#KamalaMillsFire: महापालिकेच्या पाच अधिका-यांचे निलंबन, चौकशी अहवाल १५ दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 04:34 AM2017-12-30T04:34:06+5:302017-12-30T04:34:22+5:30

मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये ‘मोजोस ब्रिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या पबला लागलेल्या आगीप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिका-यांचे तत्काळ निलंबन तर जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

#KamalaMillsFire: Five municipal officials suspended, inquiry report in 15 days | #KamalaMillsFire: महापालिकेच्या पाच अधिका-यांचे निलंबन, चौकशी अहवाल १५ दिवसांत

#KamalaMillsFire: महापालिकेच्या पाच अधिका-यांचे निलंबन, चौकशी अहवाल १५ दिवसांत

Next

मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमध्ये ‘मोजोस ब्रिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या पबला लागलेल्या आगीप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिका-यांचे तत्काळ निलंबन तर जी दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या पबमधील बेकायदा बांधकाम, आग प्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल येत्या १५ दिवसांमध्ये सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समिती बैठकीत दिली.
गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत उमटले. कमला मिल कम्पाउंडमध्ये असे अनेक रेस्टॉरंट असून बेकायदा बांधकामही मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला. साकीनाका येथे १८ डिसेंबर रोजी फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा मृत्यू झाला होता. महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदा बांधकाम आणि आगीशी खेळ सुरू आहे. त्यामुळे अशा घटनांसाठी विभागातील अधिकारी आणि साहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरावे, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली.
स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरताच आयुक्त अजय मेहता यांनी पाच अधिकाºयांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. कर्तव्यात कसूर केल्याचे सकृतदर्शनी आढळून आल्याने जी दक्षिण विभागातील इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे आणि साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे या पाच अधिकाºयांचे निलंबन केले आहे. यापैकी काही अधिकाºयांची यापूर्वीच दुसºया विभागात बदली झाली असून त्यांच्या कार्यकाळात कमला मिलमधील बांधकामाला परवानगी दिल्याने त्यांना या दुर्घटनेसाठी प्रथमदर्शी जबाबदार धरण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
>घटनेची चौकशी सुरू
प्रत्येक दुर्घटनेची चौकशी महापालिकेमार्फत सुरू करण्यात येते. मात्र या चौकशीत बरेच महिने जातात. त्यामुळे अहवाल सादर होण्यास विलंब होतो; परिणामी दोषींवर कारवाई होईपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. मात्र कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतल्यामुळे पालिका आयुक्तांनी आजपासूनच चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
>...अन् हॉटेलच्या स्वच्छतागृहातून काढले १२ मृतदेह
आगीमुळे निर्माण झालेला धूर, त्यात पसरलेला काळोख यामुळे ‘वन अबव्ह’मध्ये एकच पळापळ सुरू झाली. तेथील कर्मचारीही गायब झाल्याने ग्राहकांची आणखीनच तारांबळ उडाली. अखेर त्यांनी बचावासाठी स्वच्छतागृहाचा आधार घेतला. मात्र याच आधारात १२ जणांचा श्वास कोंडला; आणि त्यांचा मृत्यू झाला. लोअर परळच्या वन अबव्हमध्ये लागलेल्या आगीची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू झाले. याच बचावकार्यादरम्यान येथील स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडून १२ जणांना बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत या १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. स्वच्छतागृहात दाटीवाटीने उभ्या असलेल्या १२ जणांचा श्वास कोंडला. त्यांना बाहेर काढले तेव्हा ते ज्या अवस्थेत उभे होते तशाच अवस्थेत त्यांना बाहेर काढण्यात आले. या थरकाप उडविणाºया दृश्यामुळे बचाव पथकही क्षणभर हादरले.
>पोटासाठी आला अन् जिवानिशी गेला
ओरिसा येथील बालासोर येथून रोजगारासाठी मुंबईत आलेला सरबजीत परीदा (२२) या तरुणाचा लोअर परळच्या दुर्घटनेत मृत्यू झाला. केवळ सहाच महिन्यांपूर्वी त्याने कॅप्टन म्हणून मोजोस ब्रिस्ट्रो या हॉटेलमध्ये कामास सुरुवात केली होती. मात्र गुरुवारची रात्र ही त्याच्या कामाची अखेरची रात्र ठरली. घरची परिस्थिती बेताची असल्याने सरबजीतने पोटासाठी मुंबईत धाव घेतली होती. त्याच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, अविवाहित असलेला सरबजीत मेहनती आणि प्रामाणिक होता. कुटुंबासाठी खूप काही करण्याची त्याची इच्छा होती. शुक्रवारी दुपारी विमानाने त्याचा मृतदेह भुवनेश्वर येथे नेण्यात आला. तेथून बालासोरमध्ये गेल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
>वाहनतळाच्या
जागेत पब
कमला मिलचा मालक रमेश गोवानीने वाहनतळासाठी परवानगी घेतलेल्या जागी पब उभारले होते. त्यांचा ‘चेंज आॅफ युझर’ स्वत: मालकच द्यायचा आणि ते पालिका अधिकारी मान्य करुन परवानगी देत होते, अशी चर्चा पालिका वर्तुळातून होत आहे.
>घटनास्थळी असलेली अत्यावश्यक सेवा
८ फायर इंजिन, ५ जंबो टँकर , २ एएलपी, १ टीटीएएल, १ बीए व्हॅन, १ सीपी, ७ रुग्णवाहिका, १ इव्हीएमएस व्हॅन
>आयुक्तांनी दबावामुळे कारवाई रोखल्याचा संशय
निलंबित सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी वन अबव्ह आणि मोजोसचे पावसाळी शेड पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महापालिका आयुक्त यांनी माजी डीजीपी के.के. पाठक यांच्या दबावामुळे कारवाई होऊ शकली नाही, अशी चर्चा पालिका अधिकाºयांमध्ये सुरू आहे.
>घटनाक्रम
गुरुवारी रात्री
12.27 : वन अबव्ह पब आणि मोजोस ब्रिस्ट्रोला आग
12.30 : अग्निशमन दलाला वर्दी
12.37 : वरळी येथील दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
12.37 : आगीचा स्तर २ म्हणून घोषित
12.55 : आगीचा स्तर ३ म्हणून घोषित
04.52 : आग आटोक्यात
06.23 : आग पूर्णपणे विझली

Web Title: #KamalaMillsFire: Five municipal officials suspended, inquiry report in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.