शंभर कोटींचा अर्थसंकल्प

By Admin | Published: February 28, 2017 01:59 AM2017-02-28T01:59:10+5:302017-02-28T01:59:10+5:30

५३ लाख ९४ हजार ९५२ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प २०१७-१८ सोमवारी मंजूर करण्यात आला.

Budget of hundred crores | शंभर कोटींचा अर्थसंकल्प

शंभर कोटींचा अर्थसंकल्प

googlenewsNext


लोणावळा : नगर परिषदेचे १०० कोटी ६७ लाख ६४ हजार ४५२ रुपये जमा व १०० कोटी १३ लाख ६९ हजार ५०० रुपये खर्च दाखविणारा आणि ५३ लाख ९४ हजार ९५२ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प २०१७-१८ सोमवारी मंजूर करण्यात आला.
तुंगार्ली येथील स्वा. सावरकर विद्यालयाच्या सभागृहात नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत साधकबाधक चर्चा करत व जवळपास १३ कोटी रुपयांची वाढ सुचवत एकमताने मंजूर करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व सर्व नगरसेवक व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
हा अर्थसंकल्प बनविताना नेहमीप्रमाणे आकड्यांचा खेळ करत पन्नास टक्क्यांहून अधिक प्रमाणात फुगवटा दर्शविण्यात आला असल्याचे मागील काही वर्षाच्या जमा व खर्चावरून दिसून येत आहे. नगर परिषद दर वर्षी न आलेल्या विविध अनुदान व अंशदाने या हेडखालील उत्पन्न व कधीही खर्च न झालेल्या अनेक हेडखाली मोठ्या रकमा दर्शवत हा फुगवटा करत आहे. या वर्षी मात्र शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात विकासनिधी मिळविण्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकदिलाने काम करून शहरात रखडलेली विकासकामे मार्गी लावू, असा आशावाद नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त केला.
नगर परिषदेने २०१७-१८चा अर्थसंकल्प बनविताना विविध कर व दरांच्या माध्यमातून १८ कोटी १६ लाख ३३ हजार रुपये, नगर परिषदेच्या विविध मालमत्तांपासून एक कोटी ७६ लाख ४० हजार रुपये, वृक्षकरातून २५ लाख, विविध ठेवी, वसुल्या व फी पोटी ९ कोटी ६० लाख ७५ हजार रुपये व विविध अनुदाने व अंशदानापोटी २५ कोटी ५६ लाख ३२ हजार रुपये अशी ५५ कोटी ८४ लाख ७२ हजार रुपये प्रारंभिक शिल्लकेसह जमा दाखविण्यात आली आहे. वास्तवात मात्र विविध अनुदाने व अंशदाने या हेडमधील काही हेड असे आहेत, की त्यांच्यापासून मागील काही वर्षात नगर परिषदेला एकही रुपया अनुदान आलेले नाही, तरीदेखील भविष्यात या हेडखाली अनुदान मिळेल या आशेपोटी काही कोटी रुपये जमा बाजूला दाखविण्यात आले आहेत.
(वार्ताहर)
>सार्वजनिक सुरक्षिततेसाठी ९० लाख
खर्चाच्या बाजूला सामान्य प्रशासन व वसुली खर्च याकरिता ९ कोटी ४४ लाख ६० हजार रुपये, सार्वजनिक सुरक्षिततेकरिता ९० लाख ४० हजार, नागरिकांच्या आरोग्य व सोयीकरिता २२ कोटी ३८ लाख ३८ हजार रुपये, शिक्षण क्षेत्राची निगडित विविध कामांसाठी १ कोटी ९१ लाख ६ हजार तर अंशदाने व संकीर्णच्या विविध हेडवर ८ कोटी ९३ लाख ६५ हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

Web Title: Budget of hundred crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.