शरद पवारांनी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत - आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 03:28 PM2024-04-11T15:28:38+5:302024-04-11T15:42:30+5:30

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

lok sabha elections 2024 MLA jitendra awhad made a big statement about Sharad Pawar citing MP Praful Patel's statement  | शरद पवारांनी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत - आव्हाड

शरद पवारांनी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत - आव्हाड

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यापासून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांवर झालेल्या प्रत्येक टीकेला उत्तर देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. आता त्यांनी प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या एका विधानाचा दाखला देत विरोधकांना डिवचले आहे. १९९६ मध्ये शरद पवार पंतप्रधान झाले असते पण काँग्रेसमुळे ते होऊ शकले नाही, असे पटेल यांनी सांगितले. यावर शरद पवारांनी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, १९९६ मध्ये देवेगौडा सरकारमध्ये असताना आणि सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी १० महिन्यांच्या आत सरकारमधून आपला पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी देवेगौडा यांनीच मला पवार साहेबांना काँग्रेसचे नेतृत्व करण्यास सांगा, मी राजीनामा देऊन त्यांना पाठिंबा देईन असे सांगितले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षातील सर्व नेते सीताराम केसरी यांच्यावर नाराज होते आणि त्यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली असती तर कदाचित पवार साहेब पंतप्रधान झाले असते.

पटेल यांच्या विधानाचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता एक बोलकी पोस्ट केली. त्यांनी सांगितले की, शरद पवार साहेब यांनी १९९६ साली संकोच केला. अन्यथा,  ते त्याचवेळेस पंतप्रधान झाले असते, असे महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याचे म्हणणे आहे. याचाच अर्थ आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांनी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत अन् स्वीकारणारही नाहीत. ते संकोच करू शकतात. पण, ते सत्तापिपासू नाहीत.

बुधवारी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत मोठा खुलासा करत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, २ जुलै २०२३ रोजी अजित पवार आणि आमच्या मंत्र्यांनी आताच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर १५-१६ जुलै रोजी मुंबईत शरद पवार यांची दोनदा भेट घेऊन त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि आमच्यासोबत येण्याची त्यांना विनंती केली. आम्हाला तुमच्या नेतृत्वाखालीच काम करायचे आहे, असेही आम्ही त्यांना सांगितले. 

Web Title: lok sabha elections 2024 MLA jitendra awhad made a big statement about Sharad Pawar citing MP Praful Patel's statement 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.