महामुंबईतील तरुणाई हुक्क्याच्या गर्तेत

By admin | Published: May 30, 2017 06:13 AM2017-05-30T06:13:21+5:302017-05-30T06:13:21+5:30

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबई, पनवेलला अमली पदार्थांचा विळखा पडू लागला आहे. हॉटेलच्या

In the heart of the Great Mumbai, | महामुंबईतील तरुणाई हुक्क्याच्या गर्तेत

महामुंबईतील तरुणाई हुक्क्याच्या गर्तेत

Next

सूर्यकांत वाघमारे/ लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबई, पनवेलला अमली पदार्थांचा विळखा पडू लागला आहे. हॉटेलच्या आडून मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर चालविले जात आहेत. ‘लोकमत’ने वाशी, एपीएमसी, कोपरखैरणे परिसरात केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये मध्यरात्रीपर्यंत व काही ठिकाणी पहाटे चार वाजेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आले असून तरुणाई पूर्णपणे नशेच्या आहारी जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
प्राचीन काळात राजेशाही थाटाचा एक भाग असलेल्या हुक्क्याचे लोन राजस्थान, पंजाब तसेच हरियाणा येथून महाराष्ट्रापर्यंत पोचले आहे. मुळात १०० सिगारेटच्या धुरापेक्षाही अधिक घातक हुक्क्याचे ४० ते ४५ मिनिटाचे एक सत्र (सेशन) असतानाही केवळ फ्लेवरच्या मोहापोटी व लाइफस्टाइल म्हणून तरुणांकडून पसंती मिळताना दिसत आहे. हुक्का पार्लर चालवायचे असल्यास ४२ अटींचे पालन करणे सक्तीचे आहे. या अटींचे पालन करणे शक्य होत नसल्याने पोलीस, अन्न व औषध प्रशासनासह संबंधित सर्व शासकीय यंत्रणांना हाताशी धरून नवी मुंबई व पनवेल परिसरात बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविले जात आहेत. काही ठिकाणी हुक्काच्या आडून अमली पदार्थ पुरविले जात आहेत. लोकमतने केलेल्या पाहणीमध्ये कोपरखैरणेमध्ये २, महापेमध्ये १, वाशीमध्ये ३, एपीएमसी परिसरात ४, सानपाडा, शिरवणे, कामोठे, नेरूळमध्ये प्रत्येकी १ व सीवूडमध्ये दोन ठिकाणी हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आले. मॉल, जास्त वापरात नसलेल्या इमारती, हॉटेलचे टेरेस याशिवाय व्यावसायिक वापराच्या गाळ्यांचा त्यासाठी वापर होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला बंदी असल्यामुळे ज्या हॉटेलमध्ये ३० पेक्षा जास्त खोल्या, अथवा ३० पेक्षा जास्त खुर्च्या असतील त्यांना ग्राहकांसाठी स्वतंत्र ‘स्मोकिंग झोन’ तयार करण्यास अनुमती आहे. त्याकरिता शासनाने नियम व अटी ठरवून दिल्या आहेत. याच स्मोकिंग झोनच्या नावाखाली स्वतंत्र जागेत हे हुक्का पार्लर आहेत. परंतु हॉटेलच्या परवाना प्रक्रियेतून वगळल्याने, त्याठिकाणी कारवाईचे देखील अधिकार नसल्याचे पोलिसांकडून भासवले जात आहे. काही हुक्का पार्लर चालकांचे हितसंबंध थेट मंत्रालय स्तरावर असल्यामुळे स्थानिक पोलिसांनाही त्यांच्यावर कारवाई करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या हुक्का पार्लरमागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडलेले असल्यानेच या अवैध व्यवसायाला अभय मिळू लागले आहे. प्रत्येकाचे हात ओले होत असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचेही बोलले जात आहे. एपीएमसी मॅफ्को मार्केटलगतच्या आवारात एका कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर हुक्का पार्लर सुरू आहे. विशेष म्हणजे त्याठिकाणी बिलाची रक्कम क्रेडिट अथवा डेबिट कार्डने भरल्यास ती हॉटेलच्या नावाऐवजी संबंधित कंपनीच्याच बँक खात्यात जमा होत आहे. बिनधास्तपणे सुरू असलेल्या या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष

कामोठे सेक्टर ३१ येथे सोसायटीचा विरोध असतानाही हुक्का पार्लर चालवले जात आहे. या हुक्का पार्लरवर कारवाई होऊ नये याकरिता संबंधितांनी अनेकांशी आर्थिक बांधणी केल्याची चर्चा आहे. त्यांच्याच नेरुळमधील ‘निर्वाणा’ हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तीन महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. त्यावेळीदेखील आयुक्तालयाबाहेरील काही पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे. त्यानंतरही नवी मुंबई पोलिसांनी हुक्का चालकावर तसेच कामगारांवर गुन्हा दाखल करून सहा खटले भरले आहेत.



पोलीस झटकताहेत जबाबदारी

हॉटेलसाठी लागणाऱ्या परवानग्यांमधून वगळण्याच्या कारणावरून पोलिसांकडून हुक्का पार्लरवर कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. रात्री उशीरापर्यंत हुक्का पार्लच्या ठिकाणी तरुण तरुणी जमत असल्यामुळे नशेमध्ये जुने वाद उद्भवुन हानामारीच्या घटना घडण्याचीही शक्यता आहे.
नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर ‘टोबॅको अ‍ॅक्ट‘ नुसार पोलिसांना देखील कारवाईचे अधिकार आहेत. शिवाय हुक्क्याच्या ठिकाणी अन्न अथवा पाणी देण्याला मनाई असतानाही, तशी सुविधा दिली जात आहे. यामुळे सर्रासपने हुक्का पार्लमध्ये नियमांची पायमल्ली करुन ग्राहकांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचे दिसत आहे.
शहरात हुक्का पार्लरच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यांच्याकडे योग्य परवाने आहेत की नाही, हे पालिकेसह अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांकडून तपासले जाने गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नसल्यामुळे संबंधीत सर्वच यंत्रनेच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.


‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये निदर्शनास आलेल्या गोष्टी

कोपरखैरणेमध्ये २, महापे, सानपाडा, शिरवणे, नेरूळमध्ये प्रत्येकी १, वाशी पामबीच रोडवर ३ व एपीएमसी परिसरामध्ये ४ ठिकाणी हुक्का पार्लर निदर्शनास आले.

नियम धाब्यावर बसवून मध्यरात्री २ ते पहाटे ४ पर्यंत हुक्का पार्लर सुरू

हुक्का पार्लरमध्ये युवक-युवतींचा सर्वाधिक समावेश

एपीएमसी परिसरात मॅफ्कोजवळ कंपनीच्या जागेमध्ये हुक्का पार्लर सुरू

हुक्का पार्लरचे बिल क्रेडिट कार्डद्वारे हॉटेलऐवजी कंपनीच्या नावावर होते जमा

एपीएमसी पोलीस स्टेशन परिसरात हुक्का पार्लर

हुक्का पार्लरमध्ये तरुणींची संख्याही जास्त असल्याचे आले निदर्शनास

अपुऱ्या जागेतच बैठक व्यवस्था

हुक्क्याचा धूर बाहेर जाण्यासाठीची यंत्रणाच नसल्याने पूर्ण खोलीमध्ये धूर पसरल्याचे चित्र

शहरातील हुक्का पार्लरमधील वास्तवाचे चित्रीकरण ‘लोकमत’ने केले आहे. रात्री दोन वाजेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आले.

तरुणांमध्ये लाइफ स्टाईल म्हणून हुक्क्याचे केले जाते सेवन.

Web Title: In the heart of the Great Mumbai,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.