विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 06:47 PM2018-01-05T18:47:22+5:302018-01-05T18:49:32+5:30

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी येथील जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Former Deputy Speaker of the Legislative Council Vasantrao Davkhare, merged with Anant | विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे अनंतात विलीन

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे अनंतात विलीन

googlenewsNext

ठाणे - विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी येथील जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच राजकीय नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी जगन्मित्र हरपला अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  

स्मशानभूमीत त्यांचे पुत्र प्रबोध आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विधिवत त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. यावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. दरम्यान आज सकाळी स्व. वसंतराव डावखरे यांचे पार्थिव मुंबईहून ठाण्यातील हरिनिवास भागातील गिरीराज हाईट्स येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी पुष्प वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेक राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, ठाण्यातील आमदार, लोकप्रतिनिधी यांनी एकच गर्दी केली होती. यानंतर त्यांची अंत्ययात्रा प्रमुख मार्गावरून निघून स्मशानभूमीत पोहोचली.

स्मशानभूमीत उपस्थित मान्यवर व नेत्यांनी स्व. डावखरे यांच्याविषयीच्या आठवणीला उजाळा दिला तसेच आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, वसंतराव डावखरे हे अजातशत्रू आणि जगन्मित्र होते, त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. ते सभागृहातील कामकाज अतिशय कुशलतेने चालवीत. स्वत:च्या मनातील दु:ख त्यांनी कधी व्यक्त केले नाही मात्र कायम हसऱ्या चेहऱ्याने राहिले. मी त्यांना अनेक वर्षे अगदी जवळून पाहिले असून त्यांच्याविषयी माझ्या खूप आठवणी आहेत. विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले की वसंतरावांचे सर्वपक्षीय संबंध होते आणि ते सदस्यांमध्ये लोकप्रियही होते. त्यांचे कार्यालय सर्वांनाच हक्काचे वाटत असे. पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्याविषयी बोलताना शब्द अपुरे पडतील असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते ठाण्याच्या विकासात नेहमीच मदत करीत राहिले. स्व. डावखरे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम १३ जानेवारीस शिरूर तालुक्यातील हिवरे गावी असल्यचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात जाहीर केले.

Web Title: Former Deputy Speaker of the Legislative Council Vasantrao Davkhare, merged with Anant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.