विधानभवनात अजित पवार-गिरीश बापट आमने-सामने आले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 14:57 IST2018-11-27T14:55:06+5:302018-11-27T14:57:15+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगानं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूनं अहवाल दिला.

विधानभवनात अजित पवार-गिरीश बापट आमने-सामने आले अन्...
मुंबई - मराठा आरक्षणावरुन विधानसभेच्या दोन्ही सभागृहात आज रणकंदन पाहायला मिळाले. तर सभागृहाबाहेरही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. सभागृहातील कामकाज तहकूब करुन विरोधकांनी सभात्याग केला होता. त्यानंतर, गिरीष बापट यांनी विरोधकांची समजूत काढण्यात प्रयत्न केला.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगानं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूनं अहवाल दिला. या सर्व शिफारसी सरकारनं हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या बैठकीत स्वीकारल्या. मात्र, समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचं, यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. या समितीनं 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विरोधकांनी आजही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्ष मराठा आरक्षणाला अडथळा आणणार नाही. मात्र, अहवाल सभागृहात सादर केला नाही, त्यामुळे मराठा समाजात संदिग्धता निर्माण झाल्याचे अजित पवार म्हणाले. मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांचे देणे म्हणून तरी अहवाल सभागृहात मांडा, असा टोलाही अजित पवार यांनी सरकारला लगावला. त्यानंतर, सभागृहाचं कामकाज तहकूब करून विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे गिरीष बापट यांनी सभागृहाबाहेर येऊन अजित पवार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना समाजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, अजित पवार आणि गिरीष बापट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळाले.