बीट शेतीत लावले शिक्षणाचे कसब..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:38 AM2018-10-15T11:38:48+5:302018-10-15T11:39:03+5:30

यशकथा : बीट असो, कारले असो वा अन्य पालेभाज्यांची शेती ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन यातून उत्पन्न मिळवावे, असा सल्ला नीलेश बांगर यांनी दिला आहे.

Education applied for Beat cultivation | बीट शेतीत लावले शिक्षणाचे कसब..!

बीट शेतीत लावले शिक्षणाचे कसब..!

Next

- विशाल शिर्के (पुणे)

कृषी अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर नोकरीत न रमता शेतीलाच करिअर निवडून त्यात आपल्या शिक्षणाचे पूर्ण कसब लावणाऱ्या मंचर येथील उच्च शिक्षित युवा शेतकऱ्याने बीट शेतीचा नवा मार्ग निवडून दोन हंगामात तब्बल १४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यांचा हा प्रयोग पारंपरिक शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

मंचरजवळ असलेल्या चांडोली या गावातील उच्च शिक्षित शेतकरी नीलेश बांगर यांनी ही किमया केली आहे. बी.एस्सी. नंतर नोकरी न करता घरची शेतीच करायची, असा निश्चय सुरुवातीपासूनच केला असल्याचे बांगर यांनी सांगितले. तिन्ही ऋतूत बीट पीक घेता येते. मात्र, मंचर परिसरात पाऊस अधिक असल्याने पावसाळ्यात हे पीक घेता येत नाही. बीट पिकाला कमी पाऊस असला तरीही चालतो. जास्त पावसाळ्यात बीट लाल पडते.

हिवाळ्यात बियाणे कमी लागत असल्याने खर्च कमी येतो. उन्हाळ्यात बियाणेदेखील जास्त लागते आणि कीटकनाशकाच्या फवारण्यादेखील जास्त कराव्या लागतात. पावसाळ्यात बीटला प्रतिकिलो २० ते ३० रुपये दर मिळतो. मात्र उत्पादन सरासरीच्या २५ टक्केच येते. उन्हाळ्यात तुलनेने चांगला भाव मिळतो.

हिवाळ्यात (नोव्हेंबर ते जानेवारी) उत्पादन चांगले येते. तसेच उत्पादन खर्चही कमी येतो. उत्पादन जास्त असल्याने भावही किलोला २ ते ४ रुपये अधिक मिळतो, त्यामुळे बीट शीतगृहात साठवून ठेवले. त्यानंतर बाजारातील स्थिती पाहून विक्रीसाठी आणले. हिवाळ्यात नऊ एकरातून १७८ टन उत्पादन घेऊन ९ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता ४ लाख रुपयांचा फायदा झाला. उन्हाळ्यात ४ एकरातून ४० ते ४२ टन उत्पादन मिळाले.

सरासरी १२ रुपये किलोप्रमाणे दर मिळाला. त्यातून ५ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता अडीच लाख रुपयांचा फायदा झाला. बाजारातील स्थिती, उत्पन्नानुसार केलेला पुरवठा असे व्यवस्थापन केल्याने बीट पिकातून चांगले उत्पादन आणि भाव मिळाल्याचे बांगर यांनी सांगितले.   शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक न घेता, वेगळे काही करता येईल का? याचे नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ हवामान, नापिकी याला शेतकऱ्यांनी दोष न देता शेतीचे व्यवस्थित नियोजन केल्यास शेती फायद्याचीच आहे.

बीट असो, कारले असो वा अन्य पालेभाज्यांची शेती ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येऊन यातून उत्पन्न मिळवावे, असा सल्ला नीलेश बांगर यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी स्वत:चे उदाहरण दिले. ते म्हणतात, माझे शिक्षण बी.एस्सी.पर्यंत झाले होते. नोकरीच्या मागे न लागता मी शेती करण्याचा निर्णय घेऊन बीट शेतीचा पर्याय निवडला. यातून मला अपेक्षित किंबहुना त्यापेक्षा अधिक फायदा बीट शेतीमधून झाला, असे बांगर यांनी आवर्जून सांगितले.   

Web Title: Education applied for Beat cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.