नगर पंचायतीतही भाजपा ‘मोठा भाऊ’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 01:56 AM2018-12-11T01:56:47+5:302018-12-11T06:49:48+5:30

अहमदनगर आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाप्रमाणे राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक निकालाने मतदारांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीला ‘मोठा भाऊ’ ही भूमिका दिल्याचे स्पष्ट होते.

BJP 'big brother' in Nagar Panchayat too! | नगर पंचायतीतही भाजपा ‘मोठा भाऊ’!

नगर पंचायतीतही भाजपा ‘मोठा भाऊ’!

googlenewsNext

- राजा माने 

मुंबई : अहमदनगर आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाप्रमाणे राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक निकालाने मतदारांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीला ‘मोठा भाऊ’ ही भूमिका दिल्याचे स्पष्ट होते.

खान्देशात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद, तर विदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षेत्रातील ब्रह्मपुरी नगर परिषदेचा या निवडणुकीत समावेश होता. जळगाव महापालिका निवडणुकीनंतर खान्देशातील ‘राजकीय बाहुबली’ आपणच असल्याची साक्ष गिरीश महाजन यांनी धुळ्याबरोबर जळगाव जिल्ह्यातील स्वत:च्या जामनेरसह शेंदुर्णी नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये विजयाद्वारे दिली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षेत्रातील ब्रह्मपुरीतील मतदारांनी मात्र त्यांच्या पदरात अपयशाचे माप टाकले. काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाने ब्रह्मपुरीत मुसंडी मारली आणि तब्बल २७ वर्षांनंतर तेथे काँग्रेस विजयी झाली. रीता उराडे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि काँग्रेसनेही २० पैकी १२ जागा जिंकल्या. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघातील नेर (जि. यवतमाळ) नगरपरिषदेवर शिवसेनेने भगवा फडकावत गड कायम राखला. असे असले तरी सेनेच्या जागा दोनने कमी झाल्या आहेत. सेनेने १८पैकी 9 जागा आणि नगराध्यक्षपदी विजय मिळविला. याठिकाणी काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून आधीच्या एकवरून चार जागांवर मुसंडी मारली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकली.

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहिले गेले. या रंगीत तालमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाकडे मतदारांनी ‘मोठा भाऊ’ ही भूमिका दिल्याचे निवडणूक निकाल स्पष्ट करतात. या भागात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही निकालाचे प्रतिबिंब उमटेल.

Web Title: BJP 'big brother' in Nagar Panchayat too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.