स्टिंग ऑपरेशनने फोडले पोळ यांचे बिंग

By admin | Published: July 22, 2014 04:56 PM2014-07-22T16:56:43+5:302014-07-22T17:00:08+5:30

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात प्लॅन्चेटचा आधार घेतलेला नाही असे छातीठोकपणे सांगणारे पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांचे बिंग एका स्टिंग ऑपरेशनमुळे फुटले आहे.

Bing Sting Operation Strikes | स्टिंग ऑपरेशनने फोडले पोळ यांचे बिंग

स्टिंग ऑपरेशनने फोडले पोळ यांचे बिंग

Next

ऑनलाइन टीम

पुणे, दि. २२ - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात प्लॅन्चेटचा आधार घेतलेला नाही असे छातीठोकपणे सांगणारे पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांचे बिंग एका स्टिंग ऑपरेशनमुळे फुटले आहे. आशिष खेतान यांनी गुलाबराव पोळ यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ मंगळवारी जाहीर केला असून या व्हिडीओत पोळ हे दाभोळकरांच्या आत्म्याशी संवाद साधल्याची कबुली देताना दिसत आहेत. 
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लॅन्चेट केल्याचे वृत्त आशिष खेतान यांनी दिले होते. अंधश्रद्धेविरोधात लढा देणा-या दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात तांत्रिकाची मदत घेतल्याने पोळ यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. सोमवारी गुलाबराव पोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन खेतान यांनी केलेला दावा फेटाळून लावला. तसेच खेतान आणि वृत्त प्रकाशित करणा-या मासिका विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा करण्याची घोषणाही केली होती. 
मंगळवारी खेतान यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर गुलाबराव पोळ यांचे स्टिंग ऑपरेशन जाहीर करुन पोळ आणि पुणे पोलिसांची नाचक्कीच केली आहे. या व्हिडीओत पोळ हे मनीष ठाकूरच्या मदतीने प्लॅन्चेट करुन दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधल्याची कबूली देताना दिसतात. तर तांत्रिक व निवृत्त पोलिस कॉन्स्टेबल मनीष ठाकूर हा प्लॅन्चेट करताना व्हिडीओत कैद झाला आहे. मी दाभोलकर बोलतोय असे ठाकूरने म्हटल्याचे या व्हिडीओतून स्पष्टपणे दिसते. पोलिसांनी या प्रकरणाची त्रयस्थपद्धतीने चौकशी करावी. चौकशी समितीने माझ्याकडे पुरावा मागितल्यास मी या घटनेचे संपूर्ण व्हिडीओ फुटेज द्यायला तयार आहे असे खेतान यांनी म्हटले आहे. खेतान यांच्याकडे पाच ते सहा तासांचे व्हिडीओ फुटेज आहे.

Web Title: Bing Sting Operation Strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.