महिन्याभरानंतर चार मोठे ब्लॉक

By Admin | Published: August 24, 2016 05:42 AM2016-08-24T05:42:51+5:302016-08-24T05:42:51+5:30

ठाणे ते दिवा ५व्या-६व्या मार्गाच्या कामाला गती देण्यात येत आहे.

Four big blocks after a month | महिन्याभरानंतर चार मोठे ब्लॉक

महिन्याभरानंतर चार मोठे ब्लॉक

googlenewsNext


मुंबई : ठाणे ते दिवा ५व्या-६व्या मार्गाच्या कामाला गती देण्यात येत आहे. यातील काही महत्त्वाच्या कामांसाठी येत्या महिनाभरानंतर वेगवेगळ्या टप्प्यात चार मोठे ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यातील प्रत्येक ब्लॉक दर रविवारी घेतानाच ते आठ ते बारा तासांचे असतील. त्यामुळे या दिवशी अनेक लोकल फेऱ्यांवर मोठा परिणाम होण्याचीही शक्यता आहे.
ठाणे ते दिवा ५वा-६वा मार्ग एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) पूर्ण केला जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास ठाण्यापुढील लोकल सेवांवर येणारा बराचसा ताण कमी होईल. या मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्यांना मार्ग करून दिल्यानंतर लोकलचा प्रवास सुकर होईल आणि फेऱ्याही वाढवण्यास मदत होणार होणार आहे. सध्या या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येत आहे. ठाणे ते कळवा दरम्यान पुलांची उभारणी, मुंब्रा ते कळवा दरम्यानची जागा सपाट करणे आणि रूळ टाकण्यासाठी जागा तयार करणे, मुंब्रा येथे नवा उड्डाणपूल बांधून त्याखालून नवी मार्गिका तयार करणे इत्यादी कामे केली जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आठ ठिकाणी या मार्गांवर कट-कनेक्शची कामे केली जातील. ही कामे करण्यासाठी चार मोठे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. हे ब्लॉक आठ ते बारा तासांचे ठेवून त्यात कट-कनेक्शनची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले. या कामामुळे जुन्या मार्गिका नव्या मार्गिकेशी जोडता येतील. त्यामुळे ठाणे पुढील लोकल फेऱ्यांचे नियोजन करावे लागेल, असेही ते म्हणाले. ब्लॉकच्या दिवशी लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
> हार्बरच्या बारा डबांसाठी प्लॅटफॉर्म आणि रुळांचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. या कामांसाठी जवळपास ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. हा सर्वात मोठा ब्लॉक होता.
>वेळापत्रक सुधारण्यासाठी ‘पंचसूत्री’योजना
मध्य आणि हार्बरवर गेल्या काही महिन्यांपासून लोकलच्या वेळापत्रकावर अनेक कारणांमुळे परिणाम होत आहे. हे वेळापत्रक सुधारण्यासाठी रेल्वेने ‘पंचसूत्री’योजना आखली आहे. त्यात बिघाड त्वरित दुरुस्त करतानाच, प्रवाशांना मनस्ताप न होता. ब्लॉक घेणे इत्यादींचा यात समावेश असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले. सिग्नल व लोकलमध्ये बिघाड, ओव्हरहेड आणि पेन्टाग्राफमध्ये तांत्रिक समस्या उद्भवण्याबरोबरच अनेक तांत्रिक कारणांचा सामना मध्य रेल्वे प्रशासनाला करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. गेल्या काही महिन्यांत याच कारणांमुळे दिवा आणि बदलापूर येथे प्रवाशांचा उद्रेक पाहण्यास मिळाला. यानंतर, उशिराने जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने लोकलचे वेळापत्रक सुधारण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वेमंत्र्यांकडूनही सूचना करण्यात आल्या. वेळापत्रक सुधारण्यासाठी खास पंचसूत्री नियोजन करण्यात आल्याची माहिती गोयल यांनी दिली.
>लोकल सुरळीत चालू ठेवण्यासाठी अनेक तांत्रिक कामे घेण्यासाठी ब्लॉक आवश्यक आहे. त्यासाठी त्याची संख्या वाढवण्यावरही भर दिला जाईल. हा भर देतानाच प्रवाशांना कोणताही त्रास न होता कामे कशी पूर्ण करता येतील, याचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये यार्डातील अनेक कामांचाही समावेश आहे. मेल-एक्स्प्रेस आणि लोकल या एकामागोमाग एक धावत असल्याने त्याचा परिणाम लोकल फेऱ्यांवर होत आहे.
त्यामुळे काही फरकाने मेल-एक्स्प्रेस सुरू ठेवून लोकल वेळेनुसार कशा धावतील, याकडे रेल्वेचा कल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अस्वच्छता आणि काही ठिकाणी लोकलच्या वेगावर असलेली मर्यादा पाहता, त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
>वेगमर्यादा हटविणार
रुळांवर पाणी व मोठ्या प्रमाणात कचरा येत असल्याने, उपनगरीय मार्गावर काही ठिकाणी लोकलच्या वेगांवर ताशी ३0 ची मर्यादा आणण्यात आली आहे. ही वेगमर्यादाही आढावा घेऊन हटविण्यात येईल.
>बिघाड दुरुस्तीसाठी प्रयत्न
एखाद्या ठिकाणी बिघाडाची घटना घडल्यास तो बिघाड त्वरित दुरुस्त करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचारी घटनास्थळी लवकरात लवकर कसे पोहोचतील, त्याचेही नियोजन करण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले.

Web Title: Four big blocks after a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.