वायुप्रदूषणामुळे अडीच वर्षांनी घटले भारतीयांचे आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 05:42 AM2019-07-07T05:42:18+5:302019-07-07T05:42:26+5:30

संडे अँकर । अहवालाद्वारे उघड; श्वसनाशी निगडित विकारांमध्ये झाली वाढ

India's life reduced by two-and-a-half years due to air pollution | वायुप्रदूषणामुळे अडीच वर्षांनी घटले भारतीयांचे आयुष्य

वायुप्रदूषणामुळे अडीच वर्षांनी घटले भारतीयांचे आयुष्य

Next

- स्नेहा मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवसागणिक वायुप्रदूषणाचे वाढते प्रमाण ही जागतिक समस्या बनली आहे. गेल्या काही वर्षांत सर्व वयोगटातील नागरिकांना या वायुप्रदूषणाचे दूरगामी परिणाम सहन करावे लागत आहेत. परिणामी, सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हार्मेंट या संस्थेच्या अहवालानुसार, वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे भारतीयांचे आयुष्य दोन वर्षे सहा महिन्यांनी घटले असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. देशातील वायुप्रदूषण हे आरोग्यविषयक आजारांमधील तिसरे अतिजोखमीचे कारण बनले आहे.


या अहवालानुसार, घरातील प्रदूषण आणि वातावरणातील प्रदूषण यांमुळे श्वसनाशी निगडित विकारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. धूम्रपानानंतर वायुप्रदूषणामुळे आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम हे मृत्यूमागील मुख्य कारण आहे. जागतिक पातळीवर आयुर्मान घटण्याच्या प्रमाणाशी तुलना करता देशातील प्रमाण अधिक असल्याचे चिंताजनक निरीक्षण अहवालात नोंदविले आहे. बाह्य वातावरणातील प्रदूषणामुळे एक वर्ष आणि सहा महिन्यांनी आयुष्य घटते, तर घरातील प्रदूषणामुळे एक वर्ष, दोन महिन्यांनी आयुष्य घटल्याची नोंद अहवालात आहे. घरातील प्रदूषणाचे बाह्य प्रदूषणापेक्षा तिपटीने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम दिसून येतात.


वायुप्रदूषणामुळे होणाºया श्वसनविकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यात ४९ टक्के नागरिकांना दीर्घकालीन फुप्फुसांचे आजार झालेले दिसून येतात. तर ३३ टक्के व्यक्तींचा मृत्यू फुप्फुसाच्या कर्करोगाने होत आहे. याखेरीज, मधुमेह व हृदयविकारांचे प्रमाण १५ टक्के असल्याचे आढळले आहे. त्याचप्रमाणे, श्वसनाच्या विकारांचे प्रमाण अगदी कमी वयातच दिसून येत असल्याची गंभीर बाब या अहवालात नमूद आहे. श्वसनाद्वारे सूक्ष्म अल्ट्रा कण शरीरात जातात, ते कण पेशी, रक्तप्रवाहातही पसरतात. वायुप्रदूषणातील विषारी वायूमुळे सर्व वयोगटातील व्यक्तींना दीर्घकालीन शारीरिक आणि मानसिक आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

दहा वर्षांत चारपट वाढ
घरात आणि बाहेर होणाºया वायुप्रदूषणामुळे होणाºया मृत्यूंच्या प्रमाणात दहा वर्षांत चार पट वाढ.
जगातल्या दर आठ मृत्यूंमध्ये एक मृत्यू वायुप्रदूषणामुळे होत आहे.
भारत आणि चीनमध्ये जगात वायुप्रदूषणाचे सर्वाधिक बळी गेल्याचे उघड.

प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे
वायुप्रदूषणामुळे श्वसनाच्या विकारांत वाढ झाली आहे. याची प्राथमिक लक्षणे अ‍ॅलर्जीच्या माध्यमातून दिसतात; आणि नंतर त्याचे रूपांतर दीर्घकालीन आजारांत होते. अशा स्थितीत वेळीच लक्षणे ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. कानात बुरशी होणे, लहान वयात श्वसनास त्रास होणे, नाकाच्या आत सूज येणे, डोळ्यांत जळजळ होणे, ब्रॉन्कायटीस अशा लहान लक्षणांपासून आजारांची सुरुवात होते. अशा वेळी वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार घ्यावा. योगासने, प्राणायाम करावा.
- डॉ. श्रीनिवास चव्हाण, प्रा. व विभागप्रमुख, कान-नाक-घसा, जे. जे. रुग्णालय

Web Title: India's life reduced by two-and-a-half years due to air pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.