‘भूदान’च्या कायद्यात व्हायला हवेत काळानुरूप बदल !

By admin | Published: May 19, 2015 01:19 AM2015-05-19T01:19:39+5:302015-05-19T01:19:39+5:30

सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांचे मत

Changes in the air in the law of 'Bhoodan'! | ‘भूदान’च्या कायद्यात व्हायला हवेत काळानुरूप बदल !

‘भूदान’च्या कायद्यात व्हायला हवेत काळानुरूप बदल !

Next

अकोला : भूदानचा कायदा बर्‍याच वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. या कायद्याच्या मुळ गाभ्याला हात न लावता त्यामध्ये काळानुरूप थोडेफार बदल करण्याची गरज आहे. त्याकरिता आम्ही राष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे मत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांनी व्यक्त केले.
स्व. रामकृष्ण आढे यांच्या दहाव्या पुण्यस्मरणार्थ महाराष्ट्र सवरेदय मंडळाचे राज्य अधिवेशन केळीवेळी येथे पार पडले. या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आलेले महादेवभाई विद्रोही यांनी सवरेदय चळवळीचा 'भूतकाळ आणि भविष्यकाळ' यासंदर्भात 'लोकमत'शी संवाद साधला.

प्रश्न : भूदानची चळवळ का मंदावली?
महादेवभाई : आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण आणि दादा धर्माधिकारी यांच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर काम करणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व राहिले नाही. जे ग्रामदान मिळाले त्याचे काम पूर्ण झाले नाही. पूर्वी कायदा नव्हता, त्यामुळे कायदा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र कायदा झाल्यानंतर आता सर्व काम कायदाच करेल, असे ग्रामदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी गृहीत धरले. त्यासोबतच लोक भौतिक सुखाकडे वळत आहेत. त्यामुळे त्यांनी चळवळीकडे पाठ फिरविली.

प्रश्न : चळवळ वाढविण्यासाठी काय करायला हवे?
महादेवभाई : भूदान चळवळीला गावागावापर्यंत घेऊन जावे लागेल. कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी लागेल. भूदानचे महत्त्व, त्याचे फायदे गावकर्‍यांना समजावून सांगावे लागतील. भूदान चळवळीचे महत्त्व नव्या पिढीला आधुनिक युगात कसे महत्त्वाचे आहे, हे सांगावे लागेल.
प्रश्न : सवरेदयची विचारधारा आधुनिक युगात कितपत लागू पडते?
महादेवभाई : जग विनाशाकडे वळते आहे आणि यातून केवळ महात्मा गांधी यांची विचारधाराच जगाला वाचवू शकते. पदोपदी हिंसा घडत असलेल्या या जगात परिस्थिती आणखी भीषण होणार आहे. गांधीजींनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखविला. या मार्गावर चालले तरच देशात शांतता नांदू शकेल.

प्रश्न : जलसंधारणावर व जलसंवर्धनावर आपण नेहमीच भर देता, यामागील कारण काय?
महादेवभाई : आगामी काळात पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवणार आहे. सध्या पृथ्वीचे शोषण सुरू आहे. पाण्याचा अर्मयाद उपसा सुरू आहे. यावर निर्बंध घालायला हवे. गांधीजींनीही जलसंवर्धनाचा संदेश दिला आहे. सध्या जगात असलेल्या लोकसंख्येचे पोषण करण्याची क्षमता पृथ्वीमध्ये आहे. तिच्यामध्ये तेवढी उपलब्धता आहे; मात्र लोभापायी लोक पृथ्वीचे शोषण करीत आहे. हे असेच सुरू राहिले तर भविष्यात मानवाला अनेक भीषण संकटांचा सामना करावा लागेल.

प्रश्न : सवरेदय संघटनेची देशभरात काय स्थिती आहे?
महादेवभाई : सवरेदय संघटना देशातील २८ राज्यांपैकी २३ राज्यांमध्ये आहे. या राज्यांमध्ये नियमित बैठका व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रामुख्याने ज्या गावांमध्ये ग्रामदान झाले आहे, त्या गावांमध्ये अनेक कार्यक्रम पार पडतात.

प्रश्न : भूदानमध्ये दिलेल्या जमिनीचे काय झाले?
महादेवभाई : भूदान चळवळीत आचार्य विनोबा भावे यांच्या आवाहनाला मान देत ४७ लाख एकर जमीन दान देण्यात आली. यापैकी ५0 टक्के जमीन वाटण्यात आली आहे तर ५0 टक्के जमिनीची वाटणी अजूनही बाकी आहे. या जमिनीची वाटणी शेती नसलेल्यांमध्ये करायची आहे. काही ठिकाणी शेतकरी न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्याची वाटणी केल्या जाईल.

Web Title: Changes in the air in the law of 'Bhoodan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.