‘गोकुळ’च्या सभेत चप्पलफेक, तोडफोड आणि प्रचंड घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 04:50 PM2018-09-30T16:50:41+5:302018-09-30T17:08:24+5:30

‘मल्टिस्टेट’चा ठराव न वाचताच मंजूर, ठराव मंजूर झाला नसल्याचे विरोधकांचे म्हणणे; गोकुळ’ची सभा ३ मिनिटांत गुंडाळली

Gokul dairy meeting: tremendous slogans, huge mess | ‘गोकुळ’च्या सभेत चप्पलफेक, तोडफोड आणि प्रचंड घोषणाबाजी

‘गोकुळ’च्या सभेत चप्पलफेक, तोडफोड आणि प्रचंड घोषणाबाजी

Next

कोल्हापूर: गेला महिनाभर कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण पार ढवळून काढलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वार्षिक सभा रविवारी प्रचंड तणावाखाली व गोंधळातच अवघ्या ३ मिनिटांत गुंडाळण्यात आली. या सभेत मल्टिस्टेटचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचा दावा सत्तारुढ गटाने केला, तर बहुतांशी सभासदांच्या ठरावास विरोध होता; त्यामुळे ठराव मंजूर झाला नसल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे. हा ठराव न वाचताच सभेपुढे मांडण्यात आला. विरोधी गटाचे नेते थेट सभेत घुसल्याने जोरदार घोषणाबाजी आणि चप्पलफेक झाली. अंगावर धावून जाण्याचे प्रकार झाले. आमदार चंद्रदीप नरके, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी सभेत येऊन या ठरावास विरोध दर्शवला. आता कोणत्याही क्षणी धुमश्चक्री होईल, असे सभेतील वातावरण होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले होते आणि त्याचवेळी सभागृहात संख्येने पोलीस कमी होते.


गोकुळ’च्या सभेमध्ये सकाळपासून तणावसदृश परिस्थिती असताना संख्याबळाने कमी असलेल्या पोलिसांनी अतिशय शांतपणे दोन्ही गटांच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांना हाताळत सभा पार पाडली. सभास्थळी घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांची किरकोळ धक्काबुक्की झाली. सुमारे ३५0 पोलीस रविवारी सकाळी सहापासून दुपारी एकपर्यंत बंदोबस्तावर होते. 


गोकुळ संघ मल्टिस्टेट करण्याचा ठराव लोकशाही पध्दतीने मंजूर झाला आहे, विरोधकांना हे मंजूर नसेल तर त्यांनी वेगळी चूल मांडावी व दुसरा दूध संघ काढावा किंवा महालक्ष्मी दूध संघ चालू करावा, असे आव्हान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी रविवारी येथे दिले. 

शाहूवाडी, राधानगरीतील ठरावधारक वस्तीलाच कोल्हापूरात
‘गोकुळ’च्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला जास्तीत जास्त संस्था प्रतिनिधी आणण्याची जबाबदारी संचालकांवर सोपवण्यात आली होती. गेले दोन दिवस प्रतिनिधींना आणण्याचे नियोजन केले त्यानुसार शाहूवाडी, राधानगरी, चंदगड आदी लांबच्या तालुक्यातील प्रतिनिधी रात्री वस्तीलाच कोल्हापूरात होते, तर शेजारील तालुक्यातील प्रतिनिधी पहाटे पासूनच गावातून रवाना झाले. 

 

विरोधकांकडून समांतर सभेत ‘मल्टिस्टेट’चा ठराव नामंजूर
कोल्हापूर : विरोधकांनी समांतर सभा घेऊन गोकुळ दूध संघाच्या ‘मल्टिस्टेट’चा ठराव रविवारी नामंजूर केला. त्यांनी सत्ताधाऱ्यांबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी विरोधी गटातील नेते, कार्यकर्ते आणि दूध उत्पादक सभासदांनी हात उंचावून मल्टिस्टेटच्या विरोधातील लढा तीव्र करण्याचा निर्धार शपथ घेऊन केला. 

बोगस सभासद बाहेर काढा; खऱ्यांना आत जाऊ द्या
कोल्हापूर : सकाळी १0 वाजण्यापूर्वीच सभागृह फुल्ल झाले होते; त्यामुळे पोलीस प्रशासनानेच सांगावे आम्ही बसायचे कुठे? आत बोगस सभासद असून, खरे बाहेर आहेत, त्यांना आत सोडा, अन्यथा आम्ही इथेच बसू, असा इशारा देत विरोधी गटाचे आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी ‘गोकुळ’ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. यावेळी संतप्त सभासदांकडून तोडफोड, पत्रे उचकटले; दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकण्यात आल्या.

Web Title: Gokul dairy meeting: tremendous slogans, huge mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.