भुजबळ-मुनगंटीवार यांच्यात जुंपली, सरकारने आर्थिक शिस्त बिघडविल्याचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:57 AM2018-07-10T05:57:13+5:302018-07-10T05:57:34+5:30

तब्बल तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार भाषण ठोकले. सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले.

 Bhujbal-Mungantiwar Clash, government accused of disrupting financial discipline | भुजबळ-मुनगंटीवार यांच्यात जुंपली, सरकारने आर्थिक शिस्त बिघडविल्याचा आरोप  

भुजबळ-मुनगंटीवार यांच्यात जुंपली, सरकारने आर्थिक शिस्त बिघडविल्याचा आरोप  

Next

नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. तब्बल तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार भाषण ठोकले. सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले. भुजबळांच्या आरोपांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. उभय नेत्यांना आवरण्यासाठी इतर मंत्री व आमदारांना धावून जावे लागले.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेत छगन भुजबळ यांनी सरकारने राज्याची आर्थिक शिस्त बिघडविल्याचा गंभीर आरोप केला. अर्थसंकल्प सादर करून झाल्यावर तीन-चार महिन्यातच ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांची गरज का पडली, असा सवाल भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला. नाशिक येथील वनहक्क जमीन पट्ट्याच्या मगणीसाठी आदिवासींनी भव्य मोर्चा काढला. त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले होते. तेव्हा त्यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु यावर काहीच झाले नाही. राज्यात ५० कोटी झाडे लावणे ही चांगली बाब आहे, पण तुमच्या वनविभागाचे अधिकारी झाडे लावण्यातच व्यस्त आहेत. त्यामुळे आदिवासींची वनहक्काची प्रकरणे प्रलंबित आहेत. या भुजबळांच्या आरोपांवरून विधानसभेत ठिणगी पडली. यावर मुनगंटीवार संतापले. तेव्हा तालिका अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मध्यस्थी करीत नाशिकमधील अधिकाºयांकडे लोक जातात तेव्हा ते वृक्षारोपणात सध्या व्यस्त असल्याचे सांगत असल्याची बाब खरी असल्याचे निदर्शनास आणून दिली.

वनपट्टे वाटप वनविभाग करीत नाही, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. लोकांचे जनरल नॉलेज बिघडवू नका, २००५ पासून हा प्रश्न आहे, तुम्ही काय केले तेही सांगा, असे मुनगंटीवार यांनी भुजबळांवर पलटवार केला. त्यावर तुम्ही काय दिवे लावत आहात? खोटेनाटे बोलून तुम्ही सत्तेवर आहात, असे भुजबळांनी मुनगंटीवारांना सुनावले. त्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मुनगंटीवार एवढे संतापले की, त्यांचा आवाज फारच चढलेला होता. त्यामुळे शेजारील मंत्री आणि आमदारांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची समजूत काढली.

Web Title:  Bhujbal-Mungantiwar Clash, government accused of disrupting financial discipline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.