ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 05:50 AM2023-03-03T05:50:16+5:302023-03-03T05:50:52+5:30

सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारला पूर्ण करण्याचे सूतोवाच सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले होते. यानुसार नीरज कौल यांनी लवकरच युक्तिवाद संपविला.

If Thackeray had faced the majority test...; A sudden entry into the argument from Harish Salve in Supreme Court | ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री

ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर...; हरीश साळवेंकडून युक्तीवादात अचानक एन्ट्री

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनापीठासमोर सुरू असलेला युक्तिवाद संपण्याची चिन्हे असताना शिंदे गटाकडून आज ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी ऑनलाइन युक्तिवादाला सुरुवात केली. यामुळे घटनापीठासमोरील आजचे वेळापत्रक विस्कळीत झाले. होळी सणामुळे पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज होणार नसल्याने पुढील सुनावणी आता १४ मार्चला होणार आहे.

सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारला पूर्ण करण्याचे सूतोवाच सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले होते. यानुसार नीरज कौल यांनी लवकरच युक्तिवाद संपविला. यानंतर शिंदे गटाचे महेश जेठमलानी युक्तिवाद करणार होते. परंतु अचानकपणे हरीश साळवे यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. उपाहारापर्यंत त्यांनीच युक्तिवाद सुरू ठेवला. अखेर सरन्यायाधीशांनी सर्वांना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, असे सांगून आता संपूर्ण युक्तिवाद शक्य नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

हरीश साळवे नेमके काय म्हणाले?
हरीश साळवे म्हणाले की, आता सर्वोच्च न्यायालयाने केवळ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घ्यावा. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर काहीही घडू शकले असते. राजकारणात काहीही घडू शकते. यासाठी त्यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला. 

तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली व्यक्ती पुढील मंत्रिमंडळात पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्याचे उदाहरण आहे. ठाकरे यांनी या शक्यतेची संधी गमावली. मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्याने शिंदे यांना पाचारण  करण्याशिवाय राज्यपालांकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. 

आता काळ बराच पुढे गेला आहे. अपात्रतेची नोटीस दिलेल्या आमदारांनी अनेक ठरावांवर मतदान केलेले आहे. यामुळे मागे जाण्यात काहीही अर्थ नाही. केवळ चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा. यावर निर्णय घेण्यासाठी कालबद्धतेचे निर्बंध घालावे, अशी सूचनाही साळवे यांनी केली.

Web Title: If Thackeray had faced the majority test...; A sudden entry into the argument from Harish Salve in Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.