गावासाठी १०१ कोटींचा निधी, ग्रामस्थांनी आमदाराची काढली हत्तीवरून मिरवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 05:08 PM2024-03-11T17:08:23+5:302024-03-11T17:09:36+5:30

हत्तीवरून मिरवणूक काढल्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांनी ट्विट करत संपूर्ण ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

Fund of 101 crores for the village, the villagers took out the procession of the MLA Dattatray Bharne on an elephant, Kalamb, Indapur | गावासाठी १०१ कोटींचा निधी, ग्रामस्थांनी आमदाराची काढली हत्तीवरून मिरवणूक!

गावासाठी १०१ कोटींचा निधी, ग्रामस्थांनी आमदाराची काढली हत्तीवरून मिरवणूक!

इंदापूर : कळंब (ता. इंदापूर) येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १०१ कोटी २० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन रविवारी (दि.१०) पार पडले. गावासाठी भरघोस निधी मंजूर केल्याने ग्रामस्थांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत केले. तसेच, हलगीच्या निनादात हत्तीवरून मिरवणूक काढली.

या मिरवणुकीनंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, या गावामध्ये वाड्या-वस्त्यांवर पाण्याचा गंभीर प्रश्न होता. महिला भगिनींच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.  राज्यमंत्री असताना पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जल जीवन च्या माध्यमातून ५५ कोटी रुपयांची योजना या गावांमध्ये आणली. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याकरिता भूमिका घेतली. 

दरम्यान, हत्तीवरून मिरवणूक काढल्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांनी ट्विट करत संपूर्ण ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, हा गौरव नक्कीच अभूतपूर्व होता, या गौरवामुळे येणाऱ्या काळात काम करताना मला नक्कीच प्रेरणा आणि ऊर्जा भेटेल हे मात्र नक्की. संपूर्ण ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानतो. या विकास निधीमुळे ग्रामीण जनतेचे दैनंदिन जीवन सुखरूप होईल हे मात्र नक्की. माझ्या केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना कळंबवासीयांनी आज गावामध्ये माझी हत्तीवरून मिरवणूक काढून मी  केलेल्या कामाचा गौरव केला आहे.

माझ्या विकासनिधीतून व मंत्रालयातून तालुक्यासाठी लागणारा निधी उपलब्ध कसा होईल यासाठी नेहमीच मी प्रयत्नशील असतो. याच प्रयत्न मुळे आपल्या कळंब ग्रामपंचायतला माझ्या विकास निधीतून १०१ कोटी २० लाख रुपयाची तरतूद करण्यात आली. आपल्या तालुक्यातील प्रत्येक माणसापर्यंत विकास कामे पोचली पाहिजे, गोरगरिबांपर्यंत सरकारने दिलेला निधी पोहोचला पाहिजे हा प्रामाणिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत मी काम करत आहे. विकास हा तळागाळातून झाला पाहिजे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी गेली अनेक वर्षे काम करत आहे, असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.

Web Title: Fund of 101 crores for the village, the villagers took out the procession of the MLA Dattatray Bharne on an elephant, Kalamb, Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.