स्वातंत्र्यसैनिकाच्या रक्ताने माखलेल्या तिरंगी ध्वजाची ८१ वर्षे जुनी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 05:20 AM2023-12-03T05:20:10+5:302023-12-03T05:21:31+5:30

१४ ऑगस्ट १९४२ या दिवशी पालघरची सरकारी कचेरी ताब्यात घेण्याची आणि त्यावर भारतीय झेंडा फडकावण्याची रणनीती ठरविण्यात आली.

An 81-year-old story of the Indian flag stained with the blood of a freedom fighter | स्वातंत्र्यसैनिकाच्या रक्ताने माखलेल्या तिरंगी ध्वजाची ८१ वर्षे जुनी गोष्ट

स्वातंत्र्यसैनिकाच्या रक्ताने माखलेल्या तिरंगी ध्वजाची ८१ वर्षे जुनी गोष्ट

हितेन नाईक

पालघर : ८१ वर्षांपासून रक्ताने माखलेला तिरंगी ध्वज पालघरवासीयांनी केवळ वस्तू म्हणून जपला नाही तर त्यापासून नव्या पिढीला सतत प्रेरणा मिळाली पाहिजे, यासाठी तो ध्वज आणि त्याची कथा तरुण विद्यार्थ्यांसाठी जिवंत ठेवली आहे. ‘दिन खून के हमारे, यारो, न भूल जाना, खुशियोंमें अपनी, हम पें आसू बहाते जाना’, या काव्याच्या पंक्ती गाऊन हजारो पालघरवासीय ताठ मानेने आपली छाती फुगवून हुतात्म्यांना सलामी देत आले आहेत. त्याच झेंड्याची ही अत्यंत रोमहर्षक कथा

१४ ऑगस्ट १९४२ या दिवशी पालघरची सरकारी कचेरी ताब्यात घेण्याची आणि त्यावर भारतीय झेंडा फडकावण्याची रणनीती ठरविण्यात आली. याची चाहूल इंग्रजी सत्ताधाऱ्यांना लागल्यावर इन्स्पेक्टर अल्मिडा व त्यांच्यासोबत चार सशस्त्र शिपायांची तुकडी पालघरमध्ये तैनात करण्यात आली आणि १३ ऑगस्टपासून कचेरी रस्त्याच्या नाक्यावर सशस्त्र पोलिसांचा खडा पहारा सुरू झाला. सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे पालघरमध्ये वातावरण तंग बनले. नांदगाव सातपाटी, मुरबे, आलेवाडी, नवापूर आदी भागांतून हजारो सत्याग्रही पालघरच्या दिशेने निघाले. एक मोठा जमाव कचेरीवर तिरंगा फडकावण्यासाठी पुढे सरसावला. तेव्हा प्रांताधिकारी शेख मोहिद्दिन यांनी लोकांच्या दिशेने हातवारे करून अपशब्द वापरल्याने जमाव चवताळला. याचवेळी पाटीलकीचा राजीनामा देऊन संग्रामात सामील झालेल्या नांदगावच्या चिंतू नाना यांना पाहून ब्रिटिश अधिकारी भडकला. एक सरकारी माणूस मोर्चात पाहून त्यांनी चिंतू नानाच्या दंडाला पकडून शिवी देत जाब विचारला. हे चित्र पाहून नांदगावच्या तरुणांची एक फळी अल्मिडाच्या दिशेने चालून आली. लाठीहल्ला सुरू झाला. अनेक जण रक्तबंबाळ झाले. पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. गोळीबार सुरू झाला. 

त्या गर्दीत नांदगावच्या सेवा दलाचा शाखाप्रमुख गोविंद गणेश ठाकूर या अवघ्या १७ वर्षीय तरुणाने चित्त्याच्या चपळाईने पोलिसांच्या साखळीतून पुढे जात वंदे मातरम् अशी गर्जना करीत हातात ध्वज उंच धरून पुढे मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही परिस्थितीत कचेरीवर भारतीय झेंडा फडकावण्याचा  त्याचा निश्चय पोलिसांच्या लाठ्यांनी सुद्धा ढळला नाही. आपल्या हातातला राष्ट्रध्वज काढून घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरवत पोलिसांचा वेढा तोडीत तो पुढे सरकत होता. मात्र अल्मिडा या इंग्रज अधिकाऱ्याने जवळून झाडलेल्या गोळीने या तरुणाचा वेध घेतला. जखमी स्थितीतही त्याने वंदे मातरम्चा जयघोष करत आपल्या हातातला झेंडा खाली पडू दिला नाही. मात्र काही वेळाने तो खाली कोसळल्यावर हौतात्म्य प्राप्त झालेल्या त्या हुतात्म्याच्या रक्ताने हा झेंडा न्हाऊन गेला. गोविंद ठाकूर यांच्या रक्ताचे सिंचन झालेला हा ध्वज नंतर पोलिसांच्या नकळत सेवा दलाचे प्रसन्न नाईक यांनी पळवून आणण्यात यश मिळविले. या घटनेदरम्यान काशिनाथ भाई पागधरे (२६ वर्षे), राम प्रसाद भीमाशंकर तेवारी (१७ वर्षे), रामचंद्र माधव चुरी (२४ वर्षे), सुकुर गोविंद मोरे (२२ वर्षे) या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.

तोच हा झेंडा. त्या झेंड्याचे पावित्र्य राखण्याचे काम पालघरवासीय आजही करीत असून अंगात सळसळणाऱ्या रक्त असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाचे बीज रोवण्याचे काम मागील ८१ वर्षांपासून केले जात आहे.  त्या पवित्र झेंड्याचे जतन करण्याचे काम पालघर नगरपरिषद करीत असून तो एका फ्रेममध्ये जपून ठेवण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी पालघर शहरात घटनास्थळाच्या जवळ हुतात्मा स्तंभ येथे १४ ऑगस्टला याच पवित्र झेंड्याचे पूजन केले जाते.

Web Title: An 81-year-old story of the Indian flag stained with the blood of a freedom fighter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.