ठळक मुद्देअनिकेत कोथळे हत्येप्रकरणी सांगली शहर पोलिसातील आणखी ७ जणांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची संख्या आता 12 झाली आहे.

सांगली- अनिकेत कोथळे हत्येप्रकरणी सांगली शहर पोलिसातील आणखी ७ जणांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची संख्या आता 12 झाली आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह 5 जणांना कोर्टाने याआधीच यापूर्वीच पोलीस कोठडी सुनावली आहे. निलंबित 7 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ठाणे अमंलदार, नाईट शिफ्टचे चार गार्ड्स, वायरलेस ऑपरेटर आणि त्यांच्या मदतनिसाचा समावेश आहे. पोलीस ठाण्यात कोथळेच्या मृत्यूप्रकरणी दुर्लक्ष केल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडली होती. या प्रकरणात अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. पण चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याचंही समोर आलं. 

कोल्हापूर रस्त्यावर एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारी या दोघांना अटक केली होती. आरोपींना चौकशीसाठी डिटेक्शन ब्रँचमध्ये नेत असताना त्यांनी पळ कढल्याचा बनाव पोलिसांनी केला होता. पण चौकशी दरम्यान तो बनाव उघड झाला.
दरम्यान, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी प्रकरणातील कोणाचीही गय केली जाणार नसल्याचं म्हंटलं आहे.  या घटनेला जबाबदार असेलेल्या बारा पोलीसांवर कारवाई केली आहे.आणखी कोण दोषी असतील तर त्याच्यावर ही कारवाई करण्यात येईल या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी सहभागी असले तरी त्याची गय केली जाणार नाही .पोलीस अधीक्षकांची या प्रकरणातील भूमिका तपासली जाईल, असं राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी लोकमतशी बोलताना म्हंटलं.