मंजुळा शेट्ये महिला कैद्याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी कराः नीलम गो-हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 07:49 PM2017-06-27T19:49:43+5:302017-06-27T19:49:43+5:30

भायखळा कारागृहात महिला कैदी मंजू उर्फ मंजुळा शेट्ये हिला अमानुष मारहाण आणि हत्या प्रकरणाची शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी दखल घेतली

Manjula Shetty: Investigate the death of a woman prisoner: Neelam Go-O | मंजुळा शेट्ये महिला कैद्याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी कराः नीलम गो-हे

मंजुळा शेट्ये महिला कैद्याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी कराः नीलम गो-हे

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 - भायखळा कारागृहात महिला कैदी मंजू उर्फ मंजुळा शेट्ये हिला अमानुष मारहाण आणि हत्या प्रकरणाची शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी दखल घेतली आहे. त्यांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्रही लिहिलं आहे. पत्रात त्या म्हणाल्या, सन 1996मध्ये भावजयीच्या हत्येच्या गुन्ह्यात तिच्यासह तिच्या आईला 14 वर्षांची शिक्षा झाली होती. दरम्यानच्या काळात तिच्या आईचा मृत्यू झाला. मंजुळाने 13 वर्षे शिक्षा भोगली होती. तिला तीन महिन्यांपूर्वी येरवडा येथून भायखळा कारागृहात आणून तिच्या चांगल्या वागणुकीमुळे तिला वॉर्डनची जागा देण्यात आली होती. ती जेलरची मदतनीस म्हणून काम करीत होती.

शुक्रवारी सकाळी ९ वाजता मंजूने नेहमीप्रमाणे कैद्यांना अंडी आणि पाव वाटले. या वेळी दोन अंडी आणि ३ पाव कमी पडले. याबाबत जेल अधिकारी मनीषा पोखरकर हिने तिला खडसावून तिला कारागृहाच्या कार्यालयात नेले. तेथे अधीक्षक मनीषाने तिच्याकडे पुन्हा अंडी आणि पावांचा हिशेब मागितल्यावर तिच्याकडून व्यवस्थित माहिती न मिळाल्याने मनीषा पोखरकरसह बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणेने तिला मारहाण करून  तिच्या गळ्याभोवती साडी गुंडाळून तिला बरॅककडे आणण्यात आले.

केवळ किरकोळ कारणावरून तिला कारागृहाच्या अधीक्षकांसह इतर महिला अधिकाऱ्यांनी विवस्त्र करून बेदम झोडपून अमानुषतेचे टोक गाठले. यात ती बेशुद्ध पडली, पण तरीही मारहाण सुरूच होती. हा प्रकार सकाळी 11 वाजता घडूनही सायंकाळी 7 पर्यंत तिला कोणतीही वैद्यकीय मदत देण्यात आली नाही किंवा डॉक्टरांनाही कारागृह अधीक्षकांकडून कळविण्यात आलेले नाही. अखेर बराच वेळानंतर तेथे डॉक्टरांनी धाव घेतली. जे.जे. रुग्णालयात नेल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले. मंजुळा शेट्ट्ये हिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर जखमा आढळून आल्या असून,यामध्ये पाठीसह डोक्यावरील जखमांचा समावेश आहे. जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून, तिच्या शरीरातील नमुने वैद्यकीय तपासासाठी पाठविण्यात आले आहेत.

मंजुळा हिच्या मृत्यूची अपमृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. या प्रकरणी महिला कैद्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. या ठिकाणी सहा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कामात निष्काळजी दाखविल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह पाच सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

हा सर्व प्रकार पाहता ही एक अतिशय गंभीर व कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह  निर्माण करणारी घटना आहे. यामुळे महिला कैद्यांविषयी कारागृहातील अधिकारीवर्गाचा असलेला दूषित दृष्टीकोन दिसून येत असून त्यामुळे राज्यातील या यंत्रणेची प्रतिमा मलीन होणार आहे. मृत आरोपी मंजुळा शेट्टी यांना काही गोपनीय बाबी माहिती असतील तर त्यांची सुटका झाल्यावर त्या बाहेर पडून त्याची वाच्यता होईल की काय अशा भीतीने देखील हा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधिमंडळ स्तरावर पूर्वी एक महिला आमदारांची ह्यमहिला हक्क समितीह्ण स्थापन करण्यात आलेली होती. ही समिती कारागृहाच्या कारभाराचे निरीक्षण करून राज्य शासनाला याबाबत माहिती देत होती. मात्र कालांतराने ही समितीच अस्तित्वात नसल्याने हा अंकुश आता उरलेला नाही.   

याबाबत मी नागपाडा पोलीस स्टेशन, अप्पर पोलीस आयुक्त अखिलेश कुमार त्याचबरोबर कारागृह विशेष महानिरीक्षक राजवर्धन यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली आहे.  आरोपींवर कलम ३०२ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये याच कारागृहातील एक महिला कैद्याने दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर मी आपल्याकडे पुढील मागण्या करीत आहे.

१. या प्रकारांचे गांभीर्य लक्षात घेऊन मयत मंजुळा शेटये यांच्यावर अत्याचार करणा-या मनीषा पोखरकरसह बिंदू नाईकडे,वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे  या सर्व अधिकाऱ्यांची सखोल कसून चौकशी करून त्यांना ताबडतोब अटक करावी.

२. त्याचबरोबर राज्यातील सर्व कारागृहामध्ये महिला कैद्यांसाठी एक आश्वासक वातावरण तयार होण्यास्तव राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत आग्रही भूमिका आपण घ्यावी. तसेच या अचानकपणे घडलेल्या घटनेमागे कोणी उच्चपदस्थ

अधिका-याचा काही अंत:स्थ हेतू अथवा हात आहे किंवा काय हे तपासून पहाण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. 

३. या प्रकरणाचा तातडीने निकाल लागावा यासाठी ही केस न्यायालयात दाखल करण्यात येऊन न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. 

४. राज्यातील काराग्रुहांत असे प्रकार टाळण्याच्या हेतूने  कारागृहाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात याव्यात. त्याचबरोबर या घटनेबाबत इतर महिला कैद्यांना काही माहिती द्यायची असेल तर त्यांनी आपल्या नातेवाईक अथवा इतर व्यक्तींसोबत लिखित स्वरूपात कळविण्याची सोय करणे आवश्यक आहे.

५. या घटनेचा निष्पक्षपातीपणे तपास होण्याच्या दृष्टीने भायखळा कारागृहात तात्पुरता तपास कक्ष उभारण्याबाबत पोलिसांना परवानगी देण्यात यावी.

६. या घटनेची सविस्तर चौकशी कारागृह प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी करणार असल्याने त्यांना याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

७. महिला हक्क समितीचे पुनर्गठण करण्याबाबत कार्यवाही करण्याविषयी कार्यवाही करण्याबाबत संबधितांना सूचित करण्यात यावे.

Web Title: Manjula Shetty: Investigate the death of a woman prisoner: Neelam Go-O

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.