After all, changes in schedule of 'Law' | अखेर ‘लॉ’ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल,

मुंबई : लॉ (कायदा) आणि सीए परीक्षांचे आयोजन एकाचवेळी केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनांनी केलेल्या विरोधानंतर मुंबई विद्यापीठाने लॉ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची घोषणा गुरुवारी केली आहे. दरम्यान, लॉ आणि सीए या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी कलिना परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलत असल्याचा निर्णय जाहीर केला.
एलएलबी आणि सीएची परीक्षा देणाºया सुमारे २०० विद्यार्थ्यांना जुन्या वेळापत्रकाचा फटका बसणार होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. तरीही प्रशासन ढिम्म असल्याने अखेर विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागल्याची प्रतिक्रिया स्टुडण्ट लॉ काऊन्सिलने व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सलग दोन तास ‘मुंबई विद्यापीठ वाचवा’ या मोहिमेअंतर्गत केलेल्या आंदोलनानंतर परीक्षा भवन हादरले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नव्या वेळापत्रकाची घोषणा केली.


एलएलबी सत्र तीन(तीन वर्षांचा अभ्यासक्रम), एलएलबी सत्र सात (पाच वर्षांचा अभ्यासक्रम)
‘ट्रान्स्फर आॅफ प्रॉपर्टी अ‍ॅक्ट अ‍ॅण्ड इजमेंट अ‍ॅक्ट’ विषयाचा २१ डिसेंबर २०१७ रोजी होणारा पेपर आता ३ जानेवारी २०१८ रोजी पार पडणार आहे. तर ‘कंपनी लॉ’ विषयाचा २३ डिसेंबर २०१७ रोजी होणारा पेपर ५ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.

एलएलबी सत्र पाच(तीन वर्षांचा अभ्यासक्रम), एलएलबी सत्र नऊ
(पाच वर्षांचा अभ्याक्रम)
‘इंटरप्रिटेशन आॅफ स्टेटस’ हा २० डिसेंबर २०१७ रोजी होणारा पेपर २ जानेवारी २०१८ रोजी होईल. तर ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ अ‍ॅण्ड एचआर’ या विषयाचा २२ डिसेंबर २०१७ रोजी होणारा पेपर ४ जानेवारी २०१८ रोजी होईल. विद्यापीठाने घेतलेल्या
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.