शहरांच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’

By admin | Published: August 22, 2014 01:39 AM2014-08-22T01:39:23+5:302014-08-22T01:39:23+5:30

देशात झपाट्याने शहरीकरण होत आहे. हे संकट मानायचे, आव्हान मानायचे की एक संधी मानायची, हे ठरविले पाहिजे. आजवर शहरीकरण हे एक संकट मानले जात होते. यापूर्वी देशात विकासाचे

'Blue Print' for Cities Development | शहरांच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’

शहरांच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प : मेट्रो रेल्वे व पारडी उड्डाणपुलाचे भूमिपूजन
नागपूर : देशात झपाट्याने शहरीकरण होत आहे. हे संकट मानायचे, आव्हान मानायचे की एक संधी मानायची, हे ठरविले पाहिजे. आजवर शहरीकरण हे एक संकट मानले जात होते. यापूर्वी देशात विकासाचे नियोजन झाले नाही. वाढती लोकसंख्या, वाहतूक, नागरी सुविधांचा विचार केला गेला नाही. आता मात्र शहरीकरण ही एक संधी मानून शहरांच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली जाईल, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
कस्तूरचंद पार्क येथे गुरुवारी आयोजित कार्यक्रमात नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प व पारडी उड्डाणपुलाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय शहरी विकास मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, महापौर आ. अनिल सोले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, नगरविकास सचिव शंकर अग्रवाल, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त श्याम वर्धने उपस्थित होते.
कार्यक्रम शासकीय असला तरी समोर हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाला जाहीर सभेचे स्वरूप आले. मोदी हे नागपुरात पहिल्यांदाच एखाद्या जाहीर कार्यक्रमात बोलणार होते. त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्सुकता होती. मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात करीत उपस्थितांची मने जिंकली. सुरुवातीलाच त्यांनी नागपूरचा गौरव केला. ते म्हणाले, नागपूर ही संत्रानगरी आहे. शून्य मैलाचे शहर आहे. आता आम्ही या शहराला ‘मेट्रो सिटी’ अशी नवी ओळख देणार आहोत. नागपूर हे विदर्भाचे आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने येथे मेट्रो रेल्वे सुरू करण्यास प्राधान्य दिले. मेट्रो रेल्वे हा एक ‘स्टेटस्सिम्बॉल’ आहे. आता देशाच्या नकाशावर आधुनिक शहरांमध्ये नागपूरचेही नाव येईल. बदलत्या काळात पर्यावरण संवर्धन ही नैतिक जबाबदारी आहे. लोकसंख्या वाढली की वाहने वाढतात. वाहतुकीची समस्या निर्माण होते. प्रदूषणात वाढ होते. त्यासाठी एकाच वेळी हजारो लोकांना प्रवास करता यावा, अशी व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. त्यासाठीच मोठ्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ंशहरीकरणाच्या गतीने १०० स्मार्ट सिटी करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात अशी पाच ते सहा शहरे व्हावी. तेथे आर्थिक उलाढाल, तंत्रज्ञानाच्या सुविध उपलब्ध व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
५०० शहरांमध्ये कचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प
मोदींनी त्यांच्या भाषणात सार्वजनिक स्वच्छतेवर भर दिला. ते म्हणाले, आपण सिंगापूर, दुबईत जातो व तेथील स्वच्छतेचे गोडवे गातो. येथे मात्र आपण कचरा करतो. महात्मा गांधींनी पाहिलेले स्वच्छतेचे स्वप्न आपल्याला साकारायचे आहे. यासाठी देशातील ५०० लहानमोठी शहरांची निवड करून तेथे पीपीपी मॉडेलवर घनकचरा व्यवस्थापन व सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचे अभियान राबवायचे आहे. कचऱ्यापासून कंचन बनविण्याचा विडा उचला. शहर स्वच्छ होईल. गोळा झालेल्या कचऱ्यापासून सेंद्रीय खत, वीज, गॅस मिळेल. हे खत गावातील शेतीसाठी द्या. शहरातील सांडपाणी स्वच्छ करून ते शेतीसाठी गावकऱ्यांना द्या. ही व्यवस्था आपल्याला विकसित करायची आहे. केंद्र सरकार लवकरच यासाठी योजना घेऊन येत आहे. नगरपालिका व महापालिकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: 'Blue Print' for Cities Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.