बेतालपणा म्हणजे ‘अभिव्यक्ती’ नव्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 07:00 AM2019-06-02T07:00:00+5:302019-06-02T07:00:04+5:30

‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काहीही बेताल बोलण्याचे वा लिहिण्याचे स्वातंत्र्य असा मी घेत नाही.

express thoughts is not a sleep of tongue | बेतालपणा म्हणजे ‘अभिव्यक्ती’ नव्हे 

बेतालपणा म्हणजे ‘अभिव्यक्ती’ नव्हे 

Next

आपण जे बोलतो त्याची पूर्ण जबाबदारी प्रथम आपली स्वत:ची आहे हे बोलणाऱ्याने समजून घ्यायला हवे,’’ सांगत आहेत प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे. त्यांच्याशी संवाद साधलाय राजू इनामदार यांनी.

.................

अतुल पेठे म्हणजे नाटकाबाबत गेली अनेक वर्षे सजगतेने व ठामपणे काम करणारे रंगकर्मी ! लोकसभा निवडणुकीआधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबधी प्रसिद्ध झालेल्या कलावंत, लेखकांच्या मुंबईतून व देशस्तरावर निघालेल्या दोन्ही पत्रकांवर त्यांची स्वाक्षरी होत्या. आता निकालांच्या पार्श्वभूमीवर त्याविषयी काय वाटते असे विचारले असता प्रसन्नपणे हसत पेठे म्हणाले, ‘‘असा प्रश्न विचारला जाणार याची खात्री होती. फक्त या निवडणुकीपुरता हा माझा मुद्दा नव्हता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा मुद्दा केवळ आत्ताच्या विशिष्ट राजकारणाशी, राजकीय पक्षाशी वा संघटनेशी संबधीत नव्हता आणि नाहीही. तर चुकीच्या आणि घातक विचारधारांच्या विरुद्ध होता आणि आहे.

मी कलावंत आणि या देशाचा जबाबदार नागरीक आहे. कलावंताला आणि कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही काळात स्वातंत्र्य घेऊन त्याच्या कलेच्या माध्यमातून व्यक्त होता व्हायला हवे. सफदर हाश्मी, दाभोलकरांची हत्या आणि आणीबाणी काँग्रेसच्या काळात झाली. नंतर पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या त्या भाजपाच्या काळात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न प्रत्येक काळात असतो.

गेल्या काही काळात आपल्या देशात गर्दीने हत्या करण्याच्या (मॉब लिंचिंग) प्रकारात तर कितीतरी वाढ झाली. वेश, आहार आणि भावना दुखावणे यावरून मारहाण झाली. धर्माधिष्ठित राजकारणाचा आणि अस्मितांच्या अतिरेकी सत्ताकारणाचा तो परिपाक होता. लोकांचे मूळ प्रश्न परिघावर फेकले गेले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाला नाकारले जात आहे. बुद्धी वापरणे, विचार करणे आणि प्रश्न विचारणे यालाच तुच्छ लेखले जात आहे. आमची ती पत्रके म्हणजे त्याविरोधात काढलेला आवाज आहे.’’या आवाजाला लोकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे निकाल सांगतात, यावर पेठे म्हणाले, ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज आजच उठवला जात नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, सॉक्रेटिस, महर्षी वि. रा. शिंदे, आगरकर, रं. धों. कर्वे, गाडगे महाराज या समाजसुधारक संतकवींनीही तेच केले. हे सगळे पराभूत होते असे म्हणायचे का? समाज आजही त्यांनाच डोळ्यासमोर ठेवतो. कारण त्यांनी सांगणे किंवा लिहिणे सोडले नाही. याचा अर्थ ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. लोक कदाचित तत्काळ प्रतिसाद देत नाहीत म्हणून सांगणाऱ्याने सांगणे बंद करायचे नसते. समाज बदलण्याच्या लढाईत असा जयपराजय नसतो असे मला नम्रतेने वाटते.’’

ते म्हणाले की, अभिव्यक्त होण्याला बंदी हा प्रकारच चुकीचा आहे. चित्रांना, कादंबरीला, कवितेला, गायन यावर बंदी. ही दहशत इतकी तीव्र होती की 'लेखक मेला आहे' असे लेखकाला म्हणावे लागले. हे कोणत्याही सत्तेत, कोणत्याही पक्षाकडून कधीही होऊ नये, पण होते. विचारांचा प्रतिवाद विचारांनीच व्हावा इतकी साधी गोष्ट आहे. पण सत्तेच्या, कधी पैशांच्या, कधी धर्माच्या नादात ही बाब अनेकांच्या लक्षात येत नाही व ‘हे बोलू नका’, ‘ते करू नका’असे सांगितले जाते. त्याविरोधात आवाज उठवला की ‘पुरोगामी’, ‘सेक्युलर’ वगैरे लेबल लावली जातात. लेखक कलावंतांना कोणाच्याही सत्तेत मोकळेपणाने अभिव्यक्त होता यावे. विरोधी मत ऐकून घेतले जाणे, ते बरोबर असेल तर त्याप्रमाणे स्वत:त बदल करणे, चुकीचे असेल तर तसे समजून सांगणे आणि कठीण प्रसंगी न्यायव्यवस्थेचा आधार घेणे हाच लोकशाहीचा खरा अर्थ आहे.’’ मात्र, याचीही एक दुसरी बाजू पेठे यांनी स्पष्ट केली. ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ काहीही बेताल बोलण्याचे वा लिहिण्याचे स्वातंत्र्य असा मी घेत नाही. आपण जे बोलतो त्याची पूर्ण जबाबदारी प्रथम आपली स्वत:ची आहे हे बोलणाऱ्याने समजून घ्यायला हवे. आपण करत असलेल्या अभिव्यक्तीमागे अभ्यास हवा. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे होता काम नये. शोषण करणाऱ्या कोणत्याही दमनयंत्रणेचा कायम विरोधच केला पाहिजे.

अभिव्यक्तीवर अनेक लोकं विविध प्रकारे वचक ठेऊन असतात. एक वेश, एक भाषा, एक आहार, एक धर्म हे म्हणणे चुकीचे आहे, भारतात तर अर्थहीन आहे. कारण या देशात साऱ्या जगण्यातच वैविध्य आहे. जात हा कलंकच आहे, मात्र धर्म वैविध्य आहे. तुमचा धर्म तुम्ही घरामध्ये ठेवा, त्याला कोणाचीच हरकत नसेल, मात्र तो रस्त्यावर येत असेल तर ते योग्य नाही. तसेच तुमची अभिव्यक्ती ही इतरांच्या स्वातंत्र्याचा भंग करणारी नसली पाहिजे.’’
आता पुन्हा मागील पक्षाचीच, त्याच विचारांची सत्ता आली आहे, आता काय होईल विचारल्यावर पेठे म्हणाले, ‘‘पक्ष म्हणजे माणसेच असतात की ! माझ्या विरोधी मतांची माणसे माझी शत्रू नव्हती आणि नाहीत. ज्या गोष्टी चांगल्या होतील त्याला मी चांगले झाले जरूर म्हणेन पण जर विघातक होत असेल तर त्याचा प्रतिवाद विचारांनी करेन. लोकं पहात असतात आणि विचारही करत असतात यावर माझा ठाम विश्वास आहे. सर्वकाळ सर्वांना मूर्ख बनवता येत नाही. मोबाईल, इंटरनेट यातून आपल्यावर सतत माहितीच मारा होत आहे. सतत माहिती आदळत राहिल्याने व्यक्तीच्या एकूण आकलनावर मर्यादा आल्या आहेत.  

कोणत्याही प्रकाराने भावना दुखावणे, अस्मितेला ठेच लागणे, गर्दी करून आपले म्हणणे मान्य करायला लावणे, खोटे हेच खरे (पोस्ट-ट्रुथ), धृवीकरण, धर्मांध भावनिकता वगैरे हे सगळे त्यातूनच उद्भवले आहे असे म्हणता येईल. मात्र कुठल्याही काळात भानावर राहून स्वत: जागे राहणे आणि इतरांना तसे राखणे हे लेखक - कलावंतांचे कामच आहे. अशावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अर्थ मग अधिक व्यापक आणि खोलवरचे होतात.’’

Web Title: express thoughts is not a sleep of tongue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.