त्या कर्मचाऱ्यांची इतर विभागात उचलबांगडी

By Admin | Published: January 30, 2017 06:55 PM2017-01-30T18:55:26+5:302017-01-30T18:55:26+5:30

वेण्णा लेक येथील बोट क्लबमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बोट क्लब अधीक्षकासह सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली

The employees will be picked up in other departments | त्या कर्मचाऱ्यांची इतर विभागात उचलबांगडी

त्या कर्मचाऱ्यांची इतर विभागात उचलबांगडी

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
सातारा, दि. 30 -  महाबळेश्वरमधील वेण्णा लेक येथील बोट क्लबमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बोट क्लब अधीक्षकासह सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या गैरव्यवहाराची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित पाच कर्मचाऱ्यांची तत्काळ बोट क्लब विभागातून उचलबांगडी करून त्यांना इतर विभागात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी आशा राऊत यांनी दिली.

वेण्णा लेक येथे पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या बोट क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार चालतात, अशा तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या तक्रारींची दखल घेऊन शनिवारी रात्री नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याधिकारी आशा राऊत व नगरसेवक कुमार शिंदे यांनी बोट क्लबला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांना येथे आर्थिक गैरव्यवहार आढळून आला. कोठेही नोंद नसलेली ६,५७० रुपये एवढी रक्कम आढळून आली. तसेच बोटमन यांच्या हजेरी व कामाच्या नोंदीमध्येही मोठी तफावत आढळून आली. अनेक बोटमन केवळ हजेरी लावतात व काम न करताच पगार घेतात, तर काही बोटमन गैरहजर दाखवून त्यांच्या नावावर काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शनिवारी गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतरही रविवारी त्याच कर्मचाऱ्यांनी आपला पदभार सांभाळून कामकाज पाहिल्याने प्रशासन या गैरव्यवहारप्रकरणी गंभीर आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु सोमवारी मुख्याधिकाऱ्यांनी बोट क्लब अधीक्षक वगळता पाच कर्मचाऱ्यांची या विभागातून तत्काळ दुसऱ्या विभागात बदली करण्यात आल्याने बोट क्लबवर शुकशुकाट पसरला होता. सोमवारी तीन तास बोट क्लब उशिरा सुरू करण्यात आला. त्यामुळे सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत पर्यटकांची गैरसोय झाली. अनेक पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता आला नाही.

कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा...
दिवसभर पालिकेत इतर कर्मचाऱ्यांमध्ये या प्रकरणाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. प्रशासन काय कारवाई करणार व याप्रकरणी लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार, याकडे महाबळेश्वरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: The employees will be picked up in other departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.