चैतन्यपूर्ण लयदार रेषांचा सम्राट श्यावक्ष चावडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 05:54 AM2018-12-23T05:54:40+5:302018-12-23T05:54:56+5:30

वेरूळमधील लय, अजिंठ्यातली नजाकत आणि खजुराहोमधल्या वास्तवाची मिसळण घेऊन प्रख्यात चित्रकार श्यावक्ष चावडांची चैतन्यपूर्ण रेषा त्यांच्या चित्रांतून प्रवाही होत गेली आहे.

The Emperor of Luminous lines | चैतन्यपूर्ण लयदार रेषांचा सम्राट श्यावक्ष चावडा

चैतन्यपूर्ण लयदार रेषांचा सम्राट श्यावक्ष चावडा

googlenewsNext

- श्रीराम खाडिलकर

वेरूळमधील लय, अजिंठ्यातली नजाकत आणि खजुराहोमधल्या वास्तवाची मिसळण घेऊन प्रख्यात चित्रकार श्यावक्ष चावडांची चैतन्यपूर्ण रेषा त्यांच्या चित्रांतून प्रवाही होत गेली आहे. अशा या महान भारतीय कलाकाराच्याकलाकृतींचे सिंहावलोकनी प्रदर्शन २० डिसेंबर २०१८ रोजी सुरू झाले असून येत्या ६ जानेवारी २०१९ पर्यंत रसिकांना पाहता येणार आहे. अभ्यासू आणि जिज्ञासूंबरोबरच कलेचे शिक्षण घेणाऱ्या नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरणारे हे महत्त्वाचे प्रदर्शन आहे.

पॉल गोगँ या विश्वविख्यात कलाकारांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. ‘‘ज्यांना रेषेतून व्यक्त होता येत नाही असे कलाकार रंगचित्रे काढतात.’’ असे श्लेष असलेले ते वाक्य बºयाच गोष्टी सूचित करीत असते. मात्र, त्यातला रेषेचा संदर्भ थेट प्रख्यात भारतीय चित्रकार श्यावक्ष चावडा (जन्म १९१४ ते मृत्यू १९९०) यांच्याशी जाऊन मिळतो असे आपण बेधडक म्हणू शकतो. याला कारण आहे. ते असे की, फक्त रेषा हाच स्थायीभाव असलेल्या अत्यंत दर्जेदार आणि अभिजात असलेल्या कलाकृती या कलाकाराने घडवल्या. रेषेवर या कलाकाराचा प्रचंड जीव होता आणि हुकूमतही होती.
मुंबईत सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये मिळालेल्या शिक्षणाहूनही अधिक कला शिक्षण मिळवण्याच्या ध्यासापायी चावडांनी शिष्यवृत्ती मिळवून थेट लंडन गाठले आणि तिथल्या स्लेड स्कूल आॅफ फाईन आर्ट्समध्ये कलाशिक्षण घेणे सुरू केले. नंतरच्या काळात प्रत्यक्ष काम करताना तसेच त्यांच्या विचारांची बैठक पक्की होण्यासाठी या शिक्षणाचा त्यांना खूपच फायदा झाला. कलेतल्या नव्या विचारांच्या आविष्कारांच्या झंझावातामध्येही जबरदस्त आत्मविश्वास असलेले चावडा स्वत:च्या शैलीत ठामपणे कलानिर्मिती करत राहिले. अचूकपणा आणि तरीही सहजता हे चावडांच्या रेखाटनांचे गुण आहेत. ही गोष्ट त्यांची ही रेखाचित्रे आणि रंगचित्रे पाहताना जाणवते.
चावडांच्या चित्रांतल्या रेषेबद्दल लिहिताना नेमके शब्द सापडत नाहीत. तरीही त्यांच्या रेषेचे वर्णन करताना इतकेच म्हणता येईल की चित्रातली रेषा विलक्षण लयदार, गतिमान, पूर्वनियोजित मार्गावरून एखादे रॉकेट जावे अशा आश्वासक पद्धतीची तसेच चैतन्याची जाणीव करून देणारी आहे. वेरूळमधली लय, अजिंठ्यातली नजाकत आणि खजुराहोमधल्या वास्तवाची मिसळण घेऊन ती चावडांच्या चित्रांतून प्रवाही होत गेली आहे. खरेतर, रेषा हेच त्यांचे जगणे होते. रेषेची प्रतारणा त्यांनी कधी केली नाही. उलट आयुष्यभर तिची साधनाच केली.
प्रत्येक कामासाठी स्वत:च्या समोर ते विशिष्ट मॉडेल उभे करून नंतरच त्याचे रेखाटन करण्याच्या त्यांच्या सवयींमुळे चित्रणात सतत अचूकपण दिसत गेले. रेषा प्रशंसन्ति आचार्या: असे म्हणतात. दृश्यकलेचा विचार करताना रेषा ही सर्वांत प्रभावीपणे भाव व्यक्त करीत असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तसेच त्यानंतर भाव व्यक्त करायला उपयोगी पडतात ते रंग. या दोन माध्यमांपैकी रेषेवर चावडांचा विलक्षण जीव असल्याचे कोणत्याही विषयावरील त्यांच्या रंगचित्रांचे निरीक्षण करताना आपल्याला दिसते. याचा परिणाम असा होतो की रंग भाववाही असले तरी या कलाकाराच्या चित्रात ते असूनही गौणच आहेत असे भासत राहते. त्यांनी काढलेल्या शास्त्रीय अथवा बॅले नर्तक - नर्तिकांच्या चित्रांमध्ये ताल, संतुलन, जबरदस्त ऊर्जा त्यात स्पष्टपणे जाणवतेच; त्याचबरोबर नव्या आकृतीबंधाची दृश्यरूपेही नकळतच उलगडत जातात. इतकेच नाहीतर, प्राणी-पक्षी यांच्या प्रतिमा असलेल्या कलाकृती असोत. सगळ्याच कलाकृतींमधून सौंदर्य झिरपत राहते ते आधी रेषेमुळे आणि नंतर रंगांमुळे. त्यांच्या चित्रांमधल्या रंगांमध्येही खूपच साधेपणा आहे. हा साधेपणा त्यांच्या स्वभावातून आला असला पाहिजे असे वाटते. साधेपणा आणि भाववाही रेषा यांच्या मिश्रणातून अस्तित्वात आलेली त्यांची कलाविष्काराची दुनिया लोभसवाणी आहे. चावडांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनी होणाºया मुंबईतल्या वरळीत नेहरू सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रदर्शनात याचा अनुभव नक्कीच येईल.
(लेखक दृश्यकला अभ्यासक, कलासमीक्षक आणि चित्रकार आहेत.)

Web Title: The Emperor of Luminous lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :artकला