मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतरही सत्तेची संधी हुकलेल्या भाजपाने शिवसेनेची कोंडी सुरू केली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करत शिवसेनेच्या स्वप्नाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला दणका महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बसला आहे.
महापालिकेचे सुमारे चार हजार भूखंड भाडेकराराने देण्यात आले आहेत. यातील २३६ भूखंडांचे भाडेकरार २०१३ साली संपले आहेत. तरीही महापालिकेने हे भूखंड अद्याप ताब्यात घेतलेले नाहीत. यातील अनेक भूखंडांवर कराराचा भंग करून अनधिकृत बांधकाम झाले आहे. कराराचा भंग करणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्सचा ताबा असलेल्या मेसर्स रॉयल वेस्टर्न टर्फ कल्बने कराराचा भंग केला. त्यामुळे त्यांना मुदतवाढ न देता मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मांडला. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. मात्र हा प्रस्ताव गेली तीन वर्षे सरकार दरबारी धूळखात आहे.
सत्तेवर सरकार आल्यानंतरही युती असताना भाजपा सरकारने कोणतीच पावले उचलली नाही. याउलट आता युती तुटल्यामुळे शिवसेनेचा हा प्रस्ताव बासनात जाण्याची शक्यता आहे. भाजपा सरकारने नियमात बदल करून भाडेपट्टी कराराचे नूतनीकरण व नवीन अट घालण्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणास देत पूर्व परवानगी राज्य शासनाची असेल, अशी तरतूद केली आहे. भाजपा सरकारच्या या नव्या अधिसूचनेमुळे महापालिकेला जमिनीच्या भाडेकराराचे नूतनीकरण करता येणार नाही. त्यामुळे रेसकोर्सवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न आता अपुरे राहणार आहे. (प्रतिनिधी)