ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ -  निवडणुकीमुळे ठाणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेली १९ फेब्रुवारी रोजी केलेली दारूबंदी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.  मात्र २०, २१ आणि २३ फेब्रुवारी रोजी ड्राय डे कायम राहणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने २४ जानेवारी रोजी अधिसूचना काढून १९ फेब्रुवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून २१ फेब्रुवारी (मतदानाचा दिवस) पर्यंत आणि २३ फेब्रुवारी रोजी (निकालाचा दिवस) दारुबंदी घातली होती. या काळात दारू खरेदी-विक्री तसे सेवनासही मनाई करण्यात आली होती. 
मात्र  राज्य सरकारच्या या निर्णयाला ठाण्याच्या हॉटेल्स असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकारने काढलेली अधिसूचना बेकायदा व मनमानी असल्याने ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशनने केली होती. सरकारच्या दारुबंदीच्या अधिसूचनेमुळे व्यवसायावर गदा येईल. तसेच उदरनिर्वाहासाठी पैसे कमवण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करण्यात आले आहे, असे असोसिएशनने याचिकेत म्हटले होते. 
त्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणुकीच्या काळातील मद्य खरेदी-विक्रीवरील बंदी सशर्त उठवली. त्यानुसार १९ तारखेचा ड्राय डे रद्द ठरवण्यात आला आहे. मात्र २१, २१ आणि २३ तारखेचा ड्राय डे कायम असेल. 
दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान काल (१६ फेब्रुवारी) पार पडले. तर येत्या २१ तारखेला जिल्हा परिषदांचे दुस-या टप्प्यातील आणि महापालिकेसाठी मतदान होणार असून २३ तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.