पहिला श्रावणी सोमवार ! जाणून घ्या श्रावणातील सणांबद्दलची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 08:45 AM2017-07-24T08:45:22+5:302017-07-24T08:45:22+5:30

आज पहिला श्रावणी सोमवार आहे. यानिमित्त देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

First Shawranti Monday! Know about Shravan festivals | पहिला श्रावणी सोमवार ! जाणून घ्या श्रावणातील सणांबद्दलची माहिती

पहिला श्रावणी सोमवार ! जाणून घ्या श्रावणातील सणांबद्दलची माहिती

googlenewsNext
>रवींद्र देशमुख/ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 24 - श्रावण हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा पवित्रा महिना...सासुरवाशिनीला नागपंचमी सणाच्या निमित्ताने माहेरी आणणारा...अबालवृद्धांमध्ये सणांच्या रेलचेलीमुळे कमालीचा उत्साह वाढविणारा आणि विशेष म्हणजे सर्वांचाच भक्तीभाव वाढवून आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करणा-या या श्रावणाचा 24 जुलैपासून प्रारंभ होत आहे. स्वातंत्र दिन आणि ऑगस्ट क्रांती दिन हे दोन महत्त्वाचे राष्ट्रीय सणही याच महिन्यात आहेत.
 
श्रावणाची सुरूवात यंदा श्रावणी सोमवारपासून होत आहे अन् समाप्तीही सोमवारीच होणार आहे. नागपंचमीपासून सणांची मालिका सुरू होत आहे. महाराष्ट्रात हा सण अतिशय पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. शहरीकरणाचं प्रमाण वाढलं असलं तरी आजही कुठे ना कुठे नागपंचमीचे झोके दिसून येतात. बालगोपाळ झोक्यांवर बसून आनंद घेत असल्याचे चित्र नजरेस पडते. ग्रामीण भागातच प्रत्येक मोठ्या झाडाला झोका टांगलेला असतो. हा सण गुरूवारी म्हणजेच २७ जुलैला आहे. बहीण - भावाचे अतुट नाते आणखी दृढ करणारा राखी पौर्णिमेचा ७ ऑगस्ट रोजी आहे. बाजारात रंगीबेरंगी, फॅन्सी राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. आपल्या भाऊरायासाठी त्यांच्या भगिनी राख्या खरेदी करीत आहेत.
 
जन्माष्टमी आणि दहिहंडी हे दोन्ही सण मराठीजनांना अतिशय प्रिय आहेत. श्रीकष्ण जयंतीनंतर दुस-या दिवशी म्हणजेच मंगळवार दि. १५ ऑगस्ट रोजी दहिहंडी साजरी होत आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील युवकांना संघटीत करणारा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. विशेषत: या दिवशीच देशाचा स्वातंत्र्य दिनही साजरा होत आहे. सकाळच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी दहिहंडीचा काला खाण्याचा आनंद मिळणार आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी जशी भक्तीभावाने शिवभक्ती केली जाते, शिवरात्रीला तर भक्तीचे उधाण आलेले असते. रविवारी २० ऑगस्टला शिवरात्री साजरी होत आहे. पारशी मंडळींचा पतेती हा सणही याच महिन्यात गुरूवारी १७ ऑगस्टला आहे.
 
कष्टकरी शेतकरी आपल्या सर्जा-राजा या बैलजोड्यांना एक दिवसाचा आराम देऊन त्याची पूजा करतो...त्याला पुरणपोळी खायला देतो. ग्रामीण महाराष्ट्रात अतिशय गंभीरतेने आणि भावपूर्णरित्या साजरा होणारा बैलपोळा सोमवारी २१ ऑगस्टला असून, याच सणाने या पवित्र महिन्याची समाप्ती होत आहे.
 
नुल्लू पुन्नम
शेजारील तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर तेलुगू समाज रोजगारासाठी सोलापूरसह महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये स्थायिक झाला. या पद्मशाली समाजामध्ये नुल्लू पुन्नम हा सण मोठ्या श्रद्धेनं साजरा केला जातो. यंदा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी ७ ऑगस्ट रोजी नुल्लू पुन्नम साजरा होत आहे. सोलापुरात पद्मशाली बांधवांची संख्या मोठी आहे. या दिवशी शहरात मार्कंडेय मंदिरापासून भव्य मिरवणूक काढली जाते.
 
चंद्रग्रहण, राखी पौर्णिमा अन् सोमवारच्या उपवासाबद्दल
यंदा श्रावणात नारळी आणि राखी पौर्णिमेचे दिवशी म्हणजेच ७ ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. यासंदर्भात पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले की,  या दिवशी रात्री १०.५० वाजता ग्रहण सुरू होते. त्याचा पर्वकाळ रात्री १२.४९ पर्यंत आहे; पण ग्रहणाचे वेध दुपारी १ वाजता लागतात. त्यामुळे सर्वांनीच वेध लागण्यापूर्वी भोजन करावे. ज्यांचा सोमवारचा उपवास असेल त्यांनी दुपारी १ वाजण्यापूर्वी फराळ घ्यावा आणि सूर्यास्तानंतर केवळ तीर्थ घ्यावे. राखी पौर्णिमेदिवशी सकाळी ११ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत बहिण आपल्या भावाला राखी बांधू शकते, असे दाते म्हणाले.
 
पहिली मंगळागौरी
विवाहानंतरच्या पहिल्या वर्षी महिला मंगळागौरीचे पूजन करतात. यदा मंगळवार दि. २५ जुलै रोजी पहिली मंगळागौरी आहे. या दिवशी व्यतीपात आहे; पण मंगळागौर साजरी करण्यात व्यतीपाताचा दोष नाही. ती पारंपरिक पध्दतीने साजरी करावी. पूजन करावे, असे आवाहन पंचांगकर्ते दाते यांनी केले.

Web Title: First Shawranti Monday! Know about Shravan festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.