ऑनलाइन लोकमत
किल्लारी (जि. लातूर), दि. 11 - लातूरमधील औसा तालुक्यातील किल्लारीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ हून अधिक गावांना बुधवारी रात्री ८.३९ वाजता भूकंपाचा १.८ रिश्टर स्केलचा धक्का बसला. यामुळे नागरिकांत घबराहट पसरली आहे. दोन महिन्यानंतर पुन्हा भूकंपाचा धक्का बसला आहे. यावेळच्या भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी, लातूर जिल्ह्यातील २६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ गावांना भूंकपाने हलविले.
औसा तालुक्यातील किल्लारीसह परिसरातील किल्लारीवाडी, येवळट, सिरसल, तळणी, गुबाळ, मंगरुळ,  पारधेवाडी, बाणेगाव, गांजणखेडा, नांदुर्गा, हासलगण, लोहटा, लिंबाळा, एकोजी मुदगड, कारला, वानेवाडी, कार्ला, नदी हत्तरगा, सांगवी, चिंचोली जोगन, कोकळगाव, सरवडी, कवठा, हरेगाव आदीं तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर, माकणी, लोहारा, उमरगा, नारंगवाडी, पेटसांगवी, हिप्परगासह परिसरातील जवळपास १२  हून अधिक गावांना बुुधवारी रात्री ८.३९ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सध्या थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटविल्या जात आहेत. दरम्यान, रात्री बुधवारी रात्री ८.३९ वाजता भूगर्भातून आवाज आल्याने नागरिकांनी घाबरुन घराबाहेर पळ काढला. 
दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर या परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्याने किल्लारीसह परिसरातील गावकरी आपल्या लेकरांबाळांसह रस्त्यावर आले. हा धक्का १.८  रिश्टर स्केलचा असल्याचे तहसिलदार अहिल्या गाठाळ यांनी सांगितले.
 
जीवित, वित्तहानी नाही...
किल्लारीसह परिसरातील जवळपास १७ गावांना बुधवारी रात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. भूकंपप्रवण क्षेत्रातील गावांची माहिती घेण्याचे आदेश अधिका-यांना देण्यात आले आहेत. असे तहसिलदार अहिल्या गाठाळ यांनी माहिती घेण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. प्रशासनाकडे अद्याप कुठल्याही नुकसानीची माहिती प्राप्त झाली नाही, असेही त्या म्हणाल्या.