रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 12:35 PM2023-11-09T12:35:24+5:302023-11-09T12:36:37+5:30

ऑस्ट्रेलियाच्या अफलातून विजयानंतर ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या वादळी खेळीची सर्वत्र चर्चा आहे.

Back attack on Rohit Pawar, Sharad Pawar is directly compared to a Pakistani player imran khan by atul bhatkhalkar MLA | रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी

रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अफलातून खेळ पाहायला मिळत आहे. क्रिकेट जगतात अनेक नवे विक्रम नोंद होण्याचं काम यंदाच्या विश्वचषकातून होतय. त्यातच, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने वादळी द्विशतक झळकावले. मॅक्सवेलच्या खेळीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. क्रिकेटचा देव सचिननेही मॅक्सवेलचं कौतुक करताना ही एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम खेली असल्याचं म्हटलं. तर, एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनीही मॅक्सवेलचं कौतुक करताना शरद पवारांशी तुलना केली. आता, भाजप आमदाराने रोहित पवारांवर पलटवार केला आहे.  

ऑस्ट्रेलियाच्या अफलातून विजयानंतर ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या वादळी खेळीची सर्वत्र चर्चा आहे. ऑस्ट्रेलियाची ७ बाद ९१ अशी अवस्था झाली असताना मॅक्सवेलने १२८ चेंडूत नाबाद २०१ धावांची खेळी करत संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी मॅक्सवेलच्या या खेळीची तुलना शरद पवार यांच्या राजकीय संघर्षाशी केली आहे. २०१९ च्या निवडणुकीतील शरद पवारांच्या पावसातील सभेचा फोटो शेअर करत रोहित पवार यांनी मॅक्सवेलसोबत शरद पवार यांची तुलना केली होती. त्यावरुन, सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. आता, आमदार अतुळ भातखळकर यांनी पलटवार करत, शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी केली आहे. 

शरद पवारांचा संबंध माजी पाक पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानशी जोडता येईल, असे ट्विट आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. भातखळकर यांनी रोहित पवारांच्या बातमीचा संदर्भ देत त्यांच्यावर निशाणा साधला. 

काय म्हणाले होते रोहित पवार

फेसबूकवर २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचारावेळी शरद पवारांनी पावसात भिजत घेतलेल्या सभेचा आणि काल विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या मॅक्सवेलचा फोटो शेअर करत रोहित पवार म्हणाले की, परिस्थिती कितीही विरोधात असली, मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं. नुसतं लढावंच लागतं असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो. अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते. मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं. 

दरम्यान रोहित पवार यांनी शेअर केलेल्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काल ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेला सामना स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २९१ धावांचे आव्हान उभे केले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरुवातीपासूनच कोलमडली होती. तसेच त्यांचे ७ फलंदाज ९१ धावांत माघारी परतले होते. मात्र त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने ऐतिहासिक खेळी करताना ऑस्ट्रेलियाला सनसनाटी विजय मिळून दिला होता. 

Web Title: Back attack on Rohit Pawar, Sharad Pawar is directly compared to a Pakistani player imran khan by atul bhatkhalkar MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.