मराठीतील पहिली विज्ञानविषयक पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2017 01:17 AM2017-01-15T01:17:14+5:302017-01-15T01:17:14+5:30

विज्ञानाचे अनेक शोध पाश्चात्त्यांनी लावले. त्या शोधात त्यांनी अनेक संज्ञा, शब्द वापरले होते. ते शब्द लोकांना कळणेही महत्त्वाचे होते. म्हणूनच आपल्याकडच्या

First science books in Marathi | मराठीतील पहिली विज्ञानविषयक पुस्तके

मराठीतील पहिली विज्ञानविषयक पुस्तके

Next

- अ. पां. देशपांडे

विज्ञानाचे अनेक शोध पाश्चात्त्यांनी लावले. त्या शोधात त्यांनी अनेक संज्ञा, शब्द वापरले होते. ते शब्द लोकांना कळणेही महत्त्वाचे होते. म्हणूनच आपल्याकडच्या शास्त्रज्ञांनी त्या शब्दांना मराठी शब्द शोधून काढले. लोकांना अगदी सहज कळतील असे अनेक शब्द मग तयार झाले. म्हणूनच विज्ञानात मराठी भाषेचा वापर कसा बदलत गेला याचा शोध-बोध ‘तंत्रभाषा’ या सदरातून दर १५ दिवसांनी.

भारतात फार जुन्या काळापासून विज्ञानाचे शोध लागले आहेत, कागदावर मजकूर छापायला सुरुवात होण्यापूर्वी शिलालेख, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादी मार्गाने अथवा हाती लिहून मजकूर जतन केला जात असे. आयुर्वेदातील चरक, सुश्रुत, वाग्भट हे ग्रंथ पुरातन असून, त्यांना वृद्धत्रयी म्हटले जाते. भास्कराचार्य, आर्यभट्ट या सगळ्या भारतभर विखुरलेल्या शास्त्रज्ञांचे वाङ्मय त्या काळाला अनुसरून संस्कृतमध्ये असे, पण त्याचा अनुवाद हा त्या-त्या राज्यांच्या भाषांमध्ये होत असे, पण त्या वेळी होणारे शिक्षण हे तोंडी होत असे आणि लोक पाठ करून ते लक्षात ठेवत असत. अठराव्या शतकापासून इंग्रज-फ्रेंच भारतात आल्यापासून भारतात इंग्रजी आणि फ्रेंच भाषांचा शिरकाव झाला, पण १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई खालसा केल्यावर इंग्रजी अंमल सुरू झाला आणि इंग्रजांना या देशावर राज्य करण्यासाठी त्या-त्या राज्यातल्या राज्यभाषा शिकण्याची गरज पडू लागली. मग महाराष्ट्रात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा अंमल सुरू झाल्यावर, त्यांनी येथील शिक्षणाच्या पद्धतीत बदल करायला सुरुवात केली. पेशव्यांच्या काळी भारतभरच्या वेदविद्या जाणणाऱ्या विद्वानांना पेशवे दक्षिणा वाटत. त्याला तेव्हा रमणा म्हणत. तो गाभा लक्षात घेऊन, इंग्रजांनी ही रमण्याची पद्धत बंद करून, त्याऐवजी पुण्याला डेक्कन कॉलेज सुरू केले. मग शाळांमधून इंग्रजी पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी, इंग्रजीतील पुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्यासाठी, त्यांनी समाजातील इंग्रजी जाणणाऱ्या मराठी विद्वानांना पाचारण केले. त्यात हरी केशवजी (पाठारे), जगन्नाथशास्त्री (क्रमवंत), रामचंद्र्रशास्त्री (जान्हवेकर) आणि जॉर्ज जार्विस, मेजर केंडी व जॉन माल्कम यांच्या गटाने भौतिकी, रसायन, वैद्यक, गणित, खगोलशास्त्र या विषयांची इंग्रजी पुस्तके मराठीत भाषांतर केली. याशिवाय जॉर्ज माल्कमने ‘औषध कल्पविधी’ हा ग्रंथ, जगन्नाथशास्त्री क्रमवंतांनी बऱ्याच विज्ञानविषयक संज्ञा समाविष्ट असलेला दोन भागांत तयार केलेला शब्दकोश, रामचंद्रशास्त्री जान्हवेकारांनी ‘भूगोल आणि खगोलविषयक संवाद’ हे पुस्तक व नंतर ‘सिद्ध पदार्थ विज्ञानविषयक संवाद’ ही पुस्तके प्रसिद्ध केली. यामुळे मराठीतून विज्ञान व्यक्त होण्यासाठी भाषा तयार होत गेली
१८२५ सालानंतर मुंबईत छापखाने सुरू झाले आणि १८३२ साली मुंबईत ‘दर्पण’ नावाचे मराठी व इंग्रजी भाषेतील (द्वैभाषिक) वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यात ते विज्ञानविषयक लेख छापत. १८४० साली त्यांनी केवळ विज्ञानाला वाहिलेले ‘दिग्दर्शन’ नावाचे मासिक सुरू केले. बाळशास्त्री जांभेकरांनी सर्व राशी आणि नक्षत्रांची नावे मराठीत तयार केली. जांभेकर हे एल्फिन्स्टन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक होते. १८५७ साली सी. एफ ब्लांट यांनी ‘ब्यूटी आॅफ हेवन्स’ या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले. सचित्र आणि रंगीत चित्रे असणारे हे मराठीतले पहिले पुस्तक आहे. यानंतर, मराठीत मराठी ज्ञान प्रसारक, ज्ञान चंद्रिका, विविध ज्ञान विस्तार, सृष्टीज्ञान चंद्रिका, मासिक मनोरंजन, करमणूक अशी बरीच मासिके निघाली आणि त्यात विज्ञानविषयक लेख असत. १८२५ ते १९०० या काळात २३३ पुस्तके विज्ञान आणि तंत्रज्ञानावर प्रसिद्ध झाली. पुढील ३७ वर्षांत प्रसिद्ध झालेल्या २६,५६९ पुस्तकांत ७२९ पुस्तके विज्ञान आणि तंत्रज्ञानावर होती.

Web Title: First science books in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.