मुलाखत : मळलेल्या वाटेने जाणाऱ्या व्यक्तिमत्वांवर लिहिण्यात रस नाही : वीणा गवाणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:25 PM2018-12-06T12:25:20+5:302018-12-06T12:26:11+5:30

‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाद्वारे साहित्यविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धहस्त लेखिका म्हणजे वीणा गवाणकर. वीणाताईंसारख्या एका प्रतिभावंत लेखिकेची ३४ व्या स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद. 

Interview: I do not want to write on the goings-on: Veena Gawankar | मुलाखत : मळलेल्या वाटेने जाणाऱ्या व्यक्तिमत्वांवर लिहिण्यात रस नाही : वीणा गवाणकर

मुलाखत : मळलेल्या वाटेने जाणाऱ्या व्यक्तिमत्वांवर लिहिण्यात रस नाही : वीणा गवाणकर

googlenewsNext
ठळक मुद्दे३४ व्या स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

नम्रता फडणीस 
लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काय भावना आहे?
- थोडं आश्चर्य वाटत आहे!  माझ्या लेखनाचे विषय हे कथा, कादंब-यांचे कधीच राहिलेले नाहीत. लेखनाचा एखादा अनपेक्षित मार्ग गवसतो, जो आपल्या आवडीचा असतो. त्या मार्गाने पुढे जात असताना कधीतरी तीस-चाळीस वर्षांनी त्याची दखल घेतली जाते. याचा आनंद आहे. अध्यक्षपद हा एक भाग झाला पण तसा वाचकांशी अनेक वर्षांपासून संबंध आहे.
* ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकामुळे एक लेखिका म्हणून तुम्ही नावारूपाला आलात, या पुस्तकाच्या ४२ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. काही वर्षातच अर्धशतक पूर्ण होईल. या पुस्तकाला वाचकांनी इतका उदंड प्रतिसाद दिला, त्याच्या यशाचे गमक काय वाटते? 
- वाचक अजूनही स्वत:ला या पुस्तकाशी रिलेट करीत आहे  हेच या पुस्तकाच्या यशाचे गमक आहे. ’कावर््हर’ म्हणजे फक्त शेती नाही तर त्यामधील ज्या वृत्ती किंवा प्रवृत्ती आहेत त्या कालातीत आहे. जिदद, प्रामाणिकपणा, कष्ट घेण्याची तयारी, स्वत:चे ध्येय साध्य होण्यासाठी अविरत प्रयत्न, कधी स्वत:चे स्खलन होऊ न देणे ही मूल्ये त्यात दिसतात त्याच्याशी वाचक नकळतपणे रिलेट करतो. अत्यंत सामान्य परिस्थितीमधला माणूस जर हे करू शकतो तर आपण त्याच्यापेक्षा अधिक सुस्तीत आहोत. कुठेतरी त्यात यशाचा मार्ग दिसतो, म्हणून अजूनही वाचक स्वत:ला त्याच्याशी जोडू शकतात. या पुस्तकाचा काही अंश अभ्यासक्रमांमध्ये देखील समाविष्ट करण्यात आला आहे. 
* चरित्रलेखनाकडेच का वळावेसे वाटले? 
- मी मुळात वाचणारी आहे. माझे हिरो,हिरॉईंन्स मला कथा, कादंब-यांमध्ये दिसत नाहीत आणि कथा, कादंबºया लिहिण्याचा माझाही पिंडही नाही. जर   ही कादंबरी असती तर ती टिकली असती का? आज ४० वर्षांनंतरही कोणत असं पुस्तक आहे ज्याच्याशी वाचक स्वत:ला जोडून घेतात. चरित्र ही  सत्य घटनांवर आधारित आहे म्हणून वाचक  त्याच्याशी रिलेट होतात. आजही लोक इंटरनेटवर शोधून सत्यतेची पडताळणी करू शकतात. एखाद्याचे चरित्र आवडले तर ४०० ते ५०० पुस्तकांचे संदर्भग्रंथ वाचणे, त्याचा शोध घेणे यामागे नक्क्कीच मेहनत आहे.  ती व्यक्तिमत्व कशी होती? काय प्रयत्न केले? अडचणी कुठल्या आल्या? ती कशी टिकली? त्याचे वेगळेपण कुठले आहे त्या पार्श्वभूमीचा शोध घेणे. यासाठी अवांतर वाचन महत्वाचे आहे. माझा व्यक्ती समजून घेण्याकडे सातत्याने ओढा आहे.  
*  मराठीमध्ये चरित्रात्मक लेखन प्रकार काहीसा दुर्लक्षित राहिलाय असे वाटते का?
- नाही, मला असे वाटत नाही. साहित्यिकांवर अनेकजणांनी मराठीत लेखन केले आहे. मात्र त्यांच्यापेक्षा माझ्या लेखनात नक्कीच फरक आहे. मी केवळ चरित्र लिहित नाही तर माणसाने चौकटीबाहेर जाऊन काय विचार केलाय, नवीन विचार काय दिलाय. संपूर्ण मानवजातीचा काय स्तर उंचावलाय, हे जाणून घेण्याची मला ओढ आहे. मळलेल्या वाटेने जाणा-या लोकांमध्ये मला रस नाही, म्हणून राजकारण्यांवर कधी लिहिलेले नाही. राजकीय व्यक्तींकडूनच अनेक आॅफर्स आल्या आमच्यावर लिहा , मात्र नकार दिला. 
* तुम्ही स्त्री सहित्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहाता?
- स्त्रिया मोकळेपणाने लिहायला लागल्या आहेत, ही चांगली गोष्ट आहे. एक व्यासंग घेऊन त्याच्यामधून लिहिण्याचा भाग निराळा. प्रतिभावंत किंवा सिद्धहस्त लेखक असाल तर प्रश्नच नाही. पण  काही मांडू इच्छिणाºया  स्त्रियांनी लिहित राहायला हवे.  परंतु ते लेखन छापण्याची घाई करू नये. कारण ते योग्यपद्धतीने एडिटिंग झालेले नसते. ते तसेच ठेवा आणि मग त्याच्याकडे ति-हाईत म्हणून पाहा. तीन महिने ते लेखन शेल्फवर राहिले पाहिजे. लेखकाला स्वत:चे लेखन आधी समजले पाहिजे त्याच्यावर आधी काहीतरी परिणाम झाला पाहिजे. 
*  महिलांविषयक लेखन करणाऱ्या किंवा रूढी परंपरेच्या चौकटीबाहेर मत मांडणाऱ्या महिलांवर ‘स्त्रीवादी’ किंवा ‘बंडखोर’ लेखिका अशी लेबल लावली जातात, त्याविषयी काय वाटते?
- जुन्या काळात महिलांना काय वाटते हे पुरूषच लिहित होते. सगळ्या तिच्या भूमिका पुरूषांच्या तोंडी होत्या. ताराबाई शिंदे, मालती बेडेकर, विभावरी शिरूरकर या महिलांनी स्त्रियांचे भावविश्व मांडायला सुरूवात केली. आता स्त्रिया सहजीवन, लैगिंक भावना याबददल मोकळेपणाने लिहू लागल्या आहेत. स्त्रीवाद’ म्हणजे पुरूषविरोधात लेखन नव्हे. तर त्यांना काय वाटते हे त्यांच्याच शब्दातं मांडणे आहे. कुठलीही रूढ चौकट मोडली की ती बंडखोरच ठरवली जाते. 
* आगामी कोणते लेखन सुरू आहे? ते वाचकांच्या भेटीला कधी येणार?
-  इस्त्राइलची महिला राष्ट्राध्यक्षा गोल्डा मेयर यांच्यावर लेखन सुरू आहे. ते लेखन अंतिम टप्प्यात आहे. दीड महिन्यात हे पुस्तक प्रकाशित होईल. 

Web Title: Interview: I do not want to write on the goings-on: Veena Gawankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.