गणपतीपुळे जागतिक दर्जाचे

By admin | Published: August 6, 2015 11:23 PM2015-08-06T23:23:49+5:302015-08-06T23:23:49+5:30

सुधीर मुनगंटीवार : अनेक सुविधांनी तीर्थक्षेत्र होणार ‘स्मार्ट टुरिझम सेंटर’

Ganpatipule world class | गणपतीपुळे जागतिक दर्जाचे

गणपतीपुळे जागतिक दर्जाचे

Next

रत्नागिरी : महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाच्या श्री क्षेत्र गणपतीपुळेला पर्यटनदृष्ट्या जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. येथे वर्षाला येणाऱ्या २० लाखांपेक्षा अधिक पर्यटक, गणेश भक्तांसाठी टप्प्या टप्प्याने सर्व सुविधा निर्माण करून गणपतीपुळे ‘स्मार्ट टुरिझम सेंटर’ बनविले जाणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा शिष्टमंडळाला दिली आहे.
रत्नागिरी शहराची स्मार्ट शहर होण्याची संधी हुकली असली तरी, आता याच तालुक्यातील गणपतीपुळे क्षेत्र ‘स्मार्ट’ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे हे स्वयंभू देवस्थान आहे. येथील श्रीगणेश भक्तांना पावणारा म्हणून प्रसिध्द आहे. तसेच फेसाळणारा समुद्र व पांढऱ्या शुभ्र किनाऱ्यावर हे क्षेत्र वसलेले असल्यानेही देशवासियांना या ठिकाणाबाबत मोठे आकर्षण आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाखो पर्यटक व भक्तांसाठी असलेल्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अत्यंत लोकप्रिय असलेल्या या क्षेत्राचा सर्वांगिण विकास करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील शिडी संस्थानाप्रमाणेच हे क्षेत्र धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत, त्यासाठी पुरेसा निधी देण्याची तयारी मुनगंटीवार यांनी दाखविली आहे.
काही महिन्यांपूर्वी मंत्री मुनगंटीवार रत्नागिरीत आले असता त्यांनी गणपतीपुळेला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी गणपतीपुळेच्या विकासाला निधीची कमतरता भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
विकास प्रक्रियेनुसार गणपतीपुळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय (अक्वेरियम) उभारण्याचा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीन आहे. येथील समुद्रकिनारी पर्यटक स्नान करीत असताना अपघात होऊ नयेत यासाठी अपघात प्रतिबंधक उपाययोजना करणे, मोठ्या प्रमाणातील पर्यटकांसाठी निवळी एम.आय.डी.सी. येथून जयगडकडे जाणाऱ्या वाहिनीदवारे पाणी आणून ते गणपतीपुळेला पुरवठा करण्याबाबतही शिष्टमंडळाशी चर्चा झाली.
पर्यटन मंत्र्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्र तथा बाळ माने, विनय नातू, राजन तेली, अ‍ॅड. अजित गोगटे, प्रशांत ठाकुर, माजी आमदार प्रमोद जठार, प्रवीण दरेकर, रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

कोकणच्या शिष्टमंडळाचा पाठपुरावा
गणपतीपुळे येथे येणाऱ्या भक्त पर्यटकांसाठी विविध सोई सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. मुख्य रस्ते, आंतरिक सुविधा, वाहनतळ व्यवस्था, प्रवाशांसाठी बस स्थानक, जलनिस्सारण, सांडपाण्यावर प्रक्रीया करून पुनर्वापर, पथदीप, भुयारी गटारे, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, साईट अ‍ॅँड साऊंड प्रकल्प, एम.टी.डी.सी.ची निवास व भोजन व्यवस्था अद्ययावत करणे, रेल्वे, बस आरक्षणाची सुविधा, सी प्लेन निर्माण केल्या जाणार आहेत.

दरवर्षी गणपतीपुळेत येतात २० लाखांवर पर्यटक.
रत्नागिरीची स्मार्ट सिटीची हुकलेली संधी गणपतीपुळे भरून काढणार.
सी प्लेन सुरू करण्याबाबत चर्चा.
रेल्वे आरक्षण, अद्ययावत बसस्थानक होणार.

Web Title: Ganpatipule world class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.