रासायनिक सांडपाणी टँकरद्वारे गोळा करा

By admin | Published: August 2, 2016 03:36 AM2016-08-02T03:36:54+5:302016-08-02T03:36:54+5:30

डोंबिवलीतील ८६ रासायनिक कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

Collect chemical wastewater through tankers | रासायनिक सांडपाणी टँकरद्वारे गोळा करा

रासायनिक सांडपाणी टँकरद्वारे गोळा करा

Next


डोंबिवली : डोंबिवलीतील ८६ रासायनिक कंपन्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटिसांना स्थगिती देण्यासाठी कंपनीमालकांनी ‘कामा’ या संघटनेमार्फत राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. लवादाने त्यांच्या याचिकेवर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रासायनिक कंपन्यांतील सांडपाणी टँकरद्वारे गोळा करण्याचा प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संचालक मंडळाने दिला आहे. टँकरद्वारे सांडपाणी गोळा केल्यास नेमके कोणत्या प्रकारच्या कंपन्यांतून जास्त प्रदूषित सांडपाणी सोडले जाते, याचा छडा लागेल, असा विश्वास सांडपाणी प्रक्रिया केंद्राने व्यक्त केला आहे.
सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्यात प्रदूषणाची मात्रा जास्त आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडून प्रक्रिया करताना आखून दिलेल्या निकषांची पूर्तता केली जात नाही. याप्रकरणी ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेतर्फे दाखल केलेली याचिका लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. लवादाने याप्रकरणी प्रदूषण मंडळासह सगळ्यांना चांगलेच फटकारले. परिणामी, प्रदूषण मंडळाने २ जुलैला डोंबिवलीतील ८६ व अंबरनाथमधील ५६ रासायनिक कारखान्यांना बंदची नोटीस बजावली. त्यामुळे ११ जुलैला कंपनीमालकांनी ‘कामा’च्या मध्यस्थीने लवादाकडे धाव घेतली. नोटिसांना स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. यावर, सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी लवादाने कंपन्यांनी केलेली मागणी मान्य केलेली नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी १९ आॅगस्टला होणार आहे.
डोंबिवली फेज-१ मध्ये १६ दशलक्ष लीटर क्षमतेचे व फेज-२ मध्ये दीड दशलक्ष लीटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या दोन्ही सांडपाणी प्रक्रिया केंद्रांत रासायनिक व कापड उद्योग प्रक्रिया कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी होते. दोन्ही उद्योगांचे सांडपाणी एकाच पाइपलाइनद्वारे प्रक्रियेसाठी पाठवले जात असल्याने प्रदूषणाची मात्रा नेमकी कोणत्या प्रकारच्या सांडपाण्यामुळे कमी होत नाही, याचा शोध घेता येत नाही. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संचालक मंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी टँकरद्वारे वाहून नेण्याची परवानगी मागितली आहे. अल्पावधी काळासाठी ही परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सांडपाणी प्रक्रिया केंद्राने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सादर केला. मात्र, त्याला मंडळाने अजूनही परवानगी दिलेली नाही. तसेच हा प्रस्ताव लवादासमोर मांडलेला नाही. त्याचे कारण कंपन्या टँकरद्वारे रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेण्याची परवानगी मागत असल्या तरी त्यात किती कालावधी व मुदतीचा काही संदर्भ दिलेला नाही. त्यात कालावधी नमूद केलेला नाही. हा उपाय अल्पावधीसाठी असला तरी दीर्घकाळासाठी होऊ शकत नाही. या अंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विचार सुरू असावा. लवादाने यावर काही भाष्य केलेले नाही. त्यामुळे लवादाने कंपन्या बंदच्या नोटिसांना स्थगिती देण्याच्या अर्जावर १९ आॅगस्टला सुनावणी ठेवली आहे.
>कापड उद्योग प्रक्रिया कंपन्यातील सांडपाणी पाइपलाइनद्वारे वाहून न्यावे. दोन वेगळ्या प्रकारच्या कंपन्यांतून सांडपाणी वेगवेगळे वाहून नेल्यास नेमके कोणत्या प्रकारच्या कंपन्यांतून जास्त मात्रा असलेले प्रदूषित पाणी पाठवले जाते, त्यावर प्रक्रिया करून त्याची मात्रा कमी होत नाही, हे शोधणे व सिद्ध होणे शक्य होईल. तसेच प्रदूषणकारी कंपनीवरही लक्ष देता येईल, असा दावा उद्योजकांनी केला आहे.

Web Title: Collect chemical wastewater through tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.