स्पर्धा परीक्षा : करिअरचा राजमाग

By admin | Published: January 15, 2017 01:20 AM2017-01-15T01:20:26+5:302017-01-15T01:20:26+5:30

शहरी भागातील विद्यार्थी व पालकवर्गात स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, माहिती व मार्गदर्शनाची उपलब्धता, तसेच खासगी मंदी व स्पर्धा परीक्षेत यश

Competitive Examination: Career's Highness | स्पर्धा परीक्षा : करिअरचा राजमाग

स्पर्धा परीक्षा : करिअरचा राजमाग

Next

- प्रा. राजेंद्र चिंचोर्ले

शहरी भागातील विद्यार्थी व पालकवर्गात स्पर्धा परीक्षेविषयी सातत्याने वाढणारी जागृती, माहिती व मार्गदर्शनाची उपलब्धता, तसेच खासगी मंदी व स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या, यामुळे स्पर्धा परीक्षा हाच करिअरचा खरा राजमार्ग ठरत आहे.

स्पर्धा परीक्षांचा उद्देश प्रशासकीय कामकाजासाठी चांगले अधिकारी व कर्मचारी निवडणे हा आहे. या परीक्षांद्वारे सर्वांना आपली गुणवत्ता, आपले कौशल्य, आपले व्यक्तिमत्त्व दाखविण्याची संधी असते. स्पर्धा परीक्षांमुळे गुणवत्तेला वाव मिळून चांगले अधिकारी, कर्मचारी निवडले जातात. नजीकच्या काळात कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा अपरिहार्य असणार आहेत.
स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुलांचा सहभाग व यश हा चिंतेचा विषय आहे. स्पर्धा परीक्षांबद्दल अज्ञान, माहिती व मार्गदर्शनाचा अभाव, संदर्भ साहित्याचा अभाव, करिअरबद्दलची उदासीनता, जोश, जोम व नियोजनाचा अभाव या कारणांमुळे ग्रामीण भागाील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी उदासीनता आढळते.
शिपायापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या पदांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. केंद्रीय पातळीवरील कर्मचारी व अधिकारी निवडीकरिता केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन), बँक भरती मंडळे, रेल्वे भरती मंडळे यांच्यामार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. महाराष्ट्रातील राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी निवडीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) विभागीय निवड समिती, जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात.
विद्यापीठ परीक्षा व स्पर्धा परीक्षा यांच्यात मोठा फरक आहे. विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी मिळते, तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी मिळते. विद्यापीठ परीक्षा या एकरेषीय, तर स्पर्धा परीक्षा या बहुरेषीय असतात. विद्यापीठ परीक्षेचा कल हा विषय ज्ञान तपासणे हा असतो, तर स्पर्धा परीक्षेचा कल हा सामान्यज्ञान तपासणे हा असतो. विद्यापीठ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त, तर स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण (निवड) होणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी असते. विद्यापीठ परीक्षेत एकाच विषयाच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते, तर स्पर्धा परीक्षांमध्ये सर्व प्रकारच्या पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते.
स्पर्धा परीक्षा हे साधन असून, अधिकारी बनून देशाची सेवा करणे हे साध्य आहे. सरकारी अधिकारी बनून स्थिर व आव्हानात्मक करिअरच्या माध्यमातून देशाची व समाजाची प्रामाणिकपणे आणि परिणामकारक सेवा करता येते. समाजात मान, सन्मान, आदर, कीर्ती प्राप्त होते.
स्पर्धा परीक्षेत परिश्रम, सूत्रबद्ध, सातत्यपूर्ण व नियोजनपूर्वक अभ्यास ही यशाची गुरुकिल्ली आहे. अत्यंत विपरीत शिक्षण घेतलेले वरुण बरनवाल, नितीन जावळे, डॉ. राजेंद्र भारुड, संजय आखाडे, गोकूळ मवारे, बालाजी मंजुळे, रमेश घोलप, अंसार शेख, नितीन राजपूत, गोविंद जयस्वाल, दीपककुमार यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून, आयएएस पदावर विराजमान झाले आहेत.
स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. आपल्यातील क्षमता व मर्यादा ओळखाव्यात. ध्येय निश्चित करावे. मोठी स्वप्ने पाहावी. जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रयत्न यांची जोड दिल्यास, करिअरचे यशोशिखर गाठता येणे सहज शक्य आहे.

Web Title: Competitive Examination: Career's Highness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.