बँक ऑफ महाराष्ट्राचे कंपन्यांनी थकविले दहा हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 11:50 AM2019-07-30T11:50:11+5:302019-07-30T11:57:46+5:30

बँकेचे तब्बल १६,६५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून, त्यात बड्या कॉर्पोरेट कंपन्यांचा वाटा तब्बल ९ हजार ९४३ कोटी आहे.

Bank of Maharashtra's ammount of ten thousand crores pending by companies | बँक ऑफ महाराष्ट्राचे कंपन्यांनी थकविले दहा हजार कोटी

बँक ऑफ महाराष्ट्राचे कंपन्यांनी थकविले दहा हजार कोटी

Next
ठळक मुद्दे पुढील काळामधे रिटेल, कृषी, लघु-मध्यम उद्योगला प्राधान्य देण्यात येणार बँकेच्या व्यवसायात पावणेसहा टक्क्यांनी वाढ

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रने गेल्या वर्षभरात अनुत्पादक खात्यातील कर्जाचे प्रमाण (एनपीए) १,१५० कोटी रुपयांनी कमी करण्यात यश मिळविले आहे. मात्र, अजूनही बँकेचे तब्बल १६,६५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून, त्यात बड्या कॉर्पोरेट कंपन्यांचा वाटा तब्बल ९ हजार ९४३ कोटी आहे. खालोखाल लघु-मध्यम उद्योग व कृषी कर्ज खात्यांचा क्रमांक लागतो.
आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा अहवाल व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांनी सोमवारी सादर केला. व्यवस्थापकीय संचालक ए. सी. राऊत, हेमंत टम्टा उपस्थित होते. एनपीएचे प्रमाण वाढल्याने केंद्र सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रसह सर्वच सार्वजनिक बँकांना मदतीचा हात दिला आहे. सरकारची बँकेतील मालकी ८७वरून ९२.९४ टक्के झाली आहे.
गेल्या जून महिन्यात बँकेचा एनपीए १७,८०० कोटी रुपये होता. तो, १६,६५० कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यात मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडे ९,९४३, कृषी ३,३३४ आणि लघु उद्योग क्षेत्राची २ हजार ४२० कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत. एनपीए वसुलीसाठी बँक प्रशासनाने योजना आखली असून, त्या माध्यमातून वसुलीचे नियोजन आहे. तसेच, या पुढील काळामधे रिटेल, कृषी, लघु-मध्यम उद्योगला प्राधान्य देण्यात येणार आहे. कर्ज वितरणातील पन्नास टक्के वाटा याच क्षेत्रासाठी राहील.
.......
बँकेच्या एनपीएचे प्रमाण (रक्कम कोटी रुपयांत)
क्षेत्र    जून २०१८      जून २०१९
कृषी    २,८२०    ३,३३४
गृह, शिक्षण, वाहन    ८,२८    ७,६८
लघु-मध्यम उद्योग    २,९२४    २,४२०
मोठे कॉर्पोरेट उद्योग    १०,२५२    ९,९४३
.................
बँकेच्या व्यवसायात पावणेसहा टक्क्यांनी वाढ
बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवसायात २ लाख १९ हजार ४५८ कोटी ३३ लाख रुपयांवरून २ लाख ३१ हजार ९७२ कोटी ५२ लाख (५.७० टक्के) रुपयांची वाढ झाली आहे. एकूण ठेवींमधेदेखील १ लाख ३५ हजार ४१० कोटी ८५ लाखांवरून १ लाख ३८ हजार ९४० कोटी ९४ लाख (२.६१) रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, बँकेच्या संचालन नफ्यामधे ४७०.३२ कोटी रुपयांवरून ६५८.४५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील हा सर्वोच्च नफा आहे. 


 

Web Title: Bank of Maharashtra's ammount of ten thousand crores pending by companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.