सुरक्षा पुरविण्यापेक्षा गुप्तचर यंत्रणा सक्षम करा

By Admin | Published: March 4, 2015 10:02 PM2015-03-04T22:02:18+5:302015-03-04T23:47:01+5:30

कार्यकर्त्यांची स्पष्ट भूमिका : विषारी लेखन करणाऱ्या नियतकालिकांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचाही आरोप

Enable the spy system rather than providing security | सुरक्षा पुरविण्यापेक्षा गुप्तचर यंत्रणा सक्षम करा

सुरक्षा पुरविण्यापेक्षा गुप्तचर यंत्रणा सक्षम करा

googlenewsNext

राजीव मुळ्ये --सातारा  --डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर सातारचे सामाजिक कार्यकर्ते काहीसे अस्वस्थ असले तरी घाबरलेले बिलकूल नाहीत. सामाजिक कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्याचा मुद्दा उपस्थित होताच बहुतांश कार्यकर्ते व्यक्तिगत सुरक्षा पुरविण्यापेक्षा गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्याचा आग्रह धरतात. तसेच चळवळीचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी अधिक बंदोबस्त असावा, असेही सुचवितात.स्वतंत्र मते मांडणाऱ्या दोन ज्येष्ठ विचारवंतांची हत्या झाल्याने तरुण कार्यकर्त्यांचे दोन मार्गदर्शक हरपले आहेत. या दोघांचे लेखन आणि प्रतिपादन नेहमीच ठाम होते आणि विशिष्ट वर्गाला ते न रुचल्यानेच त्यांच्यावर हल्ले झाले, असे सामाजिक क्षेत्रात बोलले जाते. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने स्वतंत्र विचार मांडणाऱ्या व्यक्तींबाबत सर्वेक्षणही सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांकडून ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना संरक्षण देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला. मात्र, अशा आणखी किती जणांना संरक्षण मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात आले आहे. डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांना बंदूकधारी सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत हे रक्षक त्यांच्या सोबत असतात. परजिल्ह्यात जायचे झाल्यास त्या जिल्ह्याच्या पोलीस नियंत्रण कक्षाशी संंपर्क साधून तेथील रक्षक तैनात करण्यात येतो. चोवीस तास सुरक्षा पुरविण्यात आली असली, तरी दाभोलकर कुटुंबीय अनेक कार्यक्रमांमध्ये, आंदोलनांमध्ये सुरक्षा रक्षकाविनाच जातात. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता, व्यक्तिगत सुरक्षेपेक्षा कार्यक्रमस्थळी अधिक बंदोबस्त आणि प्रभावी गुप्तचर यंत्रणेची गरज असल्याचे सांगण्यात आले. श्रमिक मुक्ति दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले की, सुरक्षा दिल्यास ती निवासस्थानी, कार्यक्रमस्थळी आणि प्रवासादरम्यान असावी. इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या सुरक्षारक्षकांनीच केली. संरक्षण असूनही केनेडींचा खून झालाच. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या बाबतीत पोलिसांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. संरक्षणाची आॅफर पोलिसांनी दिली नसल्याचे सांगतानाच ‘माझ्या जिवाला धोका आहे, असे त्यांना वाटत नसावे,’ असे ते उपहासात्मक सुरात म्हणाले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पोतदार यांच्या मते, मार्गदर्शकांच्या पश्चात कार्यकर्ते नेटाने चळवळ पुढे नेत आहेत. चांगल्या समाजासाठी काम करीत असलेल्या ‘अंनिस’सारख्या संघटनांच्या कार्यक्रमस्थळी पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. अनेकदा कार्यक्रम होऊ नये, यासाठी पोलिसांना विविध संघटनांतर्फे पत्रे देण्यात येतात. आयोजकांवर दबाव आणला जातो. अशा वेळी कार्यक्रम रद्द तरी होतो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ‘अंनिस’ जबाबदार राहील, अशा आशयाच्या नोटिसा येतात. खरे तर कार्यक्रम रोखू पाहणाऱ्यांकडूनच कायदा-सुव्यवस्थेला धोका असतो. अशा ठिकाणी पोलिसांनी गुप्तचर यंत्रणा अधिक प्रभावी करायला हवी, असे ते म्हणाले.

पाटणकरांनाही धमकीचे पत्र..
पूर्वी धमक्यांची पत्रे पोस्टकार्डवरून येत असत; मात्र आता ती बंद लिफाफ्यातून येऊ लागली आहेत, अशी माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर डॉ. पाटणकर यांना धमकीचे एक पत्र आले आहे. विशिष्ट समाजघटकांचा अनुनय करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर करून ही धमकी देण्यात आली आहे. हे पत्र पाच पानांचे आहे. अशी पत्रे आपल्याला गेली पाच-सात वर्षे नियमित येत असून, आपण ती दुर्लक्षित करतो, असे सांगतानाच डॉ. पाटणकर यांनी ताजे पत्रही पूर्ण वाचले नसल्याचे नमूद केले.

मार्गदर्शक नाहिसे करण्याचा डाव
नव्वदीच्या दशकात चंगळवादाचा प्रारंभ होऊन आत्मकेंद्री समाजाची निर्मिती सुरू झाली. या काळात चळवळीकडे आकृष्ट होणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने घटली. त्यामुळे चळवळींचे मार्गदर्शक वयाच्या सत्तरीत असताना कार्यकर्त्यांचे वय सामान्यत: ३५ ते ४० च्या दरम्यान असल्याचे सध्या दिसते. म्हणजेच मार्गदर्शक आणि कार्यकर्त्यांच्या वयात तीसेक वर्षांचे अंतर आहे. मार्गदर्शकांना संपविल्यास तरुण कार्यकर्ते सैरभैर होतील, असा अंदाज बांधूनच डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्या झाल्या असाव्यात, असे कार्यकर्त्यांना वाटते.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी चळवळीची संघटनात्मक बांधणी उत्तम केली. त्यांच्यावर हल्ला होण्यापूर्वीच त्यांनी संघटनेतील सर्व पदांची धुरा तरुण कार्यकर्त्यांवर सोपविली होती. त्यामुळे चळवळ पुढे कोण नेणार, हा प्रश्न ‘अंनिस’पुढे नव्हता. तथापि, सर्वच चळवळींमध्ये अशी स्थिती नाही. दोन ज्येष्ठ मार्गदर्शकांवर हल्ले होऊनसुद्धा आपली गुप्तचर यंत्रणा इतकी सुस्त कशी, असा प्रश्न निर्माण होतो.
- प्रशांत पोतदार, जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस
पोलीस कायम सोबत राहण्यापेक्षा कार्यक्रमस्थळी, आंदोलनस्थळी, प्रवासात संरक्षण मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. कार्यक्रमासाठी मी जेथे जाईन, तेथे पोलिसांनी एस्कॉर्ट दिला, तर संरक्षण स्वीकारावे, असा निर्णय श्रमिक मुक्तिदलाच्या बैठकीत घेण्यात आला. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अधिक सतर्क राहायला हवे. तसेच चळवळींच्या विरोधात सातत्याने विषारी लेखन करणाऱ्या नियतकालिकांकडे सरकारचे होणारे दुर्लक्ष धक्कादायक आहे.
- डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमुद
‘अंनिस’चा किंवा अन्य संघटनेचा कोणताही कार्यक्रम कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव रद्द केल्याची घटना जिल्ह्यात अलीकडे घडलेली नाही. डॉ. आ. ह. साळुंखे यांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्यात आला आहे. कॉ. पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर संरक्षणाची गरज कोणाला आहे, यासंदर्भात विचारमंथन होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, अशा प्रकारे आणखी कोणाकोणाला सुरक्षा द्यायची, हे अद्याप निश्चित नाही.
- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, सातारा
 

Web Title: Enable the spy system rather than providing security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.