नागपूर : वाढलेली महागाई, मंदी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढल्यामुळे यंदा दिवाळीत फटाका व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. पूर्वीच्या तुलनेत करात वाढ झाली नसली तरीही विक्रीत १५ ते २० टक्क्यांची घसरण झाल्याचे व्यापाºयांनी सांगितले. याशिवाय लोकांच्या हाती रोख नसल्यामुळे भेटस्वरूपात देण्यात येणारी मिठाई आणि ड्रायफ्रूट बॉक्सेसची खरेदी कमी प्रमाणात केल्यामुळे यंदा दिवाळीत गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी उलाढाल झाल्याची माहिती व्यापाºयांनी लोकमतशी बोलताना दिली.

दिवाळीत मिठाई अथवा ड्रायफ्रूट बॉक्स भेटस्वरुपात देण्याची परंपरा आता कमी होऊ लागली आहे. यंदा दिवाळी कुटुंबापर्यंतच मर्यादित राहिली. दरवर्षी मिठाई आणि ड्रायफ्रूटची समप्रमाणात विक्री होते. पण यावर्षी लोकांनी लक्ष्मीपूजनाला आवश्यक मिठाईची खरेदी केली. काजू कतलीचे भाव ८०० रुपयांवर गेल्यामुळे लोकांनी पाव किंवा अर्धा किलो खरेदीवर समाधान मानले. यावर्षी सर्वाधिक फटका या व्यवसायाला बसल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

फटाक्यांची कमी विक्री
प्रशासनाने विक्रेत्यांना उशिरा परवाने दिल्यामुळे यावर्षी फटाक्यांची कमी विक्री झाली. शिवाय सेंट्रल एव्हेन्यू, गांधीबाग व इतवारी भागात मेट्रो रेल्वेच्या कामामुळे ग्राहकांना दुकानापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्यात. त्याचाही फटका या व्यवसायाला बसला. दिवाळीत १५ ते २० टक्के विक्री कमी झाली. काही फटाक्यांना चांगली मागणी होती.
- ललित कारवटकर, संचालक,
कारवटकर अ‍ॅण्ड सन्स.

जीएसटीचा व्यवसायावर परिणाम

पूर्वी फटाक्यांवर १२.५ टक्के अबकारी कर, १३.५ टक्के व्हॅट आणि २ टक्के सीएसटीची आकारणी व्हायची. तेव्हाही २८ टक्के कर लागायचा. पण आता जीएसटी सरसकट २८ टक्के आकारण्यात येत असल्यामुळे लोकांचे या जीएसटीच्या या कर टप्प्याकडे लक्ष वेधले गेले. प्रत्येक खरेदीदार जीएसटीसंदर्भात विचारण करीत होता. त्याचाही परिणाम फटाका व्यवसायावर पडला. प्रदूषणरहित फटाक्यांवर लोकांचा भर दिसून आला. शिवाय मिठाई व्यवसायावर जीएसटीची आकारणी ५ टक्के आणि ड्रायफ्रूटवर १२ टक्के होत असल्यामुळे भाववाढ झाली. त्याचा विक्रीवर परिणाम झाला.

फटाक्यांना चांगली मागणी

यंदा विक्रेत्यांना विक्रीचे परवाने वेळेत दिले असते तर फटाक्यांच्या विक्रीत वाढ झाली असती. प्रशासनाने मैदानात परवाने नाकारले. दिवाळीत फटाक्यांना चांगली मागणी होती. लोकांनी बजेटनुसार खरेदी केली. काहीच फटाक्यांना मागणी होती. यंदा अपेक्षेपेक्षा कमी विक्री झाली. तसे पाहता पूर्वीच्या २० दिवसांच्या तुलनेत दोन ते तीन वर्षांपासून हा व्यवसाय चार ते पाच दिवस असतो.
- गोपीचंद बालानी,
संचालक, ईश्वरदास अ‍ॅण्ड सन्स.

महागाईमुळे मिठाई विक्रीवर परिणाम

महागाई आणि मंदीमुळे यंदा दिवाळीत मिठाई आणि ड्रायफ्रूटच्या विक्रीवर परिणाम झाला. अपेक्षेपेक्षा व्यवसाय कमी झाला. मिठाईवर ५ टक्के आणि ड्रायफ्रूटवर १२ टक्के जीएसटीमुळे लोकांनी कमी खरेदी केली. यंदा लोकांनी दिवाळी स्वत:पुरती मर्यादित ठेवली. भेटवस्वरूपात देण्यात येणा-या मिठाईची कमी प्रमाणात खरेदी केली. रोखीचा परिणाम या व्यवसायावर झाला.
- दीपक अग्रवाल, संचालक, आर्य भवन.

शाळांमध्ये जनजागृती

दिवाळीच्या काळात नागपुरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री होते. मोठा आवाज करणाºया फटाक्यांना आधीच घसरण लागलेली असताना आता रोषणाईच्या फटाक्यांच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. पुढील काळात या व्यवसायाला आणखी घरघर लागणार का, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली. गेल्या तीन वर्षांपासून फटाक्यांच्या विक्रीत घट होत आहे. या व्यवसायासाठी धोक्याची घंटा आहे. यावर्षी फटाके मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले आहेत. हीच स्थिती शहरात सर्वच विक्रेत्यांची आहे. यंदा शाळांमध्ये फटाके न फोडण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता दिवाळीच्या इतर दिवशी फटाक्यांचा धूर निघाला नाही. त्यामुळे काही प्रमाणात मोकळा श्वास घेणे शक्य झाले.

लोकांचा मिठाई खरेदीला ब्रेक

यंदा लोकांनी मिठाई कमी प्रमाणात खरेदी केल्याचे दिसून आले. व्यवसाय का कमी झाला, याचे कारण अद्यापही समजले नाही. पण दिवाळीत महागाई आणि मंदीचा परिणाम या व्यवसायावर दिसून आला. दरवर्षी एक किलो मिठाई खरेदी करणाºयांनी अर्धा किलो खरेदी केली. यावर्षी ड्रायफ्रूट आणि मिठाईची समप्रमाणात विक्री झाली. अपेक्षेपेक्षा व्यवसाय कमी झाला.
- कमल अग्रवाल,
संचालक, हल्दीराम फूड इंटरनॅशनल लि.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.