Happy Diwali 2017 : दिवस लक्ष्मीपूजनाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 07:04 AM2017-10-19T07:04:41+5:302017-10-19T08:11:32+5:30

आज गुरुवार, दि. १९ आॅक्टोबर, आश्विन अमावस्या , लक्ष्मी-कुबेरपूजन, अलक्ष्मी निस्सारण आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे.

 Day Lakshmi Poojaana! | Happy Diwali 2017 : दिवस लक्ष्मीपूजनाचा!

Happy Diwali 2017 : दिवस लक्ष्मीपूजनाचा!

Next

- दा. कृ. सोमण

आज गुरुवार, दि. १९ आॅक्टोबर, आश्विन अमावस्या , लक्ष्मी-कुबेरपूजन, अलक्ष्मी निस्सारण आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे! सन्मार्गाने मिळविलेला आणि सन्मार्गाने खर्च होणाºया संपत्तीला ‘लक्ष्मी’ असे म्हणतात. भ्रष्टाचार, अनीतीने मिळविलेला पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे! आज प्रदोष काळी लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे. प्रथम ‘प्रदोष काळ’ म्हणजे काय ते पाहू या. रात्रीमानाचे पंधरा भाग केले, तर एका भागाला ‘मुहूर्त’ म्हणतात. सूर्य मावळल्यापासून पुढे तीन मुहूर्त ‘प्रदोषकाल’ मानला जातो. या वर्षी गुरुवारी सायंकाळी ६.१३ पासून रात्री ८.३९ पर्यंत प्रदोषकाल आहे. आज या वेळेत लक्ष्मी-कुबेरपूजन करावयाचे आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे. नवीन वस्त्रालंकार घालून आनंदोत्सव साजरा केला जातो. लक्ष्मी, कुबेर यांची पूजा करावयाची असते.व्यापारी लोक आपल्या हिशेबांच्या वह्यांवर ‘श्री’ अक्षर लिहून वहीचे पूजन करतात.

लक्ष्मीची आवड
पुराणात एक कथा आहे. आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता, श्रम असतील, तेथेच लक्ष्मी आकर्षित होते, तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात, तेथे राहणे लक्ष्मीला आवडते.
लक्ष्मीला ‘तू राहते कुठे?’ असा प्रश्न विचारला असता, ती म्हणते, ‘मी प्रयत्नात राहते. प्रयत्नाच्या फलात राहते. मी उद्योगरूप आहे. मी साक्षात समृद्धी आहे. धर्मात्मे आणि सत्यवादी पुरुष यांच्या घरी माझे वास्तव्य असते. जोवर असुर सत्याला धरून वागत होते, तोवर मी त्यांच्या घरीही राहिले. जेव्हा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली, तेव्हा मी त्यांचा त्याग करून देवेंद्राच्या राज्यांत दाखल झाले आणि स्वर्ग भरभराटीला आणला. शांती, प्रेम, दया, सलोखा, न्याय-नीती, औदार्य हे सद्गुण प्रकर्षाने जिथे दिसतात, तेथे मी आकृष्ट होते.
लक्ष्मी हा शब्द ‘लक्ष्म’ म्हणजे चिन्ह यावरून बनलेला आहे. मात्र, कोणत्या चिन्हावरून लक्ष्मीचा बोध होतो, हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. लक्ष्मीचाच पर्यायी शब्द म्हणजे ‘श्री’ होय आणि ‘श्री’ हे अक्षर स्वस्तिकापासून तयार झालेले आहे. श्री आणि लक्ष्मी हे दोन्ही शब्द ऋग्वेदात आहेत. श्रीसूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. श्रीसूक्तात कमळ, हत्ती, सुवर्ण आणि बिल्वफळ या गोष्टी लक्ष्मीशी निगडित असल्याचे म्हटले आहे. ‘लक्ष्मी हत्तीच्या आवाजाने जागी होते. बिल्व तिचा वृक्ष आहे.ती सुवर्णाची आहे. ती आल्हाददायक आहे. ती स्वत: तृप्त असून, तृप्ती देणारी आहे. तिचा वर्ण कमलासारखा असून, ती कमलावरच बसलेली आहे.’
श्रीसूक्तात लक्ष्मीची प्रार्थना करताना तिचे काव्यात्मक सुंदर वर्णन केलेले आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण सर्वांनी ती प्रार्थना म्हणू या-
‘कमलात वास्तव्य करणाºया, कमल हाती धरणाºया, अतिधवल वस्त्र, शुभ्र चंदन आणि शुभ्र पुष्पे यांनी शोभणाºया, विष्णूची प्रियवल्लभा असणाºया, सुंदर आणि त्रैलोक्याची समृद्धी करणाºया हे भगवती लक्ष्मी, तू मजवर प्रसन्न हो.’
आपण नारळाचा ‘श्रीफळ’ म्हणून उल्लेख करतो, ते चुकीचे आहे. बिल्व वृक्षाचे फळ म्हणजे ‘श्रीफळ’ होय. लक्ष्मी ही सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असल्यामुळे, तिची आठ रूपे असल्याचे म्हटले आहे. (१) धनलक्ष्मी (२) धान्यलक्ष्मी (३) धैर्यलक्ष्मी (४) शौर्यलक्ष्मी (५) विद्यालक्ष्मी (६) कीर्तीलक्ष्मी (७) विजयलक्ष्मी (८) राज्यलक्ष्मी ही आठ रूपे पूजनीय ठरली आहेत. बल आणि उन्माद हे लक्ष्मीचे दोन पुत्र आहेत, परंतु हे पुत्र भावात्मिक असावेत. कारण ज्याच्या घरी लक्ष्मी येते, तो बलवान होतो आणि पुष्कळदा उन्मत्तही होतो, असा अनुभव येतो. आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत असे लक्ष्मीचे चार पुत्र असल्याचे श्रीसूक्तात म्हटले आहे.
कुबेराचे पूजन
महाभारतात कुबेराचा उल्लेख ‘पुलस्त्याचा पुत्र’ असा केलेला आहे. मात्र, अथर्ववेदात कुबेराचा ‘वैश्रवण’ असा उल्लेख आहे. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्त्य; पुलस्त्याचा पुत्र विश्रवा आणि विश्रवाचा पुत्र कुबेर असल्याचे म्हटले आहे. म्हणून कुबेराला ‘वैश्रवण’ असे नाव मिळाले. कुबेराने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला संतुष्ट केले व त्याच्याकडून संपत्तीचा स्वामी व विश्वरक्षक हे अधिकार प्राप्त करून घेतले.
नंतर कुबेराने विश्वकर्म्याने बांधलेल्या सुवर्णतटमंडित लंकेवर अधिकार मिळविला आणि तेथेच तो राज्य करू लागला. कुबेराकडे पुष्पक विमान असल्याचाही उल्लेख आढळतो. पुढे रावणाने कुबेराचे सर्व हिरावून घेतले. नंतर कुबेर हिमालयातील अलका नगरीत जाऊन राहिला. लक्ष्मी-कुबेरपूजनाच्या वेळी लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून त्याची पूजा व प्रार्थना करतात.
अलक्ष्मी निस्सारण
अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची देवता मानली जाते. आज हिची शेणाची मूर्ती बनवून तिला काळे वस्त्र नेसवून तिची पूजा करून गावाबाहेर नेऊन तिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. आपल्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य असावे आणि अलक्ष्मी आपल्या घरात येऊ नये, यासाठी आज तिचेही पूजन करून, तिला गावाबाहेर नेऊन विसर्जित केले जाते. समुद्र मंथनातून कालकूटनंतर लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी बाहेर आली. म्हणून हिला लक्ष्मीची मोठी बहीण समजले जाते. तिचे तोंड काळे, डोळे लाल आणि केस पिंगट होते. हिच्या शरीरावर म्हातारपणाच्या खुणा होत्या. समुद्र मंथनातून बाहेर आल्यावर अलक्ष्मीने देवांना विचारले, ‘मी कुठे राहू?’ त्यावर देव म्हणाले, ‘जिथे केस, कचरा, कलह, अनीती भ्रष्टाचार , असत्य भाषण, सज्जनांची निंदा, परद्रव्यहरण, आळस, व्यभिचार असेल, तेथे तू रहा.’
अलक्ष्मीचे वाहन गाढव असून, तिच्या हातात झाडू आहे. अलक्ष्मी म्हणजे कलह, अस्वच्छता ही आपल्या घरात राहू नये, म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक झाडूची पूजा करतात. लक्ष्मी-अलक्ष्मीसंबंधी एक कथा आहे.
एकदा लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघीही एका ऋषींकडे गेल्या. त्या दोघींनी ऋषींना विचारले, ‘मुनीवर्य, आमच्या दोघींपैकी सुंदर कोण दिसतेय? आणि पाहणाºयाला आनंद वाटतोय?’
ऋषींना या दोघींपैकी कुणालाच नाराज करावयाचे नव्हते. ते म्हणाले, ‘तुम्ही दोघीही समोरच्या झाडाला हात लावून इथे या. मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो.’
दोघीही पळत पळत झाडाला हात लावून परत ऋषींकडे आल्या.
ऋषी म्हणाले, ‘अलक्ष्मी तू इथून जात असताना सुंदर दिसत होतीस. लक्ष्मी तू इथे येत होतीस, त्या वेळी सुंदर दिसत होतीस.’
दोघींचे समाधान झाले. अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य घरातून जाते, त्या वेळी आपणास आनंद होतो. लक्ष्मी म्हणजे संपत्ती घरात येते, त्या वेळी आपणास आनंद वाटतो.
‘लोकमत’च्या सर्व वाचकांच्या घरातून अलक्ष्मी कायमची जावो आणि घरात लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य राहो, यासाठी सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Web Title:  Day Lakshmi Poojaana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.