानंतर तळेगाव चौकात आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांवरही दगडफेक सुरू केली. वाघेवस्तीजवळ पाच एसटी बस जाळल्या. काही बस पेटविल्या. जमाव वाहनांची जाळपोळ करत पुढे जात होता. बसस्थानकाच्या कार्यालयाला आग लावली. जाळपोळीचे फोटो काढणाऱ्यांचे मोबाइलही फोडले. इमारतींवरून फोटो काढणाºया तरुणांवर दगडफेक केली. त्यातही अनेक जखमी झाले. त्यानंतर तरुणांनी चाकण पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवला. चाकण पोलीस ठाण्यावर दगडफेक करत त्यांची दोन वाहने पेटविली. वाहतूक पोलीस चौकी जाळली.
साडेचारला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी स्थानिक आंदोलकांना तळेगाव चौकात शांततेचे आवाहन केले. जमावबंदी लागू झाल्यानंतर वातावरण निवळले. सकाळी साडेअकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक बंद होती.

अहवालाची वाट पाहू नका; शिवसेनेची मागणी
आर्थिक निकषांवर मराठा आरक्षण मंजूर करा, अशी मागणी करत, मागासवर्ग अहवालाची वाट न पाहता लवकर हा प्रश्न सोडवा, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. मातोश्रीवरील बैठकीनंतर सेनेचे मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

त्वरित निर्णय घेण्यासाठी सरकारवर दबाव
मराठा समाजाच्या बाजूने उभे राहात काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सरकारविरोधात राजीनामा अस्त्र उगारण्याचे नक्की केले आहे. सरकारवर दबाव आणला जावा, यासाठी हा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. आरक्षणावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोमवारी दिवसभर बैठकांचे सत्र पार पडले.
काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेने आमदारांची बैठक घेऊन सरकारवर दबाव आणण्याची रणनीती आखली. आंदोलकांमध्ये सरकार फूट पाडत आहे, असा आरोप अजित पवार व धनंजय मुंडे यांनी केला. काँग्रेस व राष्टÑवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल व मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना निवेदन सादर केले.
आरक्षणप्रश्नी काँग्रेस आमदारांनी बैठकीत सामूहिक राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला आहे.
मात्र, याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी सांगितले. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला.

सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम
शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे आजपर्यंत पाच तरुणांनी आत्महत्या केल्या. राज्यभर ठिय्या आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सोमवारी औरंगाबादला केली.
पाटील म्हणाले की, काहीजण राजकीय लाभासाठी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. आजपर्यंत पाच समाजबांधव आमच्यातून गेलेत. मराठा क्रांती मोर्चा सरकारला सात मुद्द्यांचा ‘फॉर्म्युला’ देत आहे. राज्यमागास आयोगाला अहवाल देण्यासाठी तातडीने विनंतीपत्र किंवा आदेश द्यावेत. पत्राची तारीख जाहीर करावी. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अध्यादेश काढण्याची तारीख जाहीर करावी, आयोगाचा अहवाल पूर्ण स्वीकारणार किंवा शिफारशी अंशत: स्वीकारणार, हे लगेच स्पष्ट करावे.

विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करा!
अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची तारीख जाहीर करावी. ‘मेगा’ नोकरभरती स्थगिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, बँकनिहाय कर्जप्रकरणे मंजूर करणे बंधनकारक करावे, आंदोलनात दाखल झालेले गुन्हे परत घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना देण्यात येणारे आदेश, शुल्कमाफी सवलत खासगी महाविद्यालयांना कायमस्वरूपी लागू करणार काय, मराठा आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या सर्वांना हुतात्मा म्हणून जाहीर करण्याची तारीख द्यावी. या सर्व मुद्द्यांवर शासनाने २४ तासांत कृती कार्यक्रम जाहीर करावा. शासनाची इच्छाशक्ती असेल तर हे करणे शक्य असल्याचे पाटील म्हणाले.

दोन गुणांमुळे नोकरीची संधी हुकलेल्या तरुणाची फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्या
औरंगाबाद : कृ षी पदवीधर असलेल्या प्रमोद जयसिंग होरे पाटील (३१, औरंगाबाद) याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर, लोकांनी जालना रोडवर सोमवारी रास्ता रोको केला. त्याची दोन गुणांमुळे ग्रामसेवकपदाची नोकरीची संधी हुकली होती. आरक्षण नसल्यामुळेच नोकरी लागली नाही, असे त्याचे मत बनले होते. दोन वर्षांपासून तो मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सक्रिय होता.
रविवारी दुपारी २.३२ वाजता प्रमोदने ‘चला आज एक मराठा जातोय...पण काहीतरी... मराठा आरक्षणासाठी करा, जय जिजाऊ... आपला प्रमोद पाटील’ अशी पोस्ट फेसबुकवर टाकली. सायंकाळी ४.५० वाजता त्याने रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी काढला. मराठा आरक्षणासाठी जीव जाणार, असे सांगत दोन छायाचित्रे असलेली दुसरी पोस्ट त्याने फेसबुकवर टाकली. रात्री त्याने देवगिरी एक्स्प्रेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Maratha Reservation: 16 vehicles burn Violent turn By maratha Kranti Morcha at Chakan Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.