राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी द्या : मुख्यमंत्र्यांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 05:31 PM2020-10-01T17:31:51+5:302020-10-01T17:32:17+5:30

अनलॉक-५ मध्ये देखील राज्यातील ग्रंथालयांचा मात्र विचार केलेला नाही, ही गंभीर बाब आहे...

Allow to start libraries in the state: Letter to the Chief Minister | राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी द्या : मुख्यमंत्र्यांना पत्र 

राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी द्या : मुख्यमंत्र्यांना पत्र 

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुढाकार

पुणे : कोरोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व ग्रंथालये बंद आहेत. आता सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. अनलॉक-५ मध्ये हॉटेल्स, फूडमॉल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्यातील ग्रंथालयांचा मात्र विचार केलेला नाही, ही गंभीर बाब आहे. 'ग्रंथालये कधी सुरू होणार ?' याची विचारणा वाचकांकडून सातत्याने होत आहे. शासनाने प्राधान्याने विचार करून ग्रंथालये अटींसह त्वरित सुरू करावीत, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या मागणीचे पत्र पाठवण्यात आले आहे.

ग्रंथालये बंद असल्यामुळे अभ्यासक, संशोधक, वाचक आणि विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. ग्रंथविक्रीलाही 
मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रकाशक, ग्रंथवितरक आणि विक्रेते तसेच त्यांच्याशी संबंधित सर्वांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नव्या साहित्याच्या प्रकाशनाला आणि विक्रीला अडचणी येत आहेत. साहित्य व्यवहाराच्यादृष्टीने ही बाब हानिकारक आहे. अनेक संपादकांनी आर्थिक तोटा सहन करून दिवाळी अंक काढण्याचा निर्धार केला आहे. दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामी ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावत असतात, त्यामुळे ती त्वरित सुरू होणे खूप महत्त्वाचे आहे, याकडे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी लक्ष वेधले.

या संकटकाळात समाजमनात दाटून आलेले निराशेचे मळभ दूर करण्याचे सामर्थ्य केवळ पुस्तकातच आहे. आजवर पुस्तकांनीच समाजाला भरारी घेण्यासाठी आशेचे पंख दिलेले आहेत. पुस्तके ही जीवनावश्यकच आहेत. मानवी जीवनातील हे ग्रंथांचे मोलाचे स्थान लक्षात घेऊन आणि साहित्य व्यवहाराला उभारी मिळावी यासाठी राज्यातील ग्रंथालये त्वरित सुरू करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली असून, संवेदनशीलतेने विचार करून त्वरित निर्णय घ्याल, आणि ग्रंथालये अटींसह सुरू करण्यास परवानगी द्याल अशी खात्री आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 
 

Web Title: Allow to start libraries in the state: Letter to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.