दिव्यातील रेल्वे घातपात : मुंब्रा पोलिसांकडे सबळ पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2017 03:56 AM2017-05-03T03:56:35+5:302017-05-03T03:56:35+5:30

दिव्यातील रेल्वे घातपात प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले, तरी या टोळीचा पर्दाफाश

Lightning incident in the light: strong evidence against Mumbra police | दिव्यातील रेल्वे घातपात : मुंब्रा पोलिसांकडे सबळ पुरावे

दिव्यातील रेल्वे घातपात : मुंब्रा पोलिसांकडे सबळ पुरावे

Next

ठाणे : दिव्यातील रेल्वे घातपात प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले, तरी या टोळीचा पर्दाफाश करणारे मुंब्रा पोलीस त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. या प्रकरणातील आरोपींच्या कबुलीजबाबाचे चित्रीकरणच उपलब्ध असल्याचा दावा मुंब्रा पोलिसांनी केला आहे.
२४ जानेवारी रोजी दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर ३५२ किलोग्रॅमचा गंजलेला रुळाचा तुकडा टाकून मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसचा घातपात घडविण्याचा प्रयत्न झाला होता. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात २५ जानेवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. १३ एप्रिल रोजी मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी दानिश अकबर शेख, सूरज दिनेश भोसले, मोहम्मद शब्बीर मोहम्मद नसीम शेख, नजीर उस्मान सय्यद आणि जयेश नागेश पारे या पाच आरोपींना अटक केली होती. मुंब्रा येथील सराईत गुन्हेगार मौला मकानदार याच्या सांगण्यावरून आपण रेल्वे रुळावर गंजलेला लोखंडी रूळ ठेवला होता, अशी कबुली आरोपींनी दिल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १४ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत दिली. या पाचही आरोपींसह एका गुन्ह्यामध्ये तळोजा कारागृहात असलेल्या मौला मकानदारलाही ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीत घेतले. तेव्हापासून आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागावर प्रश्न उपस्थित होऊ लागले.
आरोपी गर्दुल्ले असून, ते ३५० किलोचा लोखंडी रूळ उचलूच शकत नाहीत, मोबाइल फोनच्या लोकेशननुसार घटनेच्या वेळी एक आरोपी नाशिक येथे होता, अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने मुंब्रा पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. यासंदर्भात मुंब्रा पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपैकी एक आरोपी मुंब्रा पोलिसांचा खबरी होता. त्यानेच संपूर्ण माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली होती. परंतु गुन्ह्यातील त्याचा सहभाग दुर्लक्ष करण्यासारखा नसल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी त्यालाही आरोपी केले. मौला मकानदार हा सराईत गुन्हेगार आहे, तर आरोपींपैकी एकाच्या मोबाइल फोनचे लोकेशन घटनेच्या वेळी नाशिक येथे होते, याचा अर्थ तो आरोपी घटनास्थळी नव्हता, असा होत नाही. ३५० किलोचा रूळ उचलून रेल्वे रुळावर ठेवण्याइतपत शारीरिक क्षमता आरोपींमध्ये नाही, असा आणखी एक युक्तिवाद लोहमार्ग पोलिसांनी केला. पण प्रत्यक्षात ३५२ किलो वजन पाच व्यक्तींसाठी उचलणे तेवढे कठीणही नाही, असे मुंब्रा पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

वाद केवळ श्रेय लाटण्यासाठी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद केवळ श्रेय लाटण्याचा आहे. आरोपींनी रेल्वेचा घातपात करण्याचा प्रयत्न अवघ्या २ हजारांच्या पैजेसाठी केला होता. अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेची कामगिरी लोहमार्ग पोलिसांनी करणे अपेक्षित असताना, ती मुंब्रा पोलिसांनी केली. आता या आरोपींकडून आणखी कोणकोणती माहिती काढता येईल, त्यांचे आणखी साथीदार आहेत का, हे तपासणे गरजेचे आहे. भविष्यात त्यांनी असे गुन्हे करू नयेत यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी आरोपींची तळी उचलून त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न होत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Lightning incident in the light: strong evidence against Mumbra police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.