चिऊ-काऊ भांडले अन् माणसांचे झोपडे पेटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:26 AM2018-04-27T01:26:33+5:302018-04-27T01:26:33+5:30

कावळेदादांच्या पवित्र्यामुळे विजेच्या तारा हेलखावे खात एकमेकांना घासल्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडून त्या खालील झोपड्यांवर पडल्या आणि त्यांना आग लागली.

Chihu-Kao Fashions and Humans Shackle! | चिऊ-काऊ भांडले अन् माणसांचे झोपडे पेटले!

चिऊ-काऊ भांडले अन् माणसांचे झोपडे पेटले!

Next

अंबाजोगाई (जि. बीड) : काय झालं...वैशाख वणवा पावसाळ्याची चाहूल देऊ लागल्याने चिऊ आणि काऊ दोघेही आपले घर बनविण्याच्या कामात दंग होते. दिसेल ती काडी, पालापोचाळा उचलून ते आपआपल्या घरासाठी नेत होते. चिऊताई म्हणाली...कावळेदादा, कावळेदादा तुझ्या शेणाच्या घराला कशाला हवी ही काडी ? मी घेऊन जाते ती....झालं त्यावरून दोघांच्यात कुरबुरी सुरू झाल्या आणि भांडण विकोपाला गेले.
एकमेकांना टोच्या मारत दोघांचा विजेच्या तारांवर लपंडाव सुरू होता. कावळेदादा जाम भडकले होते... कशी करतेस तू मेणाचं घर तेच बघतो, असं म्हणत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यामुळे दोन्ही विजेच्या तारा एकमेकांना घासल्याने ठिणग्या उडाल्या. त्या माणसांनी बनविलेल्या दोन झोपड्यांवर पडल्याने त्या जळून खाक झाल्या आणि कावळेदादांनाही प्राणास मुकावे लागले.
बीड जिल्ह्यातील हातोला (ता. अंबाजोगाई) येथे गुरुवारी दुपारी ही गोष्ट घडली. हातोला गावाने वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेला आहे. बुधवारी सकाळचे श्रमदान आटोपून लोक गावात आले होते. महिला घरांकडे गेल्या होत्या, तर पुरुष गावातील मंदिरासमोर थांबले होते. त्याचवेळी चिऊ-काऊ भांडत असताना त्यांना दिसले. कावळेदादांच्या पवित्र्यामुळे विजेच्या तारा हेलखावे खात एकमेकांना घासल्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडून त्या खालील झोपड्यांवर पडल्या आणि त्यांना आग लागली. वाळलेल्या कुडांमुळे आणि कडक उन्हामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.
श्रमदान करून आल्यामुळे सरपंच जयसिंग चव्हाण आणि बहुतांशी ग्रामस्थ गावातच होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माती आणि पाण्याच्या साह्याने आग विझविली. परंतु तोपर्यंत सुंदर नागोराव पंडित आणि महादेव पिराजी दासूद या दोघांच्या झोपड्या खाक झाल्या. तर प्रभावती लिंबराज माने, विठ्ठल इराप्पा लोखंडे, छायाबाई विलास गायकवाड यांच्या घरांचे नुकसान झाले.

‘कधीच भांडू नका बाळांनो’
भांडणाऱ्या कावळेदादांना निपचित पडलेले पाहून चिऊताईला खूप दु:ख झाले. आता कावळेदादा नसले तरी भांडणाला कारणीभूत ठरलेली ती काडी काही तिने घरासाठी नेली नाही आणि घर बांधायचेही सोडलेले नाही. आता तिचे घर होईल, पिल्ले होतील. त्यांना घास भरवत मोठं करताना ती त्यांना कावळेदादांची ही गोष्ट सांगून ‘कधीच भांडू नका बाळांनो’ असा कानमंत्र नक्कीच देईल.
बीडमधील गोष्ट; वीजतारा घासल्याने स्पार्किंग होऊन आग

Web Title: Chihu-Kao Fashions and Humans Shackle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग