Maharashtra day: गोरगरिबांना मदत करणारा पुण्याचा आधुनिक धन्वंतरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 08:10 AM2018-05-01T08:10:00+5:302018-05-01T08:10:00+5:30

पुण्यातील डॉ अभिजित सोनावणे यांनी... आपली उत्तम नोकरी सोडून पुण्यातले डॉ. अभिजित सोनावणे सध्या 'भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर; अर्थात डॉक्टर फॉर बेगर ही भूमिका निभावत आहेत. एका भिक्षेकऱ्याने त्यांच्या निराशेच्या काळात धीर दिला आणि त्यांचे आयुष्य बदलले.

Maharashtra day: Dr. Abhijit Sonavane Doctor for Beggers from Pune | Maharashtra day: गोरगरिबांना मदत करणारा पुण्याचा आधुनिक धन्वंतरी

Maharashtra day: गोरगरिबांना मदत करणारा पुण्याचा आधुनिक धन्वंतरी

Next

पुणे- सगळं काही सुरळीत सुरु असत. आयुष्यात कसलीही चिंता नसते. पण तरी उगाच रितेपण वाटतं असतं. पण म्हणून आहे ते सोडून दुसऱ्यासाठी आणि फक्त समाधान या मोबदल्याकरिता कोणीही नवं काम सुरु करण्याची हिंमत दाखवत नाही. ती दाखवली आहे पुण्यातील डॉ अभिजित सोनावणे यांनी... आपली उत्तम नोकरी सोडून पुण्यातले डॉ. अभिजित सोनावणे सध्या 'भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर; अर्थात डॉक्टर फॉर बेगर ही भूमिका निभावत आहेत. एका भिक्षेकऱ्याने त्यांच्या निराशेच्या काळात धीर दिला आणि त्यांचे आयुष्य बदलले. मग आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावे असा ध्यास त्यांनी घेतला आणि सुरु झाला एक प्रवास अर्थात ''डॉक्टर फॉर बेगर''.

आज ते पुण्यातील तब्बल ७६१ भिक्षेकऱ्यांना मोफत औषधं पुरवतात. शिवाजीनगर गावठाणात असलेल्या त्यांच्या दवाखान्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील ३०% वाटा ते यासाठी पण देतात.  सध्या ते सोमवारी शंकर, मंगळवारी देवी, बुधवारी गणपती, गुरुवारी दत्त, स्वामी समर्थ, साईबाबा, शुक्रवारी मस्जिद आणि शनिवारी शनी, मारुती या मंदिरासमोर बसणाऱ्या भिक्षेकऱ्यांना भेटतात. त्यांच्याकडे या साऱ्यांची नोंद आहे. नेमके कशामुळे त्यांच्यावर ही वेळ आली याचाही शोध ते घेतात. या सगळ्यांमध्ये त्यांना काम करण्याची ईच्छा आहे का याची तपासणी ते करतात आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नही करतात. 

आत्तापर्यंत त्यांनी सुमारे ४२ भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करून झेपेल असे काम मिळवून दिले आहे. डॉक्टर सांगतात, मलाही सुरुवातीला रस्त्यावर बसणाऱ्या भिक्षेकऱ्यांसोबत बसायला काहीसं संकोचल्यासारखं वाटे.हळूहळू माझी भीड चेपल्यावर साधारण वर्षांनंतर आज मी त्यांच्यासोबत बसू शकतो, नव्हे त्यांच्यासोबत ते खातात ते खाऊही शकतो. आज त्यातील अनेकजण माझे भाऊ, आई, बहीण, वडील झाले आहेत. मग नातं निर्माण झाल्यावर मी त्यांना डॉक्टरची आई किंवा वडील भीक मागतात का, मग तुम्ही का मागता असं विचारायला लागलो. लोक आणून देतात ते उरलेलं किंवा टाकलेलं तुम्हाला खायला आवडतं का असाही प्रश्न विचारायचो. त्यातून सगळ्यांचा नसला तरी काहींचा स्वाभिमान तयार होतो. मग ते कारण सांगायला लागतात. 

मला दिसत नाही, अपंग आहे, गुडघे दुखतात अशी अनेक कारणं तयार असतात. मी ९० पेक्षा अधिक जणांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घेतले. शेकडो जणांना चष्मे वाटले. हे सगळे केले तरी त्यातल्या फक्त एक ते दोन टक्के लोकांना काम करण्याची इच्छा होते. हे प्रमाण इतकं कमी आहे की नैराश्य येतं, अनेकदा माझ्याकडे खूप पैसे आहेत म्हणून करतो असे शिक्केही मारले जातात, पण पुन्हा एखादा त्या दलदलीतून बाहेर पडून पायावर उभा राहतो आणि मला नवी ऊर्जा देऊन जातो. पण एवढंच नाही तर अनेकजण या कामात आर्थिक, शारीरिक आणि मानसिक मदत करत असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.
अनेकजण थांबून मदत करतात, काहीजण आर्थिक मदत करतात तर  दवाखान्यात बसून तासनतास ऑपरेशन झालेल्या भिक्षेकऱ्यांच्या सेवेसाठी थांबतात. सोनावणे यांना हे काम वाढवून जास्तीत जास्त भिक्षेकऱ्यांना स्वावलंबी बनवायचे आहे. त्यासाठी त्यांना व्यवसायानुरूप शिक्षण देण्याची त्यांची इच्छा आहे. या साऱ्यात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे समाजात अनेक जण भिक्षेकऱ्यांना देत असणारी भीक. जेव्हा मी स्वतः समोर बसून त्यांना स्वतः कमावण्याचं महत्व सांगतो तेव्हा अचानक कोणीतरी येऊन त्यांना पाच रुपये देऊन माझ्या तासांच्या मेहनतीवर पाणी टाकतो असेही ते सांगतात. मात्र तरीही कोणीतरी यातून बोध घेईल अशी कष्टाचं आयुष्य सुरु करेल असा आशावाद त्यांच्या मनात असतो. 

भिक्षेकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी मोफत औषधोपचार हे फक्त माझं निमित्त आहे पण ध्येय नाही. ज्यादिवशी  भिक्षेकरी तयार होणं थांबेल आणि आहेत त्यांचे पुनर्वसन होईल त्या दिवशी मी आनंदाने काम थांबवेल आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात समाधानाचा दिवस असेल या आशेवर त्यांचे काम अविरतपणे सुरु आहे.' स्व'च्या पलीकडे जात या खऱ्या अर्थाने समाजासाठी धन्वंतरी बनलेल्या डॉ सोनवणे यांच्या कार्याला लक्ष लक्ष सलाम !

Web Title: Maharashtra day: Dr. Abhijit Sonavane Doctor for Beggers from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.