"I am being pushed out of the party", angry Eknath Khadseen Congress convenor | ''मला पक्षाबाहेर ढकलले जात आहे'', नाराज एकनाथ खडसेंना काँग्रेसची आॅफर
''मला पक्षाबाहेर ढकलले जात आहे'', नाराज एकनाथ खडसेंना काँग्रेसची आॅफर

रावेर (जि. जळगाव) : ४० वर्षे पक्ष वाढवण्यासाठी काम केले. त्यामुळे पक्ष सोडण्याची इच्छा काय... मनात विचारही नाही. मात्र मला पक्षाबाहेर ढकलले जात आहे. जर पक्ष सोडायला भाग पाडत असाल तर माझ्यासमोर मात्र दुसरा पर्याय नाही, अशी मनातील सल भाजपाचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी बोलून दाखविली. यावर दिलेर दोस्ताला केव्हाही आवाज द्या, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी खडसेंना काँग्रेस प्रवेशाची आॅफर दिली.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त येथे झालेल्या समारंभात या दोन्ही नेत्यांसह विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, माजी खासदार ईश्वरलाल जैन उपस्थित होते.
खडसे म्हणाले की, ‘बैठे है हम कुंजोमे गुन्हेगार बनके...’ असे वाटू लागल्याने मी सरकारला, पक्षाला व नेत्यांना जाब विचारतोय की, गेल्या २० महिन्यांत दाऊदच्या पत्नीशी बोलल्याचे, गैरव्यवहाराचे, भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. आपण चौकशीही केली. माझ्याविरुद्ध लाचलुचपतीचे तीन गुन्हे दाखल केले. मी कुठे दोषी आहे, याचे मला उत्तर हवे आहे.
खडसेंसारखा स्वाभिमानी नेता नाही - चव्हाण
खडसेंच्या भाषणाचा धागा पकडत अशोक चव्हाण म्हणाले, खडसे हे तत्त्वनिष्ठ राजकारणी आहेत. आजची खुर्चीसाठीची लाचारी पाहता खडसेंंसारखा एकही स्वाभिमानी नेता राज्यात नाही. स्वाभिमानी पक्ष काढणाºयांची आज काय अवस्था आहे ते आपण पाहतोय.
ते भाजपा सोडणार नाहीत - दानवे
खडसे भाजपा सोडणार नाहीत. ते लवकरच भाजपाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील, असा विश्वास प्रदेश भाजपाचे अध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मुंबईत व्यक्त केला.


Web Title: "I am being pushed out of the party", angry Eknath Khadseen Congress convenor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.